कराड नगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज 

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा.

प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे; निवडणुकीत जबाबदारीने व अचूकतेने काम करण्याचे निर्देश 

कराड/प्रतिनिधी : – 

कराड नगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025 च्या पार्श्वभूमीवर प्रशासनाची सर्व तयारी पूर्ण झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे यांनी सांगितले. निवडणुकीसाठी नेमणूक झालेल्या प्रत्येक पथकाने आपले काम जबाबदारीने, काळजीपूर्वक, वेळेत आणि अचूकपणे पार पाडावे, अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या.

प्रशिक्षण सत्र : कराड नगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने पार पडलेल्या प्रशिक्षण सत्रादरम्यान सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी सौ. रोहिणी शिंदे, नायब तहसीलदार युवराज पाटील, निवडणूक नायब तहसीलदार हेमंत बेसके, बाबुराव राठोड, व्ही.आर. राजपूत आदी अधिकारी उपस्थित होते.

टीमवर्क करा : प्रांताधिकारी म्हेत्रे म्हणाले, आपण निवडणुकीचे अत्यंत महत्त्वाचे काम करतो आहोत. हे लक्षात घेऊन सामूहिक जबाबदारीने टीमवर्कच्या माध्यमातून हे काम पार पाडावे. विधानसभेच्या निवडणुकीत कराड तालुक्याने उत्कृष्ट कामगिरी दाखवली होती, त्याच पातळीवर या निवडणुकीतही काम व्हावे.

पहिले प्रशिक्षण : या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नेमणूक झालेल्या कर्मचाऱ्यांचे पहिले प्रशिक्षण १६ नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी १० वाजता टाऊन हॉल, कराड येथे, दुसरे प्रशिक्षण २३ नोव्हेंबर रोजी टाऊन हॉल, कराड, तर तिसरे प्रशिक्षण १ डिसेंबर रोजी बहुउद्देशीय हॉल, कराड येथे आयोजित करण्यात आले आहे. नेमणूक कर्मचाऱ्यांना निवडणुकीच्या आदेशासोबत टपाली मतपत्रिका मागणी फॉर्म देण्यात येणार असल्याचे म्हेत्रे यांनी सांगितले.

विविध विभागांची स्थापना : निवडणुकीचे काम पारदर्शक आणि कार्यक्षम व्हावे, यासाठीसूक्ष्म नियोजन केल्याचे प्रांताधिकारी म्हेत्रे यांनी सांगितले. यात आचारसंहिता कक्ष, एक खिडकी योजना, निवडणूक निरीक्षक, कंट्रोल मदत कक्ष, कायदा व सुव्यवस्था, सुरक्षा व वाहतूक व्यवस्था, साहित्य वाटप व संगणक कक्ष, भोजन व प्रशिक्षण शाखा, लेखा विभाग, मतदान जनजागृती (स्वीप पथक), वैद्यकीय सहाय्यता, माध्यम कक्ष, बीएलओ समन्वय, ईव्हीएम यंत्रणा आणि पत्रव्यवहार कक्ष यांसारख्या विभागांची स्थापना करण्यात आली आहे.

प्रचार-प्रसारात कराड तालुका अव्वल

कराड नगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कराड तालुक्यातील प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांनी मतदारांमध्ये जनजागृती व्हावी या उद्देशाने बाईक रॅली आणि रांगोळी प्रदर्शन आयोजित केले. राज्यात अशा प्रकारचा उपक्रम प्रथमच कराड तालुक्यात राबवण्यात आला असून, ही तालुक्याच्या जनजागृतीची सकारात्मक परंपरा असल्याचा अभिमान असल्याचे प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे यांनी सांगितले. 

Jan Swarashtra
Author: Jan Swarashtra

आणखी वाचा

Buzz4 Ai
error: Content is protected !!