अशोकराव थोरात; सातारा जिल्हा शिक्षण संस्था संघाची आढावा बैठक उत्साहात
कराड/प्रतिनिधी : –
मराठी भाषेच्या अभिजात दर्जासाठी राज्यभरातून विविध स्तरावर प्रयत्न झाले. मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा, ही चळवळ सातारा जिल्ह्यातून रवींद्र बेडकीहाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू झाली. यामध्ये अनेक मराठी भाषा प्रेमींनीही सक्रिय सहभाग घेऊन अभिजात दर्जा मिळवण्यासाठी विशेष प्रयत्न केले. यासह बेडकीहाळ यांचे पत्रकार, साहित्यिक व शिक्षण तज्ञ म्हणूनही मोठे योगदान आहे, असे मत महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळ, पुणेचे उपाध्यक्ष शेतीमित्र अशोकराव थोरात यांनी व्यक्त केले.
आढावा बैठक :श्री मळाईदेवी शिक्षण संस्थेच्या आदर्श जुनिअर कॉलेज (मलकापूर) येथे नुकत्याच पार पडलेल्या सातारा जिल्हा शिक्षण संस्था संघाच्या आढावा बैठकीत अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते.
सत्कार :याप्रसंगी ‘यशवंतराव चव्हाण सामाजिक कृतज्ञता पुरस्कार’ मिळाल्याबद्दल ज्येष्ठ पत्रकार रवींद्र बेडकीहाळ यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. यावेळी संघाच्या कोल्हापूर विभागाचे शिवाजी माळकर, सांगली विभागाचे डॉ. अतिक पटेल यांची प्रमुख उपस्थिती होती.
प्रेरणादायी कार्य :पत्रकारिता, शैक्षणिक, सांस्कृतिक व साहित्य या सर्वच क्षेत्रात रवींद्र बेडकीहाळ यांनी आपल्या कल्पकतेने अनेक उपक्रम यशस्वीपणे पार पाडून आपल्या व्यक्तिमत्त्वाचा वेगळा ठसा ओम उमटवल्याचे सांगत श्री. थोरात म्हणाले, फलटणच्या महाराष्ट्र साहित्य परिषदेचे श्री. बेडकीहाळ अध्यक्षही आहेत. पत्रकार, साहित्यिक व शिक्षण तज्ञ अशा विविध माध्यमातून श्री बेडकिहाळ यांनी केलेले कार्य सर्वांसाठीच प्रेरणादायी असल्याचे थोरात यांनी सांगितले.
विविध समस्यांवर चर्चा :या आढावा बैठकीत अशोकराव थोरात यांनी शिक्षण संस्थांच्या विविध समस्या मांडल्या. यामध्ये वेतनेतर अनुदान वाढवून मिळाले पाहिजे, अनुदानित शाळांना ते वर्षातून दोन – तीन वेळा मिळायला हवे, संस्थांनी आपल्या शाळांसाठी केलेला खर्च शिक्षणाधिकारी व इतर अधिकाऱ्यांना कळवला पाहिजे, त्या खर्चाची नोंद शासन दरबारी व्हायला हवी, तसेच पवित्र पोर्टलच्या माध्यमातून अनेक शाळांमध्ये पदभरती झाली नसल्याने या शाळांचे होणारे नुकसान शासन दरबारी मांडले पाहिजे, आदी मुद्द्यांवर चर्चा केली.
ठराव : महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाच्या नागपूर येथील बैठकीत झालेल्या विविध विषयांवरील चर्चेनुसार अशोकराव थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली या बैठकीमध्ये विविध ठराव मंजूर करण्यात आले.
स्मारक अपूर्ण असल्याची खंत : सत्काराला उत्तर देताना श्री. बेडकीहाळ म्हणाले, मला मुळात पत्रकारितेबद्दल आवड आहे. आचार्य बाळशास्त्री जांभेकरांनी केलेल्या पत्रकारितेतील कामाचा त्यांनी आढावा घेतला. तसेच महाराष्ट्रातील आद्य प्रबोधनकार जांभेकरांचे स्मारक व्हावे, असे वाटणारा मी पहिला वरिष्ठ पत्रकार आहे. त्याचबरोबर यशवंतराव चव्हाण साहेबांच्या गावी त्यांचे मोठे स्मारक व्हावे, हे माझे स्वप्न आजही अपूर्णच असल्याची खंत त्यांनी यावेळी बोलून दाखवली.
शासनाचे तुघलकी निर्णय :आजच्या शासन दरबारी घेतल्या जाणाऱ्या निर्णयाबद्दल बोलताना श्री. बेडकीहाळ म्हणाले, शासन महंमद तुघलकी निर्णय घेत आहे. शिक्षण व्यवस्था ही त्यांना बाजारपेठ वाटते. शाळेत शिकवण्याच्या कामापेक्षा शिक्षकांना कागदी कामच जास्त करावे लागत असल्याचा मुद्दा त्यांनी यावेळी उपस्थित केला.
सर्वांनी प्रयत्न करावेत :प्रास्ताविकात एस. टी. सुकरे यांनी शिक्षण संस्थांच्या अनेक मागण्या प्रलंबित आहे. त्या शासनापर्यंत पोहोचवण्याचे काम संस्थाचालक संघामार्फत केले जात असून त्यासाठी सर्वांचे प्रयत्न हवेत, असे आवाहन त्यांनी संस्था चालकांना केले. माजी उपमुख्याध्यापक शेखर शिर्के यांनी आभार मानले.
उपस्थिती :कार्यक्रमास शिक्षण संस्था संघाचे सातारा, सांगली, कोल्हापूर येथील पदाधिकारी, तसेच विविध विद्यालयाचे मुख्याध्यापक, पदाधिकारी, त्याचबरोबर मळाईदेवी नागरी सहकारी पतसंस्थेचे अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.