ज्येष्ठ नागरिकांचा बिनविरोध निवडणुकीचा संकल्प गावाच्या ऐक्याचा आदर्श
कराड/प्रतिनिधी : –
तालुक्यातील नारायणवाडी हे गाव सामाजिक एकात्मता आणि जनसेवेच्या उपक्रमांमुळे सतत आदर्श ठरत आहे. कै. रा. की. लाहोटी लायन्स चॅरिटेबल आय हॉस्पिटल यांच्यावतीने नारायणवाडी विकास सोसायटी येथे दि. ६ नोव्हेंबर रोजी मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरास ग्रामस्थांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
संयुक्त विद्यमाने आयोजन : ग्राहक पंचायत महाराष्ट्र शाखा कराड, मानव अधिकार कराड व वनवासी कल्याण आश्रम सदस्य नितीन शाह यांच्या संयुक्त विद्यमाने हे शिबिर पार पडले. तज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली मोफत डोळे तपासणी करण्यात आली, तसेच गरजूंना अल्प खर्चात मोतीबिंदू शस्त्रक्रियेची सुविधा देण्यात आली. या उपक्रमामुळे अनेक ग्रामस्थांना डोळ्यांच्या आरोग्याबाबत महत्त्वपूर्ण मदत मिळाली.
योगदान : शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी नारायणवाडी विकास सोसायटीचे चेअरमन कृष्णात यादव, माजी चेअरमन प्रमोद हरदास, सचिव संजय कारंडे, ग्रामपंचायत अधिकारी प्रशांत माळी, सोसायटीचे संचालक मंडळ तसेच कालेटेक व मुनावले गावातील कार्यकर्त्यांचे योगदान लक्षणीय ठरले.
बिनविरोधचा संकल्प : विशेष म्हणजे, नारायणवाडीतील ज्येष्ठ नागरिकांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका बिनविरोध पार पाडण्याचा संकल्प केला असून, त्याची सुरुवात विकास सोसायटीची निवडणूक एकमताने करून करण्यात आली आहे. गावातील एकात्मता, सौहार्द आणि सुजाणतेचे हे प्रेरणादायी उदाहरण ठरले आहे.
आत्मविश्वासाने वाटचाल : महिला सक्षमीकरणासाठी ‘लखपती दीदी’ अभियान, वृक्षारोपण मोहिमा, स्वच्छता आणि समाजाभिमुख उपक्रमांच्या माध्यमातून नारायणवाडी स्वच्छ, समृद्ध आणि आदर्श गाव बनविण्याकडे आत्मविश्वासाने वाटचाल करत आहे.