मलकापूर नगरपालिका निवडणूक ताकदीने लढवणार

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा.

नामदेवराव पाटील; काँग्रेसकडून प्रभागनिहाय चाचपणी सुरू; मित्रपक्षांशी समन्वय साधणार

कराड/प्रतिनिधी : – 

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर झाल्यानंतर मलकापूर नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाने जोरदार तयारी सुरू केली आहे. आगामी निवडणूक काँग्रेस पक्ष ताकदीने लढवणार असल्याचे प्रतिपादन कराड दक्षिण काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नामदेवराव पाटील यांनी केले.

कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य निर्मिती : मलकापूरचे उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे यांनी पक्ष सदस्यपदाचा राजीनामा दिल्याने निर्माण झालेल्या राजकीय परिस्थितीला काँग्रेस पक्ष संघटितपणे सामोरे जाणार आहे. या पार्श्वभूमीवर पक्षाने कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य निर्माण केले आहे.

एकजुटीने लढणार : पाटील म्हणाले, आगामी निवडणुकीत काँग्रेस पक्ष स्वतंत्रपणे, तसेच मित्रपक्षांशी समन्वय साधून एकजुटीने लढणार आहे. प्रत्येक प्रभागात इच्छुक उमेदवारांची चाचपणी सुरू असून योग्य उमेदवारांना संधी दिली जाईल.

बाबांच्या दूरदृष्टीतून विकास : मलकापूर शहराचा विकास हा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या दूरदृष्टीतून झाला असल्याचेही पाटील यांनी नमूद केले. ते म्हणाले, २४ बाय ७ पाणीपुरवठा योजना, ड्रेनेज सुविधा, नगरपरिषदेची आधुनिक इमारत, अंतर्गत रस्त्यांचे जाळे आणि शहराचा नियोजनबद्ध विकास या सर्व योजना पृथ्वीराज बाबांच्या प्रयत्नांतून साकार झाल्या. मलकापूरचे आणि पृथ्वीराज बाबांचे जिव्हाळ्याचे नाते लक्षात घेता, आगामी निवडणूक त्यांच्या मार्गदर्शनाखाली काँग्रेस ताकदीने लढेल, असे त्यांनी स्पष्ट केले.

पाठीशी खंबीरपणे उभे रहा : शहरातील काँग्रेस कार्यकर्त्यांनी सध्याच्या परिस्थितीत पक्षाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे, असे आवाहन करत पाटील यांनी मलकापूरकरांना विकासाच्या सातत्यासाठी काँग्रेसला पाठिंबा देण्याचे आवाहनही केले.

Jan Swarashtra
Author: Jan Swarashtra

आणखी वाचा

Buzz4 Ai
error: Content is protected !!