प्रत्येक महिन्यातील 19 तारखेला घाट परिसराची स्वच्छता
कराड/प्रतिनिधी : –
येथील प्रीतिसंगम हास्य परिवाराने एक अनोखा संकल्प केला आहे. यापुढे प्रत्येक महिन्याच्या 19 तारखेला प्रीतिसंगम घाट परिसरातील स्वच्छता करण्याचे ठरवण्यात आले आहे त्याची सुरुवात म्हणून आजच कृष्णा-कोयनेच्या संगमावावरील नदी परिसरात स्वच्छता मोहिम राबवत दोन ट्रेलर कचरा संकलन केले.
सामाजिक उपक्रम : येथील प्रीतिसंगम हास्य परिवार हा नेहमीच कराड परिसरातील सदस्य सार्वजनिक उपक्रम व उत्सवात उत्साहाने सहभाग घेतात. नितीनियम हास्य योगा करण्याबरोबरच योगा, दुर्गम भागातील शाळांमध्ये शैक्षणिक साहित्य वाटप, विजय दिवस, शिवजयंती, विविध धार्मिक कार्यक्रम, सण, उत्सव आशा अनेक उपक्रमांमध्ये सदस्य मोठ्या संख्येने सहभागी होतात. प्रत्येक महिन्यात त्या त्या महिन्यातील सदस्यांचे वाढदिवस 20 तारखेला सामाजिक उपक्रमाने साजरा करतात.
वाढदिवसाचे औचित्य : धर्माधिकारी प्रतिष्ठानचे अनुयायी संतोष देशमुख यांच्या वाढदिवसाच्या औचित्य साधून शनिवारी कृष्णा कोयनेच्या संगम संगमावर नदी परिसरात स्वच्छता मोहीम राबवली. यावेळी वाळवंटातील सुमारे दोन ट्रेलर कचरा संकलन करून या उपक्रमाची सांगता केली.
संकल्पपूर्ती : याप्रसंगी सर्व सदस्यांच्या म्हणण्यानुसार एक अनोखा संकल्प करण्यात आला. प्रत्येक महिन्याच्या 19 तारखेला प्रीतिसंगम घाट व नदी परिसरात स्वच्छता मोहीम राबवण्याचे ठरवण्यात आले. त्यानुसार यापुढे प्रत्येक महिन्याच्या 19 तारखेला नदी परिसरात व घाट परिसरात स्वच्छता मोहीम राबवण्यात येणार आहे. शनिवारी राबवलेल्या स्वच्छता मोहिमेमुळे वाळवंट कचरामुक्त झाले होते. त्यामुळे नदीवर पोहण्यासाठी येणाऱ्यांसह फिरणाऱ्यांनी या स्वच्छता मोहिमेचे कौतुक केले.