कराड/प्रतिनिधी : –
राज्यातील नगरपालिका व महानगरपालिका शिक्षकांना लवकरच शालेय शिक्षण विभागाकडून वेतन दिले जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य नगरपालिका व महानगरपालिका शिक्षक संघाच्या शिष्टमंडळास दिले. आमदार डॉ. अतुल भोसले यांनी पुढाकार घेऊन हा प्रश्न मार्गी लावला असून लवकरच शिक्षकांना मिळणार 100 टक्के वेतन असल्याची माहिती राज्य नगरपालिका व महानगरपालिका शिक्षक संघाचे राज्य अध्यक्ष अर्जुन कोळी यांनी दिली.
प्रसिद्धीपत्रक : श्री. कोळी यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, नागपूर येथे महाराष्ट्र राज्य नगरपालिका व महानगरपालिका शिक्षक संघाच्या पदाधिकाऱ्यांना घेऊन आमदार डॉ. अतुल भोसले यांनी मुख्यमंत्र्यांबरोबर बैठक आयोजित केली होती. त्यात नगरपालिका व महानगरपालिकेच्या शिक्षकांना शंभर टक्केप्रमाणे वेतन शालेय शिक्षण विभागाकडून देणे आवश्यक आहे.
आदेश काढण्याचे आश्वासन : नगरपालिका व महानगरपालिका शिक्षकांच्या वेतनाची बाब मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सांगितली. याबाबत मुंबईत डॉ. अतुल भोसले, संघटना पदाधिकारी, शालेय शिक्षण आणि नगरविकास विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत बैठक आयोजित करून आदेश काढला जाईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
मान्यवरांची उपस्थिती : यावेळी आमदार डॉ. अतुल भोसले, राज्य अध्यक्ष अर्जुन कोळी, कार्याध्यक्ष सुभाषराव कोल्हे, सहचिटणीस राजू भिरड, अन्वर हुसेन, जयंत इंदापूरकर, अशोक शेंडगे, सुनील खरात, सुशिला सोनुन, आशाताई मुर्हे, मुकेश चव्हाण उपस्थित होते.