कराड/प्रतिनिधी : –
राज्यात महायुतीची सत्ता आल्यानंतर मला मंत्रिपद मिळावे, अशी मतदारसंघातील लोकांची इच्छा होती. आमचे नेते, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मला संधी दिल्याने मतदारसंघासह जिल्ह्यातील सर्व हितचिंतकांना आनंद झाला आहे. आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार दिवंगत यशवंतराव चव्हाण यांनी राज्याला वेगळी दिशा, विचार दिले आहेत. त्याच विचारांची कास धरून मला मिळालेल्या संधीचे सोने करणार असल्याचे मत मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केले.
अभिवादन : मंत्रीपद मिळाल्यानंतर मकरंद पाटील यांनी दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी अभिवादन केले. यावेळी माध्यमांशी संवाद साधताना ते बोलत होते.
उपस्थित मान्यवर : यावेळी खा. नितीन पाटील, आ. मनोज घोरपडे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सोळसकर, राजेश पाटील -वाठारकर, माजी आ. आनंदराव पाटील, नितीन भरगुडे – पाटील, कराडचे माजी उपनगराध्यक्ष राजेंद्र यादव, विजय यादव आदींची उपस्थिती होती.
महायुतीकडून साताऱ्याचा सन्मान : राज्याच्या राजकीय इतिहासात पहिल्यांदाच सातारा जिल्ह्याला एकाच वेळी चार कॅबिनेट मंत्रीपदे मिळाली असल्याचे सांगत मंत्री पाटील म्हणाले, हा महायुतीने जिल्ह्याचा मोठा सन्मान केला आहे. मात्र, पालकमंत्री पदाबाबतचा निर्णय आमचे नेते, अजित पवार, देवेंद्र फडणवीस व एकनाथ शिंदे हे तिघे मिळून घेतील. ते जो निर्णय घेतील, त्यानुसार आम्ही दोघेही काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
जल्लोषी स्वागत : शहरातील दत्त चौकातील शिवतीर्थावर यशवंत विकास आघाडीचे अध्यक्ष राजेंद्रसिंह यादव व विजयसिंह यादव मित्र परिवाराच्यावतीने मंत्री मकरंद पाटील यांचा भव्य सत्कार करून त्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी यशवंत विकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
“विरंगुळा” राजकीय क्षेत्रातील पवित्र वास्तू
राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी बुधवारी सायंकाळी आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी अभिवादन केल्यानंतर त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज हाउसिंग सोसायटीतील यशवंतराव चव्हाण यांच्या “विरंगुळा” या निवासस्थानी भेट दिली. तसेच येथील त्यांच्या विविध छायाचित्रांचे पाहणी केली. यावेळी “विरंगुळा” ही महाराष्ट्राच्या राजकीय क्षेत्रातील सर्वात पवित्र वास्तू असल्याचे मत मंत्री पाटील यांनी यावेळी व्यक्त केले.