14 ते 16 डिसेंबर दरम्यान विजय दिवस सोहळा

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा.

कराड दौड, रक्तदान शिबिर, मानवंदना, शस्त्रास्त्र प्रदर्शन व पुरस्कार वितरण समारंभ 

कराड/प्रतिनिधी : – 

बांगला मुक्ती लढ्यातील भारतीय सेनेच्या विजयाप्रित्यर्थ 1998 पासून  कराडमध्ये विजय दिवस समारोह सोहळा साजरा होत आहे. यामध्ये करोना कालावधीत खंड पडला. तसेच गत वर्षीपासून विजय दिवसाचा मुख्य सोहळा रद्द करण्यात आला होता. यावर्षीही मुख्य सोहळा न होता साधेपणाने शनिवार, दि. 14 ते सोमवार, दि. 16 रोजी दरम्यान विजय दिवस सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती विजय दिवस समारोह समितीचे सचिव अॅड. संभाजीराव मोहिते यांनी दिली.

पत्रकार परिषद : विजय दिवस समारोह सोहळा 2024 ची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी समितीचे सहसचिव वि. ज्ञा. जाधव, प्रा. बी. एस. खोत, सलीम मुजावर यांची उपस्थिती प्रमुख होती.

कराड दौडने प्रारंभ : विजय दिवस समारोह सोहळ्याची सुरुवात शनिवार, दि. 14 रोजी विजय दिवस समारोह समिती व कराड नगरपरिषद यांच्या विद्यमाने काढण्यात येणाऱ्या कराड दौडने होणार असल्याचे सांगत अॅड. श्री. मोहिते म्हणाले, सकाळी 8 वाजता शिवतीर्थ दत्त चौकातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्यापासून ते छत्रपती शिवाजी महाराज उद्यान, कराड इथपर्यंत ही दौड काढण्यात येईल.

भव्य रक्तदान शिबिर : रविवार, दि. 15 रोजी छत्रपती शिवाजी आखाडा, कराड येथे सकाळी 9.30 वाजता प्रतिवर्षीप्रमाणे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले असून युवक, नागरिकांनी मोठ्या संख्येने रक्तदानाचे पवित्र कर्तव्य बजावावे, असे आवाहन अॅड. मोहिते यांनी केले.

सरसेनापती हंबीरराव मोहिते यांना मानवंदना : सोमवार, दि. 16 रोजी तळबीड (ता. कराड) येथे सकाळी 9 वाजता  हिंदवी स्वराज्याचे सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या समाधीस्थळी शौर्य दिनानिमित्त प्रमुख मान्यवर शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डी. टी. शिर्के यांच्या हस्ते शौर्य चक्र अर्पण करून अभिवादन करण्यात येणार असल्याचे सांगत अॅड. मोहिते म्हणाले, सैन्यदलाच्या बँड पथकाकडून सरसेनापती हंबीरराव मोहिते यांना मानवंदना देण्यात येणार आहे. तसेच तळबीड ग्रामपंचायतीच्यावतीने शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डी. टी. शिर्के यांचा सत्कार करण्यात येणार आहे.

शस्त्रास्त्र प्रदर्शन : येथील छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमवर होणारा या सोहळ्यातील शस्त्रास्त्र प्रदर्शन हा  कार्यक्रम काही तांत्रिक कारणांमुळे सद्गुरु गाडगे महाराज महाविद्यालयाच्या क्रीडांकरणावर दुपारी 2 वाजता होणार असल्याचे सांगत अॅड. मोहिते म्हणाले, या कार्यक्रमासाठी विद्यानगरीतील विविध महाविद्यालयांच्या सुमारे 25 हजार विद्यार्थ्यांसह नागरिकांची मोठी उपस्थिती असणार आहेत. या शस्त्रास्त्र प्रदर्शनाचे उद्घाटन भारती विद्यापीठाचे (पुणे) मा. के. डी. जाधव व सद्गुरु गाडगे महाराज महाविद्यालयाचे प्राचार्य मोहन राजमाने यांच्या हस्ते होणार आहे. 

जीवन गौरव यशवंत पुरस्कार : याच दिवशी सायंकाळी 5 वाजता सौ. वेणूताई चव्हाण सभागृहात विजय दिवस समारोह समितीच्यावतीने प्रतिवर्षी देण्यात येणारा ‘जीवन गौरव यशवंत पुरस्कार’ ज्येष्ठ साहित्यिक व विचारवंत प्रा. बाबुराव गुरव यांना कृष्णा अभिमत विश्व विद्यापीठाचे (कराड) कुलपती डॉ. सुरेश भोसले यांच्या हस्ते सन्मानपूर्वक प्रदान करण्यात येणार आहे.

वीर पत्नी, आदर्श माता, आदर्श विद्यार्थी व विद्यार्थिनी पुरस्कार : त्यानंतर याच ठिकाणी विजय दिवस समारोह समितीच्यावतीने देण्यात येणारा वीर पत्नी / वीरमाता पुरस्कार रेठरे खुर्द (ता. कराड) येथील वीर पत्नी श्रीमती सुनिता कळसे, आदर्श माता पुरस्कार आबईचीवाडी (ता. कराड) येथील अंजना येडगे यांना, आदर्श विद्यार्थी पुरस्कार सरस्वती विद्यालयाचा विद्यार्थी अभिनव कुलदीप कोळी व टिळक हायस्कूलचा विद्यार्थी हर्षवर्धन विजय पाटील यांना विभागून देण्यात येणार आहे. तसेच आदर्श विद्यार्थीनी पुरस्कार यशवंतराव चव्हाण सायन्स कॉलेजची विद्यार्थिनी सानिका चंद्रकांत यादव यांना मान्यवरांच्या हस्ते प्रदान करून या सोहळ्याची सांगता होईल.

आवाहन : या सर्व कार्यक्रमांना विद्यार्थी, नागरिक व आजी-माजी सैनिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहनही अॅड. मोहिते यांनी यावेळी केले.

Jan Swarashtra
Author: Jan Swarashtra

Leave a Comment

आणखी वाचा

  • Buzz4 Ai
  • Buzz Open / Ai Website / Ai Tool
error: Content is protected !!