मुख्य लढत कोणाशी, लवकरच स्पष्ट होईल

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा.

आमदार डॉ. अतुल भोसले; जनतेचा उत्साह मतात परिवर्तन होईल – विनायक पावसकर

कराड/प्रतिनिधी : –

काँग्रेस निवडणूक रिंगणात उतरणार असल्याचे काल स्पष्ट झाले आहे. त्यामुळे येथे काही दिवसांत नगरपालिका निवडणुकीत मुख्य लढत नक्की कोणाबरोबर आहे, हे स्पष्ट होईल. मात्र नागरिक भारतीय जनता पार्टीबरोबर जाण्याच्या मनस्थितीत आहेत. मलकापुरात नुकत्याच पाच जागा बिनविरोध झाल्याने कराड शहरही भाजपबरोबर असल्याचे चित्र दिसून येत असल्याचे मत भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार डॉ. अतुल भोसले यांनी व्यक्त केले.

प्रचार फेरी : कराड नगरपालिका सार्वत्रिक पंचवार्षिक निवडणूक 2025 साठी भारतीय जनता पार्टीने येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून जिल्हाध्यक्ष डॉ. अतुल भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रचाराचा शुभारंभ केला.

मान्यवरांची उपस्थिती : यावेळी पक्षाचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार विनायक (आण्णा) पावसकर यांच्यासह पक्षाचे नगरसेवकपदाचे उमेदवार, पदाधिकारी, कार्यकर्ते नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

घर टू घर पोहोचण्याची भूमिका : याप्रसंगी बोलताना आमदार भोसले म्हणाले, कराड शहराने लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टीला मतरुपी कौल दिला होता. आता कराड नगरपालिका निवडणुकीतही भाजपच्या विचाराचा नगराध्यक्ष आणि सर्व प्रभागांतील नगरसेवक पदाचे उमेदवार कराडातील लोक निवडून देतील, असा विश्वास आहे. या निवडणुकीत नगराध्यक्ष, तसेच नगरसेवक पदाचे सर्व उमेदवार यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या उत्साहाने कामाला लागले असून, घर टू घर पोहोचण्याची भूमिका त्यांनी घेतली आहे.

पक्षाचा विजय निश्चित : नगराध्यक्षपदाचे उमेदवार विनायक पावसकर यांनी प्रत्येक घराघरात जाऊन त्यांच्या अडचणी जाणून घेत, त्या सोडवण्याची हमी लोकांना दिली आहे. सर्वच उमेदवार ताकतीने कामाला लागले असल्याने पक्षाचा विजय निश्चित असल्याचे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.

उत्साह मतात परिवर्तन होईल : नगराध्यक्ष पदाचे उमेदवार विनायक (आण्णा) पावसकर म्हणाले, कराड नगरपालिका निवडणुकीच्या दृष्टीने शहरात भारतीय जनता पार्टीसाठी अत्यंत चांगले वातावरण आहे. जनतेमध्ये उत्साह दिसत असून, तो मतात परिवर्तन होईल, याची खात्री वाटते.

भाजपाचा नारा : ‘सुंदर शहर, पारदर्शक शहर आणि भ्रष्टाचार मुक्त शहर’ हा भारतीय जनता पार्टीचा नारा आहे, त्यादृष्टीने आम्ही काम करणार आहोत. शहरातील प्रत्येक कानाकोपऱ्यातील मतदारांचा चांगला प्रतिसाद मिळत असून, आपण कमळ चिन्ह बघूनच मतदान करणार असल्याच्या प्रतिक्रिया नागरिकांमधून येत असल्याने भाजपला अपेक्षित यश मिळेल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

पांढरीचा मारुती मंदिर परिसरातही प्रचार फेरी : सायंकाळी शहरातील पांढरीचा मारुती मंदिर परिसरातही प्रचार फेरी काढण्यात आली. यावेळीही पक्षाचे नगराध्यक्ष, तसेच नगरसेवकपदाच्या उमेदवारांसह पदाधिकारी, कार्यकर्ते नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Jan Swarashtra
Author: Jan Swarashtra

error: Content is protected !!