शिक्षण-तंत्रज्ञानातूनच भारताचे भविष्य उज्ज्वल

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा.

डॉ. बाबासाहेब कल्याणी; महाराष्ट्र भूषण पुरस्काराने गौरव; पी.डी. पाटील यांचे कार्य आदर्शवत

कराड/प्रतिनिधी : –

देश पुढे न्यायचा असेल, तर उद्योगासोबत शिक्षण, ज्ञान आणि तंत्रज्ञान यांची सांगड घालणे गरजेचे आहे. फक्त एआयसारख्या तयार तंत्रज्ञानावर अवलंबून न राहता, ते निर्माण करण्याची क्षमता आपल्या तरुणाईत आहे. उद्योग, व्यवसाय केवळ नफा कमावण्याची साधने नसून गाव, समाज आणि देशाच्या विकासाची बलस्थाने असली पाहिजेत. सर्वांनी हा विचार केल्यास देश झपाट्याने पुढे जाईल, असे प्रतिपादन भारत फोर्जचे अध्यक्ष व आंतरराष्ट्रीय कीर्तीचे उद्योगपती पद्मभूषण डॉ. बाबासाहेब कल्याणी यांनी केले.

पुरस्कार वितरण : येथील यशवंतराव चव्हाण स्मृतीसदनात आयोजित कार्यक्रमात पी.डी. पाटील गौरव प्रतिष्ठानतर्फे दिला जाणारा ‘महाराष्ट्र भूषण पुरस्कार-२०२५’ उद्योगपती डॉ. बाबासाहेब कल्याणी यांना ज्येष्ठ गांधीवादी नेते, माजी आमदार उल्हासदादा पवार यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. याप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील होते.

खरी उपलब्धी : श्री. कल्याणी यांनी आपल्या उद्योग क्षेत्रातील वाटचालीसह समाजाभिमुख कार्यांचा आढावा घेतला. भारत फोर्जच्या सीएसआर उपक्रमांतर्गत सातारा जिल्ह्यातील शेकडो गावांमध्ये शिक्षण, स्वच्छता, रस्ते, पाणी या मूलभूत सोयीसुविधांची उभारणी झाली आहे. गावातील लोकांच्या सहभागामुळे या भागातील घरगुती उत्पन्न पाचपट वाढले असून, दोन वर्षांत ते आठपट नेण्याचे ध्येय आहे. गाव सोडून गेलेले लोक पुन्हा गावाकडे परतत आहेत, हीच खरी उपलब्धी आहे.

देश संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भर : देशाच्या प्रगतीबाबत बोलताना श्री. कल्याणी म्हणाले, आज भारत वेगळ्या गतीने पुढे जात आहे. मेक इन इंडियाच्या माध्यमातून आपण संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भर झालो आहोत. आर्थिक सामर्थ्य आणि लष्करी ताकद ही देशाची खरी ओळख असून, त्यामुळे कोणताही देश आपल्याला कमी लेखू शकत नाही. भविष्यातील भारत हा शिक्षण, ज्ञान, तंत्रज्ञान आणि ग्रामविकास यांच्या बळावर सक्षम होईल.

आपल्या मातीतला पुरस्कार आनंददायी : पी.डी. पाटील पाटील यांनी तब्बल ४३ वर्षे नगराध्यक्षपद भूषवत कराड शहराचा आमूलाग्र विकास केला, आदर्श सांडपाणी व्यवस्था राबवली, दूरदृष्टीतून चांगले काम करण्याची हिम्मत दाखवली. आज त्यांच्या प्रतिष्ठानचा मिळणारा पुरस्कार हा आपल्या मातीतला पुरस्कार असल्याने आनंददायी असल्याचे डॉ. कल्याणी यांनी सांगितले. तसेच पुरस्काराची रोख रक्कम त्यांनी प्रतिष्ठानलाच देणगीरुपी परत केली.

पी.डी. पाटील यांनी सर्वांगीण विकास केला : यशवंतराव चव्हाण यांच्या प्रभावळीत अनेक लोक होते, त्यात एक पी.डी. पाटील होते, असे सांगत उल्हासदादा पवार म्हणाले, त्यांनी कराड शहराचा सर्वांगीण विकास घडवून आणला. त्यांचा सामाजिक व राजकीय वारसा पुढे नेण्याचे काम बाळासाहेब पाटील करत आहेत. सातारा जिल्ह्यात स्वातंत्र्यपूर्व काळापासून किर्लोस्कर, ओगले, कल्याणी हे उद्योजक होते. आज बाबासाहेब कल्याणी उद्योग क्षेत्रात अग्रणी आहेत. कल्याणी यांच्या सामाजिक बांधिलकीचे कौतुक करत, त्यांच्या कार्याची यशस्वी पताका जगभरात उंचावेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

गावाची नाळ कायम : कराड, साताऱ्याच्या जडणघडणीत यशवंतराव चव्हाण यांच्यासह अनेकांनी योगदान दिले. यांत उद्योजक निळकंठराव कल्याणींचाही समावेश असल्याचे सांगत बाळासाहेब पाटील म्हणाले, त्यांनी देश व जागतिक पातळीवर मोठे नाव कमावले. त्यासोबतच त्यांनी सातारा, कराडसह आपल्या गावाची नाळ कायम ठेवत सामाजिक बांधिलकी जोपासली. आज उद्योग, व्यवसाय पुढे नेत सीएसआरच्या माध्यमातून जवळपास १२० गावे दत्तक घेऊन तेथे सोयीसुविधा निर्माण करण्याचे काम बाबासाहेब कल्याणी करत आहेत. जिल्ह्यात त्यांनी मोठे काम उभारले आहे. तसेच साहित्यिक, राजकारणी, समाजकारणी उल्हासदादा पवार यांनीही लोकहिताची अनेक कामे केली. या दोघांचे कार्यक्षेत्र पुणे असले, तरीही त्यांनी आपल्या सातारा जिल्ह्याची नाळ कायम ठेवल्यास त्यांनी सांगितले.

विकासाचा कराड पॅटर्न : प्रास्ताविकात अशोक गुजर यांनी प्रतिष्ठानच्या कार्याचा आढावा घेत पी.डी. पाटील यांनी कराड शहराच्या केलेल्या सर्वांगीण विकासाचा पॅटर्न राज्यभरासाठी आदर्शवत ठरल्याचे सांगितले.

स्वागत : प्रारंभी, विठामाता विद्यालयाच्या विद्यार्थिनींनी स्वागतगीत सादर केले. प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष अशोकराव गुजर व विश्वस्त रेश्मा कोरे स्वागत यांनी केले. परिचय विजय साळुंखे व शहाजी क्षीरसागर यांनी करून दिला. मानपत्र वाचन अॅड. मानसिंगराव पाटील यांनी, तर दिलीपराव चव्हाण यांनी आभार मानले. पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.

लोकशाहीचे अस्तित्व संपल्यासारखे वाटते

आजची राजकीय परिस्थिती विदारक वाटते. समाजातील भान, शांतता, आपलेपणाची भावना कमी होत चालली आहे. मतभिन्नताही लोकशाही जिवंत असल्याचे लक्षण असल्याचे यशवंतराव चव्हाण म्हणायचे. परंतु, आज मनभेद व व्यक्तीभेद वाढले असून, लोकशाहीचे अस्तित्व संपल्यासारखे वाटत असल्याची खंत उल्हासदादा पवार यांनी व्यक्त केली.  

Jan Swarashtra
Author: Jan Swarashtra

error: Content is protected !!