सागर आमले यांचे आवाहन; सासपडे घटनेचा नोंदवणार निषेध
कराड/प्रतिनिधी : –
सासपडे, ता. सातारा येथे एका नराधमाने १३ वर्षीय चिमुरडीवर अत्याचार करून, तिचा जीव घेतल्याची अत्यंत संतापजनक कृत्य केले आहे. या माणुसकीला काळिंबा फासणाऱ्या घटनेच्या निषेधार्थ श्री शिवप्रतिष्ठान, हिंदुस्थान कराडतर्फे मंगळवार, दि. १४ ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वाजता शिवतीर्थ दत्त चौक येथे ‘लेक वाचवा’ आंदोलनास प्रारंभ करण्यात येणार असल्याची माहिती श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे सातारा जिल्हा कार्यवाह सागर आमले यांनी दिली.
गांभीर्याने विचार करूया : या घटनेबाबत संताप व्यक्त करताना सागर आमले म्हणाले, आज सासपडे येथील एका कुटुंबातील चिमुरडीवर हा प्रसंग ओढवला आहे. म्हणून त्याकडे केवळ एक घटना म्हणून आपण गप्प बसलो, तर उद्या आपल्या बाबतीत असा घडल्यास? असा प्रश्न उपस्थित करून, सर्वांनी या घटनेचा गांभीर्याने विचार करून पाऊल उचलण्याची आवश्यकता आहे.
वेळीच बंदोबस्त करणे गरजेचे : लहान मुलांवरती होणारे अतिप्रसंग ही समाजाला लागलेली कीड आहे, त्याचा वेळीच बंदोबस्त करणे गरजेचे आहे.
नराधम मोकाट फिरू देऊ नयेत : तूर्तास, सातारा जिल्हा आणि महाराष्ट्रात जे कोणी बलात्काराच्या आरोपामध्ये पेरोल किंवा जामीनावर सोडण्यात आले आहेत, त्या सर्वांना तात्काळ अटक करून तुरुंगात टाकण्यात यावे, तसेच त्यांच्यावरील न्यायालयीन प्रक्रिया ही ते तुरुंगात असतानाच पूर्ण कराव्यात, हे समाजाला त्रास देणारे नराधम समाजात मोकाट फिरू देऊ नयेत. असल्या संतापचीने घटना परत होत राहिल्यास समाजाला त्यांच्याकडून धोका निर्माण होण्याची शक्यता आहे.
…यासाठी आंदोलनाचे पाऊल : या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर मंगळवार, दि. 14 रोजी शिवतीर्थ दत्त चौक येथे सर्व समाजबांधव, नागरिक एकत्र येऊन ‘लेक वाचवा’ या आंदोलनाला सुरुवात करणार आहोत. हे आंदोलन नसून, तुमची-आमची लेकरं सुरक्षित राहण्यासाठी उचललेले पाऊल आहे.
आवाहन : दिवाळी उत्सव साजरा होईल. परंतु, आजची पणती जपली नाही, तर उद्याच्या येणाऱ्या काळात कोणतीही आई, बहीण पणती लावायला सुरक्षित असणार नाही. त्यामुळे आपल्या बहिणीच्या सन्मानार्थ आपण सर्वांनी एकत्र येऊया, असे आवाहन श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, कराडतर्फे सागर आमले यांनी केले आहे.