डबल महाराष्ट्र केसरी पै. चंद्रहार पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सांगली जिल्ह्यातील तासगाव येथे आज, रविवार दि. ९ नोव्हेंबर रोजी, शिवसेनेच्या वतीने राज्यातील बैलगाडी क्षेत्रातील पहिले ऐतिहासिक अधिवेशन पार पडणार आहे. या अधिवेशनाच्या निमित्ताने आयोजित ‘श्री-नाथ केसरी’ बैलगाडी शर्यतीसाठी राज्यभरातून तब्बल १२०० बैलगाड्यांची नोंदणी झाली आहे. या शर्यतीला सहा लाखांहून अधिक प्रेक्षक उपस्थित राहतील, असा अंदाज आहे. विशेष म्हणजे, देशात प्रथमच बैलगाडी शर्यतीसाठी फॉर्च्यूनर कार, ट्रॅक्टर आणि तब्बल १५० दुचाकी बक्षिसे ठेवण्यात आली आहेत, अशी माहिती हिंदकेसरी पै. संतोष (आबा) वेताळ यांनी पत्रकार परिषदेत दिली.
मान्यवरांची उपस्थिती : यावेळी पै. नवनाथ पाटील, पै. अतुल पवार, महाराष्ट्र चॅम्पियन सतीश डांगे, अरविंद यादव, बापूसो कांबळे, प्रताप क्षीरसागर, अस्लम शिकलगार, गोविंदा यादव, शिवाजी पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
खुली बैलगाडी शर्यत : पै. वेताळ म्हणाले, कर्नाटकासह सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यात सहा किलोमीटर अंतरावरील खुल्या बैलगाडी शर्यत पद्धतीसाठी १५ बैलगाड्यांची नोंद झाली आहे. या शर्यतीतील विजेत्यांना फॉर्च्यूनर कार आणि ट्रॅक्टर अशी प्रमुख बक्षिसे देण्यात येणार आहेत.
पट्टा पद्धत बैलगाडी शर्यत : पश्चिम महाराष्ट्रात प्रचलित ‘पट्टा पद्धत’ शर्यतीसाठी तब्बल १२०० बैलगाड्या नोंदल्या गेल्या असून, प्रत्येक गटातील विजेत्याला दुचाकी बक्षीस मिळणार आहे. सुमारे १५० गट तयार झाल्याने तेवढ्या दुचाक्या बक्षीस म्हणून देण्यात येतील.
शेतकरी फॉर्च्यूनरमध्ये फिरणार : या भव्य स्पर्धेसाठी सुमारे सहा लाख लोक उपस्थित राहतील, अशी अपेक्षा असून, प्रेक्षकांसाठी विशेष बैठकव्यवस्था करण्यात आली आहे. पै. वेताळ म्हणाले, पहिल्यांदाच महाराष्ट्रातील बैलगाडी शर्यतीत भाग घेणारे शेतकरी फॉर्च्यूनर कारमध्ये फिरताना दिसतील, ही अभिमानाची गोष्ट आहे.
मान्यवर राहणार उपस्थित : या अधिवेशनास राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उद्योगमंत्री उदय सामंत, पर्यटन मंत्री शंभूराज देसाई, मंत्री प्रकाश आबिटकर, आमदार सुहास बाबर, आमदार चंद्रजीत नरके, खासदार धैर्यशील माने आणि शिवसेना नेत्या दिपाली सय्यद आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
मुंबईत बक्षीस वितरण सोहळा : शर्यतीचा बक्षीस वितरण सोहळा मुंबई येथील यशवंतराव चव्हाण सभागृहात पार पडणार असून, विजेते बैलगाडी मालक बैलजोडीसह मुंबईत येऊन बक्षिसे स्वीकारतील. गोवंश संवर्धन कार्यासाठी आणि बैलगाडी शर्यतीसाठी एवढ्या मोठ्या प्रमाणात बक्षीशे दिले जातात, हा हेतू शहरी जनतेला, कळवा, यासाठी मुंबई येथे बक्षीस वितरण सोहळा घेण्यात आल्याचे पै. वेताळ यांनी सांगितले.
२५ लाख रुपयांचा धनादेश देणार : तसेच, राज्यातील ओल्या दुष्काळामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पै. चंद्रहार पाटील तब्बल २५ लाख रुपयांचा धनादेश सुपूर्द करण्यात येणार आहे.
१०० गायींचे वाटप : त्याचबरोबर उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते लाडक्या बहिणींना १०० गायींचे वाटपही करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
अन्यायाविरुद्ध उभा राहिलो : महाराष्ट्र केसरी सिकंदर शेख याच्यावर झालेल्या खोट्या गुन्ह्याच्या प्रकरणी पै. वेताळ म्हणाले, त्याला देशद्रोही ठरविण्याचे षड्यंत्र काहींनी रचले होते. मात्र, मी स्वतः पैलवान म्हणून त्या अन्यायाविरुद्ध उभा राहिलो आणि सत्य समोर आणल्यामुळे त्याला जामीन मिळाला. तीन वर्षे सैन्यात हवालदार म्हणून काम केलेला, कायद्याचे ज्ञान असलेला असा पैलवान शस्त्रविक्रीसारख्या कृत्यात सहभागी होणार नाही, हे महाराष्ट्रातील जनतेनेही ओळखले. त्यामुळे सिकंदर शेखचे करिअर वाचले, किंबहुना महाराष्ट्रातील कुस्ती वाचली, असे मत त्यांनी व्यक्त केले.