अॅड. अमित जाधव; संघर्षाच्या काळातून काँग्रेस नव्या ऊर्जेने उभारी घेईल
कराड/प्रतिनिधी : –
जरी काँग्रेससाठी सध्याचा काळ संघर्षाचा असला, तरी पक्षाची वैचारिक परंपरा आणि जनतेशी असलेले नाते या संघर्षातून निश्चितच नवा मार्ग काढेल, असा ठाम विश्वास व्यक्त करत कराड नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी काँग्रेस सज्ज असल्याची माहिती कराड शहर काँग्रेसचे अध्यक्ष अॅड. अमित जाधव यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.
प्रसिद्धीपत्रक : या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, कराड नगरपालिकेची निवडणूक केव्हाही जाहीर होऊ शकते. शहरात काँग्रेसचे अस्तित्व आहे का? अशी चर्चा सध्या सुरू असली तरी, गत विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला निर्णायक मते मिळाल्याचे वास्तव नाकारता येत नाही. त्यामुळे काँग्रेस पक्षाकडून या निवडणुकीत सक्रियपणे उमेदवार उभे करून पक्षाची ताकद दाखवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
वॉर्डनिहाय इच्छुकांची चाचपणी : कराड शहर काँग्रेसकडून निवडणुकीसाठी वॉर्डनिहाय इच्छुकांची चाचपणी सुरू करण्यात आली असून, स्थानिक कार्यकर्त्यांशी संवाद साधून संघटनात्मक तयारी केली जात आहे. पक्षाच्या बैठकींमधून इच्छुकांची सामाजिक स्वीकृती, जनसंपर्क, तसेच कार्यकर्त्यांचा उत्साह या निकषांवर चर्चा केली जात आहे.
काँग्रेस पुन्हा विश्वास संपादन करेल : ते म्हणाले, कराड शहरात काँग्रेसचा भक्कम कार्यकर्ता वर्ग आहे. विकास आणि पारदर्शक प्रशासनाच्या माध्यमातून काँग्रेस पुन्हा एकदा नागरिकांचा विश्वास संपादन करेल. काँग्रेसच्या झेंड्याखाली कार्यकर्ते आणि नागरिकांना एकत्र आणून कराडमध्ये नवे राजकीय समीकरण निर्माण करण्याचा आमचा प्रयत्न आहे.