राजेंद्रसिंह यादव केंद्रस्थानी; भावी नगराध्यक्ष म्हणून प्रमोशन, यादव-गुजर मनोमिलनाने रंगत

राजेंद्र मोहिते/कराड : –
कराड नगरपालिकेच्या भावी राजकीय समीकरणांची दिशा आता स्पष्ट होत असल्याची चिन्हे दिसू लागली आहेत. माजी उपनगराध्यक्ष राजेंद्रसिंह यादव यांच्या वाढदिवसानिमित्त झालेल्या भव्य सोहळ्याने कराडच्या राजकारणात नवे वारे वाहू लागल्याचे संकेत मिळाले आहेत. “भावी नगराध्यक्ष” आणि “शहर कुटुंब प्रमुख” असा उल्लेख असलेले शुभेच्छा फलक, व्यासपीठावर नेत्यांची उपस्थिती, समर्थकांचा मोठा उत्साह आणि प्रतिस्पर्ध्यांच्या शुभेच्छा यांमुळे कराड पालिकेचे नवे कॅप्टन अर्थात भावी नगराध्यक्ष म्हणून यादव यांच्या नावाची चर्चा सुरू झाली आहे.
आगामी राजकीय समीकरण : या सोहळ्यात पारंपरिक प्रतिस्पर्धी राजेंद्रसिंह यादव आणि इंद्रजीत गुजर एकत्र दिसले. गुजर यांची उपस्थिती आणि शुभेच्छा देणे; ही केवळ औपचारिकता नसून, आगामी राजकीय समीकरणांचा भाग असल्याच्या चर्चा शहरात रंगल्या आहेत. प्रभागरचनेच्या बदलाबदलीसंदर्भातील चर्चेतून हे मनोमिलन झाल्याची कुजबुज आहे. मात्र अंतिम रचना जाहीर झाल्यावरच या दोघांच्या भूमिकांचे खरे स्वरूप स्पष्ट होणार आहे.

भाजपला फायदा : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे समर्थक असलेल्या यादव यांची भाजपचे आमदार डॉ. अतुल भोसले यांच्याशी वाढती सलगी सर्वश्रुत आहे. त्यात व्यासपीठावर आमदारांची उपस्थिती ही भाजप-यादव समीकरणांना बळकटी देणारी ठरली आहे. त्याचा फायदा थेट भाजपला होऊ शकतो, असा सूर राजकीय चर्चांमध्ये उमटत असला, तरी सर्वांचा मेळ घालणे हे आमदारांपुढे एक आव्हानच आहे.
भूमिका गुलदस्त्यात : माजी नगरसेवक इंद्रजीत गुजर यांनी विधानसभा निवडणूक शेतकरी संघटनेकडून लढवली होती. शिवसेना (ठाकरे) व काँग्रेससोबतही त्यांचा संपर्क राहिला आहे. त्यामुळे त्यांची भूमिका अद्याप गुलदस्त्यात असल्याचे दिसत आहे. यादवांसोबतचे त्यांचे मनोमिलन हा आगामी रणनीतीचा भाग असल्याची चर्चा नागरिकांमध्ये आहे.
विजयसिंह यादवही रिंगणात?
राजकीय वर्तुळात विजयसिंह यादव यांच्या उमेदवारीचीही चर्चा रंगली आहे. राजेंद्रसिंह यादवांनी एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी विजयसिंहांची भूमिका वेगळी होती. नंतर त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत दाखल होत वेगळा मार्ग स्वीकारला. युवा वर्गात त्यांचा प्रभाव मोठा असल्याने ते थेट निवडणुकीत उतरणार की त्यांची स्वीकृत नगरसेवक म्हणून वर्णी लागणार, याबाबत त्यांच्या समर्थकांमध्ये चर्चा आहे.












