कराडमध्ये सामूहिक गीता पठण उत्साहात; गीता जयंतीच्या पार्श्वभूमीवर आयोजन
कराड/प्रतिनिधी : –
श्रीमद्भगवद्गीता ही संपूर्ण जगासाठी मार्गदर्शक आहे. आजच्या धकाधकीच्या, तसेच विज्ञान व तंत्रज्ञानाच्या युगात सर्वांना मनःशांती लाभावी, तसेच सुख, समाधान लाभावे, संपूर्ण विश्वाचे कल्याण व्हावे, हा उदात्त हेतू डोळ्यासमोर ठेवून गीता जयंती 2024 निमित्त सामूहिक श्रीमद्भगवद्गीता पठण करण्यात आले.
गीता जयंती : येथील कन्या प्रशालेत रविवार, दि. 8 रोजी श्री ज्ञानेश्वरी जयंती उत्सव मंडळ, कराडतर्फे गीता जयंतीनिमित्त गीतेचे गाढे अभ्यासक श्री विवेक सबनीस यांच्या मार्गदर्शनाखाली सामूहिक श्रीमद्भगवद्गीता पठण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
250 गीताव्रतींचा सहभाग : सौ. वीणा घळसासी, सुवर्णा देवधर, सौ. स्मिता देवधर, सौ. स्मितांजली जोगळेकर यांनी सुमधुर आवाजात कंठस्थ गीता पठण केले. यामध्ये गीता धर्म मंडळ, गीता परिवार यांच्यासह कराडमधील 250 गीताव्रतींनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला.
मान्यवरांची उपस्थिती : या कार्यक्रमास श्री ज्ञानेश्वरी जयंती उत्सव मंडळ, कराडचे अध्यक्ष अनंत बोधे, कोषाध्यक्ष आर. बी. कुलकर्णी, केशव कुलकर्णी, तसेच संकल्पक विवेक सबनीस यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी, मान्यवरांच्या हस्ते श्रीकृष्ण मूर्तीचे पूजन व दीपप्रज्वलन करण्यात आले.
कंठस्थ गीता पठण : श्री शंकराचार्य यांच्याहस्ते सन्मानाचा शृंगेरी पुरस्कार प्राप्त केलेल्या सुवर्णा देवधर, सौ. स्मितांजली जोगळेकर, सौ. वीणा घळसासी, सौ. स्मिता देवधर यांचे सुमधुर आवाजातील कंठस्थ गीता पठण आणि त्यामध्ये उपस्थितांचा मंत्रोच्चारक गीता पठणाचा स्वर मिसळल्याने परिसर भक्तीमय व चैतन्यमय झाला होता.
मन:शांती प्राप्त : श्रीमद्भगवद्गीतेच्या नऊ अध्यायांनंतर अल्पविराम घेऊन उर्वरित अध्यायांचे पठण करण्यात आले. या मंत्रोच्चारक स्वरमयी श्रीमद्भगवद्गीता पठणाचा आवाज कानी पडल्याने आपणास मोठी मन:शांती मिळाल्याचे सहभागी सर्व गीताव्रतींनी सांगितले.
अन्य उपक्रम : दर एकादशीला गीता पठण व विष्णू सहस्त्रनाम पठण कराडमध्ये आयोजन केले जाते. तसेच मंडळातर्फे श्री ज्ञानेश्वरी जयंती निमित्ताने प्रवचने आयोजित केली जात असून तुकाराम बीज ते एकनाथ षष्ठी यादरम्यान आध्यात्म चिंतन वर्गही घेतले जातात.
गीता अभ्यासवर्ग घेण्याचा मानस
धर्माचे उद्बोधन करतानाच कर्माचे रहस्य उलगडून ज्ञानाच्या मार्गाने जीवनात सुख, शांती आणि समृद्धीचा उपदेश देणाऱ्या भगवान श्रीकृष्णांच्या मुखाद्वारे बाहेर पडलेल्या गीतेच्या उपदेशांचा प्रचार व प्रसार करण्यासाठी सलग दुसऱ्या वर्षी सामूहिक गीता पठण उपक्रम राबवण्यात आला. तसेच गीतेतील सर्व श्लोकांचे अर्थ समजून घेऊन त्याचे सविस्तर विश्लेषण करत गीता अभ्यास वर्ग सुरू करण्याचा आपला मानस असल्याचे श्री. सबनीस यांनी सांगितले.