प्रा. डॉ. बाबुराव गुरव; विजय दिवस समारोह समितीच्या जीवन गौरव यशवंत पुरस्काराने सन्मान
कराड/प्रतिनिधी : –
ज्येष्ठ नेते यशवंतराव चव्हाण यांच्याबरोबर मला काहीकाळ काम करायची संधी मिळाली. त्यांच्या नावाने विजय दिवस समारोह समितीने आज दिलेला पुरस्कार हा माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा पुरस्कार असल्याचे सांगत या पुरस्काराच्या जबाबदारीचे भान ठेवून यापुढे त्या पुरस्काराला साजेसे काम मी निश्चितपणे करेन, अशी ग्वाही ज्येष्ठ साहित्यिक व विचारवंत प्रा. डॉ. बाबुराव गुरव यांनी दिली.
पुरस्कार : विजय दिवस समारोह समितीच्यावतीने देण्यात येणारा जीवन गौरव यशवंत पुरस्कार प्रा. डॉ. बाबुराव गुरव यांना कृष्णा विद्यापीठाचे कुलपती डॉ. सुरेश भोसले, माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील, कर्नल संभाजीराव पाटील, सौ. संध्या पाटील यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. या समारंभात ते बोलत होते.
मानपत्र : कराड नगरपालिकेच्यावतीने उपमुख्याधिकारी वर्षा बडदरे व मान्यवरांच्या हस्ते ब्रिगेडीयर जॉयदीप मुखर्जी यांना मानपत्र देवून सन्मानित करण्यात आले.
सैन्याबद्दल समाजात आदरभाव : विजय दिवस समारोह समितीने सैन्याबद्दल समाजात आदरभाव निर्माण करण्याचे मोठे काम केले केल्याचे सांगत कुलपती डॉ. सुरेश भोसले म्हणाले, कृष्णा विद्यापीठाच्या माध्यमातून दरवर्षी सैन्यदलातील मेडीकल युनिटमधील वरिष्ठ अधिकाऱ्यांना एक महिन्याचे प्रशिक्षण देण्याचे काम सामाजिक बांधिलकीतून केले जाते.
एनसीसी प्रशिक्षण सक्ती करा : विजय दिवस समारोह समितीने कर्नल संभाजी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पाठपुरावा करून सर्व शाळांत एनसीसी प्रशिक्षण सक्तीचे करण्यासाठी शासनाकडे प्रयत्न करावेत, असे आवाहन डॉ. सुरेश भोसले यांनी यावेळी केले.
विजय दिवसाचे यश : सातारा जिल्ह्याला वेगळी परंपरा आहे. कराडला कर्नल संभाजी पाटील यांच्यामुळे गेल्या 26 वर्षांपासून विजय दिवस मोठ्या दिमाखात साजरा असल्याचे सांगताना माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील म्हणाले, या विजयी दिवसाला सैन्यदलातील अनेक अधिकारी, जवान येतात. त्यांच्या माध्यमातून अनेक तरुणांनी प्रेरणा घेऊन सैन्यदलात भरती होण्यासाठी प्रयत्न केले आहेत. हे या विजय दिवसाचे यश आहे.
भूमिका : कर्नल संभाजीराव पाटील यांनी विजय दिवस सुरु करण्यामागची भूमिका स्पष्ट करून यापुढेही ही परंपरा कायम राहील, ही ग्वाही दिली. ॲड. संभाजीराव मोहिते यांनी प्रास्ताविक केले. ॲड. नितीन भंडारे यांनी आभार मानले.
वीरपत्नी, आदर्श माता व आदर्श विद्यार्थी
वीरपत्नी म्हणून रेठरे खुर्द येथील श्रीमती सुनिता कळसे, आदर्श माता म्हणून आबईचीवाडी येथील श्रीमती अंजना येडगे, आदर्श विद्यार्थिनी म्हणून यशवंतराव चव्हाण सायन्स कॉलेजची सानिका यादव, आदर्श विद्यार्थी म्हणून सरस्वती विद्यालयाचा अभिनव कोळी व टिळक हायस्कुलचा हर्षवर्धन पाटील यांचा सत्कार करण्यात आला.