पाच दिवसांत उमेदवारी निश्चित; नगराध्यक्षपदासाठी पाच प्रमुख इच्छुक

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा.

आमदार अतुल भोसले; कार्यकर्ता मेळावा उत्साहात, भाजपकडून निवडणुकीची जोरदार तयारी 

कराड/प्रतिनिधी : – 

कराड नगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीकडून उमेदवार निश्चितीची प्रक्रिया वेगाने सुरू झाली असून, पुढील पाच दिवसांत उमेदवारी निश्चित होईल, अशी माहिती माहिती जिल्हाध्यक्ष आमदार डॉ. अतुल भोसले यांनी दिली.

नगराध्यक्षपदासाठीची नावे जाहीर : यावेळी नगराध्यक्षपदासाठी पाच प्रमुख इच्छुकांची नावे पुढे आली असून, त्यात ज्येष्ठ नगरसेवक विनायक पावसकर, माजी उपनगराध्यक्ष जयवंतराव पाटील, अरुण जाधव, अतुल शिंदे आणि बंडाकाका डुबल यांचा समावेश असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

एकमुखी संकल्प : विठ्ठल चौकात झालेल्या भाजपच्या कार्यकर्ता मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. मेळाव्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना आमदार भोसले म्हणाले, या मेळाव्याचा हेतू पक्षाची दिशा व रणनीती ठरवण्याचा होता. इच्छुक उमेदवारांनी आज उमेदवारी ज्या कार्यकर्त्याला मिळेल, त्याच्या पाठीशी सर्वांनी एकजुटीने उभं राहायचं. कोणताही संघर्ष करायचा नाही, असा एकमुखाने संकल्प केला आहे.

…त्या निर्णयासोबत कार्यकर्ते राहतील : इच्छुकांची संख्या जास्त असल्याने संघर्ष वाढेल का? या प्रश्नावर ते म्हणाले, ३२ जागांसाठी १०४ जण इच्छुक असले तरी आणि स्पर्धा वाढली असली तरी, बंडखोरीची शक्यता मला वाटत नाही. पक्ष निर्णय घेईल आणि सर्व कार्यकर्ते त्या निर्णयासोबत राहतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

घटक पक्षांनी आमच्यासोबत यावं : महायुतीबाबत बोलताना डॉ. भोसले म्हणाले, महायुतीतील घटक पक्षांनी आमच्यासोबत यावं, हीच माझी भूमिका कायम राहील. मात्र त्यांच्या मागण्या आणि आमच्या कार्यकर्त्यांच्या अपेक्षा यांचा मेळ बसवावा लागेल. शहरातील अनेक प्रश्न प्रलंबित असले तरी ते सोडवण्यासाठी प्रयत्न सुरूच राहतील, असेही त्यांनी सांगितले.

विकासाचा नवा अध्याय : तसेच कराडमधील भाजप कार्यकर्ते एकत्र राहून ही निवडणूक संघटितपणे लढवतील आणि शहरात विकासाचा नवा अध्याय सुरू करतील, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

Jan Swarashtra
Author: Jan Swarashtra

आणखी वाचा

Buzz4 Ai
error: Content is protected !!