कराड व मलकापुरात होणार ‘नमो उद्यान’ 

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा.

आ.डॉ. अतुल भोसले यांच्या प्रयत्नांतून २ कोटींचा निधी मंजूर

कराड/प्रतिनिधी : –

राज्य शासनाने राज्यातील नगरपरिषद व नगरपंचायत क्षेत्रात ‘नमो उद्यान’ उभारण्याचा निर्णय घेतला आहे. या योजनेमध्ये भाजपाचे जिल्हाध्यक्ष आ.डॉ. अतुल भोसले यांच्या विशेष प्रयत्नांमुळे कराड व मलकापूर शहराचाही समावेश करण्यात आला असून, याठिकाणी ‘नमो उद्यान’ साकारण्यासाठी एकूण २ कोटींचा निधी मंजूर झाला आहे.

नगरपालिकांना प्रत्येकी १ कोटी : राज्यातील शहरी भागात हरित उद्यानांचे जाळे निर्माण करण्यासाठी राज्य शासनाने ‘नमो उद्यान योजना’ सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या योजनेसाठी तब्बल ३९४ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून, राज्यातील नगरपरिषद व नगरपंचायत क्षेत्रात ‘नमो उद्यान’ साकारण्यासाठी नगरपालिकांना प्रत्येकी १ कोटींचा निधी वितरित केला जाणार आहे.

प्रयत्नांना यश : या योजनेत कराड आणि मलकापूर शहराचाही समावेश व्हावा, यासाठी भाजपाचे जिल्हाध्यक्ष आ.डॉ. अतुल भोसले प्रयत्नशील होते. त्यांच्या या प्रयत्नांमुळे कराड आणि मलकापूर येथे नमो उद्यान साकारण्यासाठी प्रत्येकी १ कोटीप्रमाणे एकूण २ कोटींचा निधी मंजूर झाला आहे.

महत्त्वाकांक्षी योजना : ‘नमो उद्यान’ ही योजना केवळ हरित पट्टे उभारण्यापुरती मर्यादित नसून, ती शहरी जीवनमान सुधारण्याची महत्त्वाकांक्षी योजना आहे. या उद्यानांमुळे नागरिकांना निरोगी व शुद्ध हवा मिळून त्यांचे आरोग्य सुधारण्यास मदत होणार आहे. तसेच लहान मुलांना खेळण्यासाठी आधुनिक साधने आणि युवक व महिला यांच्यासाठी व्यायाम साधनांची सुविधा उपलब्ध होणार आहेत. याशिवाय ज्येष्ठ नागरिकांसाठी वॉकिंग ट्रॅक व शांत विश्रांती स्थळेही निर्माण केली जाणार आहेत. या हरित उद्यानांमुळे शहरातील प्रदूषण कमी होण्यासही मदत होणार असून, शहराच्या सौंदर्यात भर पडणार आहे.

स्पर्धेत नगरपालिकांना बक्षीस : या उद्यानांची उभारणी केल्यानंतर शासनाकडून या उद्यानांची राज्यस्तरीय स्पर्धा घेण्यात येणार आहे. यामध्ये पहिल्या तीन क्रमांकांसाठी नगरपालिकांना बक्षीस म्हणून अनुक्रमे ५ कोटी, ३ कोटी व २ कोटी रुपयांचे अतिरिक्त अनुदान देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.

‘नमो योजनेअंतर्गत कराड व मलकापूरमध्ये लवकरच उद्याने उभारली जाणार असून, त्याचा लाभ नागरिकांना होणार आहे. तसेच कराड व मलकापूर शहराच्या सौंदर्यात भर पडण्यास मदत होणार आहे.

– आ.डॉ. अतुल भोसले

(जिल्हाध्यक्ष, भाजपा) 

Jan Swarashtra
Author: Jan Swarashtra

आणखी वाचा

Buzz4 Ai
error: Content is protected !!