कराड/प्रतिनिधी : –
कराड शहरात होणारी वाहतुकीची कोंडी टाळण्यासाठी राष्ट्रीय महामार्गावरुन सांगली जिल्ह्यातील विट्याकडे जाणारी वाहतूक कराड शहरातून जाण्याऐवजी अन्य मार्गाने वळविणे गरजेचे आहे. यासाठी पंकज हॉटेल ते कराड-विटा या मार्गाकडे जाणाऱ्या नव्या ‘नेकलेस रोड’ची उभारणी करण्याची मागणी, कराड दक्षिणचे आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांनी नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात औचित्याचा मुद्दा उपस्थित करताना केली.
हिवाळी अधिवेशन : नागपूर येथे विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाचा आज समारोप झाला. या अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी सभागृहात औचित्याचा मुद्दा मांडला.
स्मृतीस्थळाच्या विकासाची गरज : आमदार डॉ. अतुलबाबा भोसले म्हणाले, कराड शहरातून सांगली जिल्ह्यातील विटा गावाकडे जाणारी वाहतूक पंकज हॉटेलजवळून थेट हायवेवरून विट्याला जाण्याऱ्या रस्त्याकडे वळविता आल्यास, शहरातील वाहतूक कोंडी कमी होईल. हा नेकलेस स्वरुपाचा रस्ता स्व. यशवंतराव चव्हाण साहेबांच्या स्मृतिस्थळाजवळून जाणार आहे. त्यामुळे या स्मृतीस्थळाचा विकासही येत्या काळात करण्याची गरज आहे.
संरक्षक भिंतीची उंची वाढवावी : कराड शहर हे कृष्णा – कोयना नदीच्या संगमावर वसलेले आहे. त्यामुळे याठिकाणी कायम पूरस्थिती निर्माण होत असल्याने अनेकदा नागरिकांना विविध समस्यांना सामोरे जावे लागते. अशावेळी संरक्षक भिंतीची उंची वाढविण्याची गरज आ.डॉ. अतुलबाबा भोसले यांनी व्यक्त केली.