सद्गुरु गाडगे महाराज महाविद्यालयात शनिवारी येणार इस्रोची बस
कराड/प्रतिनिधी : –
लक्षावधी किलोमीटर दूर असूनही इथून दिसणारे सूर्य, चंद्र, तारे आणि एकूणच अंतराळाचे विद्यार्थ्यांना कायम कुतूहल असते. त्याची वैज्ञानिक माहिती घेऊन अंतराळात सफारीचा अनुभव घेण्यासाठी भारतीय अंतराळ संस्थेने ‘इस्रो’ मोहीम हाती घेतली त्यांतर्गत येथील सद्गुरु गाडगे महाराज महाविद्यालयाच्या विद्यार्थांना ‘इस्रो’ अंतराळाची सफर घडवणार आहे.
अंतराळाची मिळणार वैज्ञानिक माहिती : केंद्र सरकारचा उपक्रम असलेल्या ‘इस्रो’ने यासाठी एक बस तयार केली असून विद्यार्थ्यांना बसच्या माध्यमातून गृह, तारे पाहण्याची, त्यांची अनुभूती घेत अंतराळाची वैज्ञानिक माहिती घेता येणार आहे. शनिवार (दि. १८) रोजी या बसचे सगाम महाविद्यालयात आगमन होणार आहे. अंतराळातील घडामोडींची माहिती व खगोल विज्ञानाची गोडी निर्माण करण्याची संधी विद्यार्थ्यांना यामुळे मिळणार आहे. या बसच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना ग्रह व ताऱ्यांची वैज्ञानिक माहिती घेता येणार असल्याने विद्यार्थ्यांमध्ये अंतराळाची गोडी निर्माण होईल.
शाळा महाविद्यालयांनी सहभागी व्हावे : महाराष्ट्रभर फिरणाऱ्या या उपक्रमाचा लाभ घेण्याचे संधी सगाम महाविद्यालयाला प्राप्त झाली आहे. शनिवारी सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत या बसची विद्यार्थ्यांना सफर घडणार आहे. तरी कराड आणि परिसरातील बहुसंख्य विद्यार्थी व शाळांनी सहभाग घेऊन या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मोहन राजमाने यांनी केले आहे.