सुहास जगताप यांच्याकडून गणेशभक्तांना ४२ हजार मोदकांचे वाटप

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा.

विकासनिधीच्या आनंदाप्रित्यर्थ उपक्रम; शहरात ११ वर्षांची मोफत रिक्षा सेवा 

कराड/प्रतिनिधी : – 

सामाजिक कार्यात नेहमीच आघाडीवर असणारे कराड नगरपालिकेचे माजी नगरसेवक सुहास जगताप यांनी यंदाच्या गणेशोत्सवातही कराडकरांच्या मनात आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे. गणेशोत्सव आणि शहराच्या विकासासाठी आमदार डॉ. अतुल भोसले यांच्या प्रयत्नांतून मंजूर झालेला १० कोटींचा निधी या दुहेरी आनंदाप्रित्यर्थ त्यांनी शहरभर तब्बल ४२ हजार मोदकांचे वाटप करून नागरिकांच्या चेहऱ्यावर आनंद फुलवला.

२१ मोदकांचे दोन हजार बॉक्स वाटप : माजी नगरसेवक सुहास जगताप यांच्यातर्फे शहरातील शिवतीर्थ दत्त चौक, सोमवार पेठ, जोतिबा मंदिर परिसरासह शहरातील प्रत्येक भागात २१ मोदकांचे दोन हजार बॉक्स वाटप करण्यात आले. नागरिकांनी या उपक्रमाचे मनापासून स्वागत करत समाधान व्यक्त केले. गणेशभक्तांसाठी हा गोडवा म्हणजे उत्सवाचा अतिरिक्त सोहळा ठरला.

सलग ११ वर्षे मोफत रिक्षा : गणेशभक्तांना दिलासा देणारा आणखी एक उपक्रम म्हणजे मोफत रिक्षा सेवा. सलग ११ वर्षे सुहास जगताप यांनी ही परंपरा जपली असून, यंदाही ३० रिक्षांची मोफत सोय करून शहरातील कोणत्याही भागातून गणेशमूर्ती घरापर्यंत नेण्याची सोय करण्यात आली. भाविकांनी या उपक्रमाचा मोठ्या प्रमाणावर लाभ घेतला.

कराड स्मार्ट शहर बनविण्यासाठी उपयुक्त : कराड शहराच्या विकासासाठी मंजूर झालेल्या निधीबद्दल आनंद व्यक्त करताना सुहास जगताप म्हणाले, श्री गणेशाच्या आशिर्वादाने आणि आमदार डॉ. अतुल भोसले यांच्या प्रयत्नामुळे १० कोटी निधी मंजूर झाला आहे. हा निधी कराड स्मार्ट शहर बनविण्यासाठी उपयुक्त ठरेल. मात्र, त्याचबरोबर लोकांमध्ये आनंद वाटणे हे माझे कर्तव्य मानतो, असे मतही त्यांनी व्यक्त केले.

Jan Swarashtra
Author: Jan Swarashtra

error: Content is protected !!