कराड/प्रतिनिधी : –
येथील वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयात नव मतांसाठी शंभर बेड असलेल्या इमारतीच्या बांधकामासाठी निधी मिळूनही संबंधित ठेकेदारांनी निर्धारित वेळेत बांधकाम पूर्ण केलेले नाही. त्यामुळे कराड शहर परिसरातील रुग्णांची मोठी गैरसोय होत आहे. याचे दखल घेऊन संबंधित ठेकेदार कंपनीवर कायदेशीर कारवाई करावी. अन्यथा या प्रश्न तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा प्रहार जनशक्तीचे जिल्हाध्यक्ष मनोज माळी यांनी दिला आहे.
निवेदन : सदर मागणीचे निवेदन प्रहार जनशक्तीतर्फे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांना देण्यात आले. यावेळी शिवाजी चव्हाण, शुभम उबाळे, भानुदास डाइंगडे, बंटी मोरे, प्रितेश माने, एजाज काजी, बबलू गडांकुश, गणेश नायकवडी आदी उपस्थित होते.
28 कोटी 16 लाख निधी : राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत येथील वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयात नव मतांसाठी शंभर बेड असलेल्या इमारतीच्या बांधकामासाठी 28 कोटी 16 लाख 15 हजार 483 रुपये मंजूर झाले आहेत. याचे कंत्राट एका कंपनीस देण्यात आले असून त्यांना 20 एप्रिल 2023 रोजी वर्क ऑर्डरही दिली आहे.
मुदत संपूनही काम अपूर्णच : सदर वर्क ऑर्डरनुसार संबंधित ठेकेदार कंपनीने 400 दिवसांत काम पूर्ण करणे आवश्यक होते. मात्र, प्रत्यक्षात 600 दिवस उलटूनही सदर इमारतीचे बांधकाम पूर्ण झालेले नाही. याबाबत संबंधित ठेकेदार कंपनी व आरोग्य प्रशासनाला विचारले असता, या कामासाठी निधी उपलब्ध नसल्याचे सांगण्यात येत आहे.
ज्यादा दराने काम मंजूर : मुळातच हे काम देताना ठेकेदार कंपनीला मूळ अंदाजपत्रकाच्या 4.75 टक्के म्हणजे 1 कोटी 33 लाख 76 हजार 830 रुपये ज्यादा दराने काम मंजूर केले आहे. तरीही सदरचे काम रखडत पडले आहे.
रुग्णांची गैरसोय : कराडसह पाटण खटाव, कडेगाव तालुक्यातील रुग्णांना सेवा मिळत नसल्याने त्यांची मोठी गैरसोय होत आहे. त्यामुळे अंदाजपत्रकानुसार निधी उपलब्ध करून सदरचे काम तातडीने पूर्ण करण्यात यावे.
कारवाई करा, अन्यथा आंदोलन : या कामाची मुदत संपूनही काम का पूर्ण झाले नाही? याची सखोल चौकशी करावी. तसेच अर्धवट असलेल्या कामाला जबाबदार असलेले अधिकारी, कर्मचारी व ठेकेदार कंपनीविरोधात कायदेशीर कडक कारवाई करावी. अन्यथा, जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही या निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.
निवेदनाची प्रत सादर : या निवेदनाची प्रत माहितीसाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक माजी आमदार बच्चू कडू यांना देण्यात आली आहे.