आमदार डॉ. अतुलबाबा भोसले; शिरवळ येथील नूतन कॅम्पसचा भूमिपूजन समारंभ उत्साहात
कराड/प्रतिनिधी : –
स्वर्गीय जयवंतराव भोसले यांनी 1965 साली शिक्षणाची क्रांती घडविण्याचे व्रत हाती घेतले होते. ही क्रांती पुढे नेण्याचे कार्य डॉ. सुरेशबाबांच्या हातून होत आहे. स्वर्गीय आप्पांच्या विचारांचा वारसा पुढे नेत असताना कृष्णा परिवाराची व्याप्ती राज्यात नव्हे, तर देशाच्या कानाकोपऱ्यात वाढवणार असल्याची ग्वाही आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांनी दिली.
नूतन कॅम्पसचे भूमिपूजन : कृष्णा विश्व विद्यापीठाच्या शिंदेवाडी-शिरवळ (ता. खंडाळा) येथील नूतन कॅम्पसच्या भूमिपूजनप्रसंगी ते बोलत होते. प्रारंभी कुलपती डॉ. सुरेश भोसले व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. उत्तरा भोसले यांच्या हस्ते विधिवत भूमिपूजन करण्यात आले. याप्रसंगी सौ. गौरवी भोसले, विनायक भोसले, सौ. वसुंधरा भोसले, डॉ. जयवर्धन भोसले, सौ. श्वेतांजली भोसले, माजी आमदार आनंदराव पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
भाऊंनाही अभिमान वाटेल असे काम विधिमंडळात करणार : आज जे राजकीय यश मिळाले आहे, त्याची मुहूर्तमेढ रोवण्याचे काम स्वर्गीय आप्पा व डॉ. सुरेशबाबांनी केल्याचे सांगत आ. डॉ. भोसले म्हणाले, विधानसभेत मला आमदार म्हणून निवडून देणाऱ्या लोकांचे अश्रू पुसण्याचे काम आपणाकडून होईल. दिवंगत यशवंतराव मोहिते यांच्यानंतर 39 वर्षांनी आपण परत एकदा सत्तेत आलो आहे. त्यामुळे भाऊंनाही अभिमान वाटेल, अशा पद्धतीने विधिमंडळात काम करणार आहे.
महाराष्ट्रातील सुसज्ज रुग्णालय साकारणार : शिंदेवाडी येथील कृष्णा विश्व विद्यापीठाच्या दुसऱ्या शाखेच्या निमित्ताने आम्ही या परिसराचा मोठ्या प्रमाणावर विकास करणार असल्याचे सांगत आ. डॉ. भोसले म्हणाले, याचा प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष फायदा स्थानिकांना होणार आहे. ज्या लोकांनी आपल्या जमिनी उपलब्ध करून दिल्या, त्यांना या पुढील काळात सर्व प्रकारचे सहकार्य करणार आहे. कृष्णा परिवार हा लोकांना आपला वाटत असल्याने या परिवाराची व्याप्ती वाढत आहे. 2027 साली या ठिकाणी महाराष्ट्रातील सुसज्ज रुग्णालय साकारणारा असून त्याचे उद्घाटन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रातील मुख्य नेतृत्वाच्या हस्ते होणार आहे.
अतुल आणि विनू बाबांनी लक्ष केंद्रित करावे : स्वर्गीय आप्पांनी मलकापूरच्या माळावर रुग्णालय आणि मेडिकल कॉलेज काढण्याचे स्वप्न पाहिले आणि ते पूर्ण केले असल्याचे सांगत डॉ. सुरेश भोसले म्हणाले, आता शिरवळच्या माळावर कृष्णा विश्व विद्यापीठाची दुसरी शाखा सुरू होत आहे. उद्योग व शिक्षणात नव्या संधी उपलब्ध होणार आहेत. यावर अतुल आणि विनू बाबांनी लक्ष केंद्रित केले पाहिजे.
भाषणे : यावेळी माजी आमदार आनंदराव पाटील, डॉ. विनय जोगळेकर, कृष्णा विश्व विद्यापीठाच्या शैक्षणिक व मानांकन विभागाचे सल्लागार डॉ. प्रवीण शिणगारे यांची भाषणे झाली.
मान्यवरांची उपस्थिती : कार्यक्रमाला विद्यापीठाचे व्यवस्थापन मंडळ सदस्य दिलीप पाटील, कार्यकारी संचालक पी. डी. जॉन, कुलसचिव डॉ. एम. व्ही. घोरपडे, कृष्णा कारखान्याचे संचालक निवासराव थोरात, संजय पाटील, श्रीरंग देसाई, लिंबाजीराव पाटील, जयवंत शुगर्सचे चेअरमन चंद्रकांत देसाई, प्रेसिडेंट चारुदत्त देशपांडे, शिंदेवाडीच्या सरपंच अनिता मळेकर, शिरवळचे सरपंच रविराज दुधगावकर यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती.
सोन्याने नांगरली जमीन
सौ. गौरवी भोसले यांनी भूमिपूजनप्रसंगी हातातील सोन्याची बांगडी काढून जमीन नांगरून माती भरली. या कृतीतून त्यांनी पारंपरिक प्रथेचे जतन केले. डॉ. सुरेश भोसले व डॉ. अतुल भोसले यांनी आपल्या भाषणात, याचा आवर्जून उल्लेख करत, जमीन सोन्याने नांगरली आता शिरवळच्या भूमीतही भविष्यात सोने पिकेल, असा आशावाद व्यक्त केला.
एमआयडीसीमध्ये नवीन उद्योग आणण्याचा मार्ग मोकळा
विधानसभा निवडणुकीमध्ये आपण कराड एमआयडीसीला फाईव्ह स्टार दर्जा मिळवून सर्वांगीण विकास करत नवीन उद्योगांसाठी आग्रही राहणार असल्याचा शब्द दिला होता. त्यानुसार आपले प्रयत्न असून याबाबत उद्योग मंत्री उदय सामंत यांच्याशी विमान प्रवासादरम्यान तब्बल 55 मिनिटे चर्चा केली. त्यांनी आपल्याला कराडला येण्याची ग्वाही दिली असून लवकरच कराडला नवीन उद्योग येण्याचा मार्ग मोकळा होईल, असा विश्वासही आमदार डॉक्टर अतुल बाबा भोसले यांनी व्यक्त केला.
अत्याधुनिक सोयी – सुविधा उपलब्ध
शिंदेवाडी येथील कृष्णा विश्व विद्यापीठाच्या नवीन कॅम्पसमध्ये सर्व अत्याधुनिक सोयी – सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. त्याचबरोबर कॅम्पसमध्ये कृष्णा उद्योग समूहातील सर्व संस्थांचे विभागीय केंद्र स्थापन करण्यात येणार असल्याचेही आमदार डॉ. अतुल बाबा भोसले यांनी सांगितले.