अॅड. उदयसिंह पाटील – उंडाळकर; 3 हजार युवकांना मिळणार रोजगार
कराड/प्रतिनिधी : –
उंडाळे येथे शुक्रवार, दि. 3 जानेवारी 2025 रोजी कै. स्वा. सै. शामराव पाटील (आण्णा) यांच्या पुण्यतिथीनिमित्त महारोजगार मेळावा व शनिवार, दि. 4 जानेवारी 2025 रोजी स्व. लोकनेते विलासकाका पाटील – उंडाळकर यांच्या 4 थ्या पुण्यतिथीनिमित्त संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस अॅड. उदयसिंह पाटील – उंडाळकर यांनी दिली.
पत्रकार परिषद : येथील कोयना बँकेच्या प्रधान शाखेत सदर कार्यक्रमाची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेचे बोलत होते. कोयना बँकेचे अध्यक्ष रोहित पाटील, शामराव पाटील पतसंस्थेचे अध्यक्ष शहाजी पाटील, प्रा. धनाजी काटकर, युवा हबचे दीपक पवार व किरण भाले यांची प्रमुख उपस्थिती होती.
महारोजगार मेळावा :अॅड. पाटील म्हणाले, शुक्रवार दि. 3 जानेवारी रोजी सकाळी 9 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत कै. स्वा. सै. दादासो उंडाळकर स्मारक, कराड-चांदोली रोड, उंडाळे (ता. कराड) येथे होणाऱ्या महारोजगार मेळाव्यात विविध क्षेत्रातील 60 हून अधिक नामांकित कंपन्या सहभागी होणार असून इयत्ता पाचवी ते पदव्युत्तर पर्यंत शिक्षण घेतलेल्या कराड तालुक्यातील बेरोजगार युवक- युवतींना मोठ्या प्रमाणात लाभ होणार आहे. महारोजगार मेळाव्याचा शुभारंभ जिल्हा पोलीस प्रमुख समिर शेख यांच्या शुभहस्ते होणार असून सदर मेळाव्यासाठी निवड झालेल्या उमेदवारांना कराडचे पोलीस उपनिरीक्षक अमोल ठाकूर यांच्या हस्ते तात्काळ नियुक्तीपत्र देण्यात येणार आहे.
इथे करा नोंदणी : या मेळाव्यासाठी https://shorturl.at/4N8VL या लिंकवर उमेदवारांनी आपली नोंदणी करावी. तसेच आपल्या शैक्षणिक कागदपत्रांच्या पाच प्रति, दोन पासपोर्ट साईज फोटो घेवून उपस्थित रहावे, असे आवाहनही त्यांनी केले.
संवाद मेळावा : शनिवार दि. 4 जानेवारी रोजी सायंकाळी 5 वाजता स्व. लोकनेते विलासकाका पाटील – उंडाळकर यांच्या 4 थ्या पुण्यतिथी स्मरणार्थ या वर्षापासून उंडाळे (ता. कराड) येथे विविध समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सदर समारंभ सिक्कीमचे माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात येणार असून समारंभाचे प्रमुख पाहुणे माजी मंत्री आ. जयंतराव पाटील व माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार आहे. या कार्यक्रमात स्वर्गीय काकांचे विशेष कार्य, कर्तृत्व, सेवा व त्यांच्या एकूणच कार्याची ओळख यावर मान्यवर प्रकाशझोत टाकणार आहेत.
ग्रामीण भागातील युवकांसाठी रोजगार
गत 30 वर्षांपासून शामराव पाटील अण्णांच्या पुण्यतिथीनिमित्त स्वर्गीय विलासकाका राज्यातील विविध मान्यवरांना बोलावून वैचारिक मंथन करत होते. ग्रामीण भागातील लोकांना जगाची ओळख व्हावी, विविध क्षेत्रातील ज्ञान त्यांच्यापर्यंत पोहोचावे, त्यांना एक विचार व मार्ग मिळावा हा त्यापाठीमागे काकांचा उद्देश होता. आता यावर्षीपासून विलासकाकांच्या पुण्यतिथीनिमित्त एक वेगळा उपक्रम म्हणून ग्रामीण भागातील युवकांना रोजगार उपलब्ध होण्याच्या दृष्टीने महारोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या माध्यमातून कराड दक्षिणमधील किमान 3 हजार युवक – युवतींना नोकरी मिळणार आहे.
जॉब कार्ड सुविधा
या महारोजगार मेळाव्यासाठी कराड दक्षिणमधील किमान 5 ते 6 हजार युवक, युवती सहभागी होणार असून यामध्ये किमान 3 युवक, युवतींना प्रत्यक्ष नोकरी मिळेल. मात्र, उर्वरित युवक, युवतींसाठी 6 महिन्यानंतर जॉब कार्ड सुविधा देण्यात येणार आहे. त्यांना प्रत्येक सोमवारी पाच कंपन्यांचे मेसेज येतील. त्यातील एखादी कंपनी सिलेक्ट करून त्यांनी आपला बायोडाटा पाठवावा. त्यानंतर त्यांना दुसऱ्या राऊंडला बोलावून उर्वरित प्रोसेस करण्यात येईल, असे युवा हबचे दीपक भाले यांनी सांगितले.