स्व. जयमाला भोसले यांच्या 92 व्या जयंतीनिमित्त आयोजन; महिलांचा उदंड प्रतिसाद
कराड/प्रतिनिधी : –
महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध व्याख्याते गणेश शिंदे यांच्या सुश्राव्य वाणीतून उलगडत जाणारे संत तुकाराम महाराज यांच्या शिकवणीचे मर्म आणि त्यांच्या जोडीला सुप्रसिद्ध गायिका सौ. सन्मिता धापटे-शिंदे यांचे सुरेल भक्तीगीत गायन; यातून निर्माण झालेल्या भक्तिरसात कराड येथील रसिक न्हाऊन गेले. निमित्त होते; कृष्णा सरिता महिला बझारच्यावतीने आयोजित ‘तुका आकाशा एवढा’ भक्तिमय संगीत सोहळ्याचे.
जयंतीनिमित्त आयोजन : कृष्णा परिवाराच्या आधारस्तंभ स्व. जयमाला जयवंतराव भोसले यांच्या 92 व्या जयंतीनिमित्त कृष्णा विश्व विद्यापीठाच्या सभागृहात संत तुकाराम महाराजांचे जीवनचरित्र व त्यांच्या अभंगाद्वारे सद्य सामाजिक स्थितीवर भाष्य करणाऱ्या ‘तुका आकाशा एवढा’ या भक्तीमय संगीत सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. विद्यापीठाचे कुलपती डॉ. सुरेश भोसले यांच्या हस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीत या कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.
निरुपण आणि भक्तीगीत : व्याख्याते श्री. शिंदे यांनी आपल्या ओघवत्या वाणीतून संत तुकाराम महाराजांचे विचार उपस्थितांसमोर मांडले. या सुंदर निरुपणाच्या जोडीला गायिका सौ. सन्मिता धापटे-शिंदे यांनी आपल्या सुरेल स्वरसाजातून एकापेक्षा एक अशी अभंग व भक्तीगीते सादर करुन रसिकांची वाहवा मिळविली. या कार्यक्रमाला प्रबोधन परिवारातील सर्व सहकलाकारांनी सुरेल साथसंगत केली. या कार्यक्रमाला महिलांचा उदंड प्रतिसाद लाभला.
मान्यवरांची उपस्थिती : याप्रसंगी शिराळा विधानसभेचे नूतन आमदार सत्यजीत देशमुख, माजी आमदार आनंदराव पाटील, कृष्णा महिला औद्योगिक संस्थेच्या संस्थापिका सौ. उत्तरा भोसले, श्री. विनायक भोसले, य. मो. कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे संचालक दयानंद पाटील, श्रीरंग देसाई, धोंडीराम जाधव, निवासराव थोरात, कृष्णा बँकेचे संचालक शिवाजीराव थोरात, गिरीश शहा, माजी नगरसेवक सुहास जगताप, सुभाष वाडीलाल शहा यांच्यासह मान्यवर आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.