भाग : दहावा
दिवाळीच्या पहिल्या दिवशी अभ्यंगस्नान झाले आणि सगळे मित्रमंडळ एकमेकांना शुभेच्छा देण्यासाठी म्हणून एकत्रित जमले. यामध्ये अर्थातच शुभेच्छा कमी व वासोट्याला कधी जायचे याचीच जास्त चौकशी किंवा चर्चा सुरू होती. शिवाय केवळ उत्सुकतेपोटी आमच्यापेक्षा वयाने लहान असणाऱ्या सवंगड्यांना सोबत काय काय घ्यायचे याचीच अधिक काळजी लागली होती. खरं म्हणजे त्यांना आपल्याला कुठे व कसे जायचे आहे, किती परिश्रम घ्यावे लागणार आहेत, तिथे गेल्यावर कसे रहावे लागणार आहे याची तसूभरही जाणीव नव्हती.
फक्त आमचा पूर्वानुभव ऐकून त्यांनाही स्फुरण चढले होते. प्रत्यक्षात तिथे गेल्यावर *”जे काही होईल ते बघू”* अशी एक बेफिकीरपणाची झलक त्यांच्यात दिसत होती. पण मी, विजय, आनंद व नितीन मात्र सगळ्या गोष्टींचा सारासार विचार करण्यात मग्न होतो. कारण या सगळ्यांना सोबत घेऊन जाणे म्हणजे खऱ्या अर्थाने आमची सत्वपरीक्षा ठरणार होती. शिवाय सोबत येणाऱ्यांची संख्या विचारात घेतली तर तेव्हढ्याच प्रमाणात साहित्य घ्यावे लागणार होते. शिवाय थंडीचे दिवस असल्याने त्याचीही सोय गरजेची होती. इतक्या साहित्याचा बोजा पाठीवर घेऊन त्यातील किती जण चढाई करू शकतील याची खात्री देता येत नव्हती.
असे सगळे असले तरी *”मी येणार”* असे म्हणणाऱ्यांची संख्याही काही कमी नव्हती. अर्थात त्यातील अर्धेअधिक घरातून नकार घंटा वाजल्याने हिरमुसून गेले व त्यांनी लढाई सुरू होण्याआधी माघार घेतली.
वयाने जे अगदी लहान होते त्यांच्या प्रत्येकाच्या घरी जाऊन मी स्वतः संमती मिळवत होतो व “तू जबाबदारी घेत असलास तर घेऊन जा” असे अनेक पालकांनी बजावले. हो नाही करता टीम तयार झाली.
मोहिमेवर निघण्याचा मुहूर्त निश्चित झाला. भाऊबीजेच्या दिवशी ज्यांना बहिण आहे त्यांनी पहाटे लवकर औक्षण करून तयार राहायचे व सकाळी सात वाजता एकत्रित हजर होऊन बस स्थानक गाठायचे इथपर्यंत आराखडा तयार झाला. पण तत्पूर्वी आम्ही साहित्याची विभागणी करून दिली होती. म्हणजे सगळेच साहित्य सगळ्यांनीच न घेता प्रत्येकाला वेगवेगळे साहित्य घेण्यास सांगितले होते. शिवाय कोण काय घेणार याची यादी करून ती प्रत्येकाला स्वतंत्रपणे दिली होती.
एका अर्थी लढाई, की चढाईची सगळी तयारी अगदी काळजीपूर्वक पार पडली होती. भाऊबीजेच्या दिवशी ठरलेल्या वेळी एका पाठोपाठ एक जमायला सुरुवात झाली. ज्यांचे वय अगदी कमी होते असे बरेच यावेळी येण्यातून टळले होते. मी, विजय व अजय पाटील, आनंद व अमर रेमणे हे बंधु, अलंकार जोशी, विक्रांत देशपांडे, मंदार जोशी (बंड्या सध्या रा सातारा), जितेंद्र गाडगीळ, नितीन मोरे, मंदार जोशी, आप्पा माने, शिरीष जोशी, ऋषिकेश गिजरे हे देखील येऊन दाखल झाले.
अगदी ठरल्या दिवशी व वेळी आम्ही पुन्हा एकदा वासोट्याला कूच केले. यावेळेस फारसे काही विशेष घडले नसले तरी एक धक्कादायक प्रकार आमच्या निदर्शनास आला.
आम्ही प्रथम भेटीत दोन तोफा पाहिल्या होत्या. पण आता त्या तिथे दिसत नव्हत्या. कुठे गेल्या असतील त्या तोफा? प्रश्न निर्माण झाला. नेमका त्याच वेळी आणखी एक शिवप्रेमी ग्रुप गडावर आला होता. त्यातील एकाने त्या तोफांचा खुलासा केला आणि तो ऐकून आमच्या “तळपायाची आग मस्तकात” गेली. कुणी तरी टवाळखोर, विघ्नसंतोषी मंडळींनी त्या तोफा गडावरून खाली ढकलून दिल्याचे त्याने सांगितले.
खरंच ज्यांना इतिहास रुचत नाही, खपत नाही, सोसत नाही आणि सहनही होत नाही त्यांनी गडावर जायचे कशाला? हे म्हणजे *”देव मानत नाही पण मंदिरात जायचे आहे”,* असे म्हणण्या इतकेच दुर्दैवी आहे.
असो! पण आमच्या या दुसऱ्या भ्रमंतीतूनच पुढे जाऊन आम्ही *”गर्जना हायकर्स ग्रुप”* नावाने मयूर गणेश मंडळाची उपशाखा सुरू केली. त्यानंतर दिवाळी भाऊबीज व मे महिन्यात अगदी प्रत्येक वर्षी नवनवीन गडकिल्ल्यांची भ्रमंती करण्याची जणू परंपरा सुरू झाली. पुढे गेल्यावर त्यामध्ये तुषार आराणके, मिलींद गरुड, मिलींद नावडीकर अशा काही मित्रांची भर पडत राहिली. सज्जनगडावर वास्तव्यास असताना तेथील पाठशाळेतील विद्यार्थ्यांना सुद्धा वासोटा व रायगडाची सर घडवून आणली होती.
शिवाय मागील काही वर्षात माझा मित्र, शिवभक्त, दुर्गप्रेमी पत्रकार राजेंद्र मोहिते याच्या समवेत (आम्ही दोघेच) मंडणगड, वैराटगड, मोरगिरी अशी भ्रमंती केली.
आजपर्यंत जंगली जयगड, भैरवगड, प्रचितगड (३ वेळा), तिकोना ते भीमाशंकर, ढाकचा बहिरी (२ वेळा), भाजे लेणी, बेडसे लेणी, चकदेव ते महाबळेश्वर, गगनगड ते विशाळगड, रायगड (५ वेळा), राजगड, हरिश्चंद्रगड, रतनगड, कळसुबाई शिखर अशी बरीच भ्रमंती करून झाली. त्या सर्व भ्रमंतीच्या आठवणी ताज्या करायच्या म्हणजे किमान शंभर लेखमाला लिहाव्या लागतील.
पण या लेखमालेची समाप्ती करण्याआधी पुन्हा एकदा आमच्या त्याच दिव्यानुभूतीला उजळणी देणार आहे. तुम्हाला आठवला का तो श्वान? पण केवळ तो एकच श्वान फक्त तेव्हढ्याच कालावधी पुरता आमच्या सोबत होता का? या प्रश्नाचे उत्तर नकारार्थीच द्यावे लागेल. कारण मी, विजय व अलंकार महाबळेश्वर सायकल प्रवास केला तेव्हाही तो सोबत करत होता. प्रचितगड असो की अन्य कोणत्याही भ्रमंतीत ‘ *या* ‘ ना ‘ *त्या* ‘रुपात तो उपस्थित असायचाच! याबाबतीत अगदी अलीकडच्या काळातील अनुभव सांगण्याजोगा आहे.
दिनांक २५ डिसेंबर २०२४ रोजी मी चि. कल्याण व कैवल्य अलंकार जोशी, रोहित ऋषिकेश गिजरे व हर्षद वावगे (पुणे) असे पाच जण राजगडावर निघालो. गुंजवणे गावात पोहोचलो तेव्हा संध्याकाळचे सात वाजून गेले होते. रोहित व त्याचा मित्र हर्षद पुण्यातून थेट येणार होते. त्यांची वाट पाहण्यात काही वेळ निघून गेला. साधारणपणे रात्री ८ च्या सुमारास आम्ही राजगडाची चढाई सुरू केली.
यावेळी माझे श्वान (रुसी) आधीपासूनच सोबतीला होते. परंतु जेव्हा काळोखात आम्ही चढण सुरू केली तेव्हा आमच्या पाठोपाठ आणखी एक श्वान येऊन दाखल झाला. चोर दरवाज्याने चढाई करायची असे माझ्या अपरोक्ष या युवा सवंगड्यांनी आधीच ठरवून ठेवले होते. हा मार्ग किती जोखमीचा आहे याबद्दल मी अनभिज्ञ होतो. आपल्या नंतरची पुढची पिढी आपल्या पावलावर पाऊल टाकते आहे याचेच समाधान होत होते.
आमच्या सोबतीला आलेले ते श्वान पाठीमागूनच चालत होते परंतु जेव्हा आमची खरी कसोटी सुरू झाली तेव्हा, अगदी तत्क्षणी तो पुढे उभा ठाकत होता. अनेक ठिकाणी कुठून व कसे वर चढायचे असे वाटले त्या त्या ठिकाणी तो श्वान झटदिशी पुढे सरसावून आम्हाला जणू मार्गदर्शन करत होता. मध्यरात्रीच्या सुमारास चोर दरवाजा ओलांडून आम्ही प्रवेश केला. पायऱ्या चढून वर आलो. तो देखील तिथपर्यंत येऊन दाखल झाला. आम्ही काही वेळ विसावलो व उठून चालू लागलो त्या नंतर मात्र तो श्वान दिसेनासा झाला. आम्ही रात्री गडावर मुक्काम केला व दुसऱ्या दिवशी तिथून निघालो तरीही आम्हाला गुंजवणे ते चोर दरवाजा पर्यंत साथसोबत करणारा तो श्वान तिथून पुढे आमच्या नजरेस पडला नाही.
हे सर्व जेव्हा घडत होते तेव्हा माझी नजर सतत त्याच्या हालचाली टिपत होती. बाकी मुले त्यांच्या नादात रमलेली होती. पण सुमारे ३४ वर्षांपूर्वी आमची साथसोबत करणारा ‘ *तो* ‘ श्वान आणि मधल्या काळातील असंख्य पदभ्रमंतीत आमची पाठराखण करणारा आणि नुकताच भेटलेला ‘ *हा* ‘ श्वान यात काही साम्य आहे का?
पहा! *”जशी दृष्टी तशीच सृष्टी”* असे म्हटले जाते. आज अखेर अगदी संकटाच्या व जीवावर बेतलेल्या क्षणी ‘ *तो* ‘ श्वान मदतीला धावून आला.
व्यक्तिगत पातळीवर सांगायचे तर *”तो साक्षात दत्त महाराजांचा दूत होता”.* एका अर्थी प्रत्यक्ष दत्तगुरुच सर्व प्रसंगात आमची पाठराखण करत होते असे म्हणूया! त्यामुळे तर आज पर्यंत हृदयाच्या गाभाऱ्यात वास्तव्य करणारे महाराज आता आमच्या घरातच वास्तव्य करून राहिले आहेत. *”सुज्ञास अधिक सांगणे न लगे”!!*
आता या लेखमालेचा शेवट करण्यापूर्वी आमचे परमप्रिय मित्र असलेले सचिन रेठरेकर, शिरीष जोशी, मंदार मदन जोशी, मनोज फाटक, विजय उंडाळकर यांना भावपूर्ण नमन करतो. धन्यवाद!











