उद्योजकतेला सामाजिक बांधिलकीची जोड हवी 

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा.

सुनील पाटील; एन. पी. फिशतर्फे पत्रकारांचा सन्मान 

कराड/प्रतिनिधी : – 

यशस्वी उद्योजक होण्यासाठी जिद्द, कष्ट आणि काहीतरी नाविन्यपुर्ण करण्याची इच्छाशक्ती असायला हवी. तसेच आपल्यासोबत इतरांनाही प्रवाहात आणण्यासाठी त्यांना हात द्यायला हवा. यासाठी उद्योजकतेला सामाजिक बांधिलकीची जोड दिल्यास उद्योग, व्यवसाय आणखी भरभराटीला येतो, असे प्रतिपादन एन. पी. फिश उद्योग समूहाचे सुनील पाटील यांनी केले.

पत्रकार सन्मान सोहळा : नांदलापूर (ता. कराड) येथील हॉटेल एन. पी. फिशमध्ये एन. पी. फिश उद्योग समूहाच्या माध्यमातून आणि इंद्रधनु फाउंडेशन यांच्या सहकार्याने पत्रकार सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी एन. पी. फिश उद्योग समूहाचे प्रमुख काशिनाथ पाटील होते. यावेळी अजित पाटील, सत्यवान पाटील, सुनील पाटील उपस्थित होते. 

सन्मान : या समारंभात ज्येष्ठ पत्रकार शंकरराव पाटील, उदय किरपेकर, मुकुंद भट, प्रा. अशोक चव्हाण यांच्यासह विशेष निवड झाल्याबद्दल संतोष शितोळे यांना मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात आले. तसेच उपस्थित सर्व पत्रकारांचाही मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

व्यवसायाची कल्पना : लॉकडाऊनमध्ये सर्व उद्योग, व्यवसाय बंद असल्याने सर्वांवर घरी बसण्याची वेळ आली होती. अशावेळी घरी मासे खायला आणल्यानंतर ग्रामीण भागातील लोकांना समुद्राचे ताजे व त्यांच्या खिशाला परवडेल अशा दरात मासे उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने या व्यवसायाची कल्पना सुचल्याचे सांगताना श्री पाटील म्हणाले, जवळपास 60 – 65 वर्षांपूर्वी वडील मुंबई मच्छी मार्केटला नोकरीस होते. नोकरी करत त्यांनी स्वतःच्या छोट्या व्यवसायास सुरुवात केली. त्याच व्यवसायाला एन. पी. फिशच्या माध्यमातून मूर्त स्वरूप दिले. यामध्ये वडिलांच्या अनुभवाचा मोठा फायदा झाला.

कराडच्या खाद्य संस्कृतीची ओळख : आज सातारा, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यात जवळपास 12 शाखा असून लवकरच आणखी शाखाविस्तार करण्याचा मानस असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच एन. पी. फिश ही कराडच्या खाद्य संस्कृतीची ओळख झाली असून या ठिकाणी समुद्रातील सर्व प्रकारचे मासे उपलब्ध आहेत. यालाच आम्ही हॉटेल व्यवसायाचीही जोड दिली असून त्यासही खवय्यांचा भरभरून प्रतिसाद मिळत असल्याचे श्री पाटील यांनी सांगितले.

सामाजिक बांधिलकी : एन. पी. फिशच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जोपासत वेळोवेळी रक्तदान शिबिर, आरोग्य शिबिर व विविध धार्मिक कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात येते. त्याचदृष्टीने लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या पत्रकारांचा मराठी पत्रकार दिनाचे औचित्य साधून सन्मान करण्याच्या दृष्टीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

नांदलापूर : पत्रकार सन्मान सोहळ्यास उपस्थित सर्व पत्रकारांसह मान्यवर.

स्वत्वाची जाणीव झाल्यास माणूस मोठा होतो : सत्काराला उत्तर देताना प्रा. अशोक चव्हाण म्हणाले, 60 – 70 वर्षांपूर्वी मुंबईसारख्या ठिकाणी जाऊन, हाल अपेष्टा सोसत उद्योग, व्यवसायाच्या माध्यमातून स्वतःची ओळख निर्माण केलेले अनेक लोक आज कराड, पाटण सारख्या ग्रामीण भागात आहेत. माणसाला जेव्हा स्वत्वाची जाणीव होते, तेव्हा माणूस मोठा होतो. ही त्याचीच उदाहरणे आहेत. अशा माणसांचा शोध घेऊन त्यांचा संघर्ष शब्द रूपात मांडायला हवा, अशी अपेक्षा त्यांनी यावेळी पाटील बंधूंकडे व्यक्त केली.

सर्वसमावेशक भूमिका घेऊन वाटचाल करा : तत्कालीन प्रस्थापितांच्या विरोधात बहुजन समाजातील पत्रकारांना कशा प्रकारचा संघर्ष करावा लागला, यावरही प्रकाशझोत टाकत पूर्वीची पत्रकारिता आणि आताची पत्रकारिता यावर बोलके भाष्य केले. तसेच मुद्रित माध्यमांसमोर असलेली आव्हाने सांगताना इलेक्ट्रिक व सोशल माध्यमांच्या स्पर्धेत टिकण्यासाठी आवश्यक कौशल्ये पत्रकारांनी आत्मसात करावीत. त्याचबरोबर पत्रकारांनी सर्वसमावेशक भूमिका घेऊन वाटचाल केल्यास भावी पिढीही त्यांचे योगदान लक्षात ठेवेल, अशी अपेक्षाही प्रा. चव्हाण यांनी व्यक्त केली.

पत्रकारांचे सहकार्य राहील : मनोगतात सतीश मोरे यांनी कराडच्या खाद्य संस्कृतीचा एक घटक म्हणून नावारूपाला येणाऱ्या एन.पी.फिश कंपनीला शुभेच्छा देत त्यांना पत्रकारांकडून आवश्यक ते सहकार्य केले जाईल, अशी ग्वाही दिली.

प्रास्ताविक व आभार : प्रास्ताविक नितीन ढापरे यांनी केले. सूत्रसंचालन प्रमोद तोडकर यांनी, तर सुनील पवार यांनी आभार मानले. कार्यक्रमास मोठ्या संख्येने पत्रकारांची उपस्थिती होती.

संघर्षनायकांचा संघर्ष शब्दरूपात मांडणार 

ज्येष्ठ पत्रकार प्रा. अशोक चव्हाण यांनी मांडलेल्या कल्पनेवर बोलताना उद्योजक सुनील पाटील म्हणाले, कराड व पाटण सारख्या ग्रामीण भागातून मुंबईला पायी चालत जात, परिस्थितीशी संघर्ष करत उद्योग, व्यवसायाच्या माध्यमातून स्वतःची ओळख निर्माण केली. अशा संघर्ष नायकांचा शोध घेऊन त्यांच्या संघर्ष शब्द रूपात मांडण्याचा प्रयत्न करणार असून पुढील पत्रकार सन्मान सोहळ्यात या पुस्तकाचे नक्कीच प्रकाशन करू, अशी ग्वाही त्यांनी दिली. तसेच हॉटेल एन. पी. फिशचा हॉल पत्रकार व त्यांच्या कौटुंबिक कार्यक्रमांसाठी मोफत देण्यात येईल, अशी घोषणाही त्यांनी यावेळी केली.

Jan Swarashtra
Author: Jan Swarashtra

Leave a Comment

आणखी वाचा

  • Buzz4 Ai
  • Buzz Open / Ai Website / Ai Tool
error: Content is protected !!