अॅ ड. भारत मोहिते; ‘रणरागिणी ताराराणी’ विषयावर व्याख्यान
कराड/प्रतिनिधी : –
स्वराज्य निर्माते छत्रपती शिवाजी महाराज, स्वराज्य रक्षक धर्मवीर संभाजी महाराज आणि स्वराज्य विस्तारक राजाराम महाराज यांच्या पश्चात स्वराज्य बुडवायला आलेल्या औरंगजेबाला रणरागिनी भद्रकाली ताराराणी यांनी याच मातीत गाडले. संपूर्ण विश्वातल्या प्रत्येक स्त्रीला अभिमान वाटावा, अशी प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी केलेली कामगिरी समस्त स्त्री जातीसाठी हेवा वाटावी अशीच आहे. त्यामुळे विश्वातल्या प्रतिभावना वीरांगणांमध्ये महाराणी ताराबाई या निश्चितच वरच्या स्थानावर आहेत, असे प्रतिपादन प्रथितयश विधीज्ञ अॅ ड. भारत मोहिते यांनी केले.
व्याख्यान : तळबीड (ता. कराड) येथील महाराणी ताराबाई हायस्कूलमध्ये रणरागिणी ताराराणी यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित व्याख्यानात मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक कदम सर, तळबीड गावच्या सरपंच मृणालिनी मोहिते, उपसरपंच जयाजी मोहिते, माजी सैनिक शामराव मोहिते, माजी सरपंच जयवंतराव मोहिते यांची प्रमुख उपस्थिती होती.
अस्ताला निघालेले स्वराज्य वाचवले : स्त्री अबला समजून अनेकांनी हिनवले. पण प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एक स्त्रीच असते, असे सांगताना अॅ ड. मोहिते म्हणाले, महाराणी रणरागिणी ताराराणी यांनी अवघ्या जगाला लाजवेल असा अद्वितीय पराक्रम करून अस्ताला निघालेले स्वराज्य वाचवले. छत्रपती शिवाजी महाराज, त्यांच्या पश्चात 9 वर्ष मोघल सत्येला सळो की पळो करून सोडणारे रणधुरंधर छत्रपती संभाजी महाराज आणि त्यानंतर स्वराज्याची यशस्वी कमान राखणारे छत्रपती राजाराम महाराज यांच्यानंतर ताराराणींनी स्वराज्य फक्त वाचवलेच नाही, तर त्याचा विस्तार केल्याचे त्यांनी सांगितले.
उपस्थिती : कार्यक्रमास दुर्गेश मोहिते, अॅड. शशिकांत मोहिते, सर्व शिक्षक, कर्मचारी, विद्यार्थी, विद्यार्थिनी व ग्रामस्थ उपस्थित होते. श्री. घोलप सर यांनी आभार मानले.
औरंगजेबाचे स्वप्न धुळीस मिळवले
अवघ्या पंचवीसाव्या वर्षी वैधव्य येऊनही इतके मोठे दुःख स्वराज्यासाठी बाजूला सारून एका हातात राज्यकाभाराची सूत्रे, तर दुसऱ्या हातात समशेर घेऊन प्रचंड मोठया लष्करी सम्राज्यापुढे मराठेशाही वाचवण्यासाठी त्या उभ्या ठाकल्या. छत्रपती शिवराय व पिता सरसेनापती हंबीरराव मोहिते यांचे संस्कार, शंभूराजांचे बलिदान, पती राजाराम महाराजांनी दिलेली जिद्दी, चिवट झुंज या सर्वांच्या जोरावर मोघल बादशहा औरंगजेबाला गुडघे टेकायला लावून स्वराज्य नष्ट करण्याचे त्याचे स्वप्न अखेर दिवास्वप्नच राहिले, ते ताराराणी यांच्या अतुलनीय शोर्यामुळेच.
ताराराणींचा आदर्श घ्या
10 डिसेंबर 1761 मध्ये महाराणी ताराराणी यांचे देहावसान झाले. परंतु, आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत त्यांनी स्वराज्याची सेवा केली आणि अखेर त्यांच्या जिद्दीपुढे बादशाह धुळीस मिळाला. इतिहास ताराराणी आणि त्यांच्या पराक्रमापुढे नेहमीच नतमस्तक होतो. एका स्त्रीने केलेला आदर्श राज्यकारभार निश्चित कौतुकास्पद आहे. त्यांचे संस्कार घेऊन प्रत्येक स्त्रीने वाटचाल केल्यास प्रत्येक महिला आपापल्या क्षेत्रात यशस्वी होऊ शकतात. यासाठी प्रत्येक स्त्रीने कोणत्याही खडतर परिस्थितीसमोर हार न मानता ताराराणी यांना आदर्श मानून यांची जिद्द, चिकाटी, शौर्य, आत्मविश्वास व लढवय्या वृत्ती आत्मसात करावी, असे आवाहनही अॅड. भारत मोहिते यांनी यावेळी केले.