चांदोली राष्ट्रीय उद्यानात व्याघ्र संवर्धनाचा नवा टप्पा; वैज्ञानिक पद्धतीने साध्य केले महत्त्वपूर्ण पाऊल
कराड/प्रतिनिधी : –
सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात व्याघ्रवाढीसाठी महत्त्वाचा टप्पा गुरुवारी साध्य झाला. नियंत्रित पिंजऱ्यातून अनुकूलन प्रक्रियेनंतर ठेवण्यात आलेली वाघीण STR T–04 ‘तारा’ हिला अखेर चांदोली राष्ट्रीय उद्यानातील नैसर्गिक जंगलात यशस्वीरीत्या मुक्त करण्यात आल्याने चांदोली राष्ट्रीय उद्यानात ‘तारा’चे पहिले मुक्त पाऊल पडले.
तज्ज्ञांचे निरीक्षण : १८ नोव्हेंबर रोजी एनक्लोजरचे दरवाजे उघडण्यात आले होते. मात्र दोन दिवस वाघीण आतच फिरत राहिली. तिने नैसर्गिक शिकार करून तीच खात, परिस्थितीचा सहज स्वीकार केल्याचे तज्ज्ञांनी निरीक्षणात पाहिले. गुरुवार, २० नोव्हेंबर रोजी सकाळी ८ वाजता ‘तारा’ने डौलदार पावलांनी एनक्लोजर सोडले आणि जंगलाच्या दिशेने मार्गक्रमण केले.
तंदुरुस्त घोषित : चांदोलीत आगमनानंतर वाघीणीचा संपूर्ण अनुकूलन टप्पा वैज्ञानिक पद्धतीने राबविण्यात आला. तिची हालचाल, शिकार प्रवृत्ती, हवामानाशी जुळवून घेण्याची क्षमता, नैसर्गिक प्रतिक्रिया आणि क्षेत्रचिन्हीकरण यांचे वन्यजीव तज्ज्ञ व भारतीय वन्यजीव संस्थेच्या (WII) अधिकाऱ्यांनी सातत्याने निरीक्षण केले. नियमित तपासणीनंतर तिला पूर्णपणे तंदुरुस्त असल्याचे घोषित करण्यात आले.
२४ तास निरीक्षणासाठी तंत्रज्ञानाचा आधार
वाघीणीच्या मानेवर रेडिओ कॉलर बसविण्यात आला असून सॅटेलाइट टेलीमेट्री व VHF ट्रॅकिंगच्या माध्यमातून तिच्या हालचालीवर २४ तास नजर ठेवली जाणार आहे. यासाठी सह्याद्री व्याघ्र प्रकल्प, चांदोली राष्ट्रीय उद्यान व भारतीय वन्यजीव संस्थेची विशेष प्रशिक्षित पथके कार्यरत आहेत.
‘तारा’मुळे संवर्धन उपक्रमाला नवी उभारी
राज्य शासन आणि सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या संयुक्त प्रयत्नांतून व्याघ्र संवर्धन व पुनर्वसनाची दिशा अधिक मजबूत होत असल्याचे वन विभागाने स्पष्ट केले आहे. या मुक्तीमुळे जैवविविधता वाढ, पर्यावरणीय संतुलन आणि भविष्यातील व्याघ्र पर्यटनाला नवी चालना मिळण्याची शक्यता आहे.
अविरत प्रयत्नांची पराकाष्ठा
तत्कालीन मुख्य वनसंरक्षक डॉ. कलेमेंट बेन, स्व. पापा पाटील, मानद वन्यजीव रक्षक रोहन भाटे आणि नाना खामकर यांनी गेल्या आठ–दहा वर्षांपासून व्याघ्र पुनर्वसनासाठी अक्षरशः अविरत प्रयत्नांची पराकाष्ठा केली. त्यांच्या सातत्यपूर्ण धडपडीमुळे सह्याद्रीत व्याघ्रसंवर्धनाला नवी दिशा मिळाली असून, आगामी काळात येथे व्याघ्र पर्यटनात लक्षणीय वाढ होणार असल्याचे स्पष्टपणे जाणवत आहे.
मुख्य निरीक्षण घटक :
- · उपग्रह व VHF आधारित हालचाल विश्लेषण
- · फील्ड पथकांकडून क्षेत्रनिहाय पडताळणी
- · निवासस्थाने व शिकार प्रवृत्तीचा नोंदवही अहवाल
- · मानव–वन्यजीव संघर्ष प्रतिबंध उपाययोजना
- · तत्पर पशुवैद्यकीय प्रतिसाद पथक










