आई – वडिलांचे देवत्व कळले पाहिजे

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा.

प्रा. वसंत हंकारे; बेलवडेत “बाप समजून घेताना” विषयावर व्याख्यान उत्साहात 

कराड/प्रतिनिधी : – 

“मायबापे केवळ काशी, तेणे न जावे तीर्थासी” या संत तुकाराम महाराजांच्या अभंगाचा दाखला देत केवळ तीर्थाटन करून देव शोधण्यापेक्षा आई – वडिलांच्या कष्टाची जाणीव होण्यासाठी प्रत्येकाला आधी आपले आई – वडील आणि त्यांचे देवत्व कळले पाहिजे, असे प्रतिपादन सुप्रसिद्ध व्याख्याते, समाजरत्न प्रा. वसंत हंकारे यांनी केले.

बेलवडे बुद्रुक : प्रा. वसंत हंकारे यांचा सत्कार करताना सरपंच डॉ. सुशांत मोहिते, अंकुश मोहिते, दत्तात्रय मोहिते, भगवान मोहिते व मान्यवर.

व्याख्यान : बेलवडे बुद्रुक (ता. कराड) येथील कासेगाव शिक्षण संस्थेच्या ब्रह्मदास विद्यालयात सोमवार, दि. 2 रोजी ‘बाप समजून घेताना…’ या विषयावर आयोजित व्याख्यानात ते बोलत होते. यावेळी मुख्याध्यापक एस. वाय. माने, सरपंच डॉ. सुशांत मोहिते, शिवाजीराव मोहिते, भगवान मोहिते, अंकुश मोहिते, विजय जाधव, प्रमोद मोहिते, गणेश वाहगावकर, सागर मोहिते यांची प्रमुख उपस्थिती होती.

संभाजीराजांना त्यांचा बाप कळला : मरणयातना सोसूनही औरंगजेबासमोर न झुकणाऱ्या संभाजीराजांना त्यांचा बाप कळला होता, असे सांगत प्रा. हंकारे म्हणाले, तुम्हा – आम्हाला आपला बाप कळला आहे का? हे प्रत्येकाने स्वतःच्या मनाला विचारावे. तुम्हाला स्वतःचे चांगले भविष्य घडवायचे असेल, एक चांगला माणूस आणि जबाबदार नागरिक व्हायचे असेल, तर आपल्यासाठी राब राब राबणाऱ्या आई – वडिलांच्या कष्टाची नेहमी जाणीव ठेवा.

बेलवडे बुद्रुक : विद्यार्थी विद्यार्थिनींना मार्गदर्शन करताना प्राध्यापक वसंत हंकारे.

आपण शंडासारखे बघत राहतो : आज बोटावर मोजण्याइतपत माणसे जिवंत आहेत; असे सांगत प्रा. हंकारे म्हणाले, लहान मुलींवर अत्याचार होतात, त्यांना जीवे मारले जाते. अशावेळी समाज म्हणून आवाज उठवण्यापेक्षा आपण केवळ शंडासारखे बघत राहतो. लहान मुले दारू, सिगारेट, मावा, गुटखा, गांजा अशा व्यसनांच्या आहारी जातात. जुगार, रमीसारख्या जाळ्यात अडकतात. अशा कृत्यांनी आई – वडिलांची मान शरमेने खाली जाते. त्यामुळे विद्यार्थी, विद्यार्थिनींसह प्रत्येकाने आई – वडिल आणि राष्ट्रासाठी आपण काय केले? हे स्वतःला विचारावे.

स्वतःच्या अस्तित्वाची जाणीव :  छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज, राजमाता जिजाऊ, ताराराणी, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि फातिमा शेख यांची उदाहरणे देत प्रा. हंकारे यांनी मुला – मुलींना स्वतःच्या अस्तित्वाची जाणीव करून दिली.

आई – वडिलांना हे प्रश्न विचारा : आईने तुम्हाला जन्म देताना सोसलेल्या प्रसव वेदना व तिच्या माहेरपण आणि माहेरच्या माणसांच्या आठवणी, तिने केलेला त्याग, त्याचबरोबर बापाने घेतलेले कष्ट आणि त्याच्या बाप पणाच्या वेदनांबाबत मुला – मुलींनी आपापल्या आई – वडिलांना प्रश्न विचारून आई – बाप समजून घ्यावेत. जीवंत असेपर्यंत आई – बापाला काय हवं – नको ते विचारावे, त्यांची सेवा करावी.

आई – बापाच्या देवत्वाचे पूजन करा : आई – वडिलांच्या पश्चात त्यांच्या पश्चात तुम्ही कितीही पैसे कमावले, कितीही सुखसोयी मिळवल्या, देव देवतांच्या चरणावर कितीही पैसे ओतले, तरी ते तुमचे आई – वडील परत देऊ शकणार नाहीत; असे सांगत प्रा. हंकारे म्हणाले, म्हणून आपल्या आयुष्यातील बाप नावाचा देव आणि आई नावाच्या देवीचे पूजन करा, त्याची सेवा करा, त्यांना जीव लावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

मुला, मुलींना दिली शपथ : प्रा. हंकारे यांनी उपस्थित मुला, मुलींना त्यांच्या वडिलांची नव्याने भेट घडवून देत आम्ही कोणत्याही भुलथापांना, आमिषाला बळी पडणार नाही. कोणत्याही व्यसनाच्या आहारी जाणार नाही, अशी शपथही घेतली. व्याख्यानास विद्यालयातील सर्व मुले, मुली, तसेच त्यांचे आई – वडील, पालक शिक्षक, शिक्षिका व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान, प्रा. हंकारे यांनी आपल्या वाणीतून उपस्थितांच्या काळजाला हात घालत त्यांच्या मनासह डोळ्यालाही पाझर फोडला.

… त्यांना आई बापाची किंमत विचारा 

प्रत्येकाने आपल्या आई – वडिलांच्या कष्टाची जाणीव ठेवलीच पाहिजे. ज्यांना आई-वडील नाहीत, त्यांना आई – वडिलांची किंमत विचारा. अनाथाश्रमात राहणाऱ्या अनाथ मुलांना आई –  वडिलांची किंमत काय असते ते विचारा. त्यानंतर तुम्हाला आई – वडिलांची खरी किंमत आणि त्यांच्या कष्टाची जाणीव होईल, असेही प्रा. वसंत हंकारे यांनी सांगितले. 

सोशल माध्यमांना भुलू नका 

हल्ल्याची पिढी सोशल माध्यमांच्या आहारी जात आहे. परंतु, मुलींनी सोशल माध्यमांद्वारे घाणेरडा उद्देश ठेवून संपर्कात आलेल्या मुलांच्या आमिषाला, त्यांच्या भावनिक ढोंगीपणाला बळी पडू नये. तसेच मुलांनी आपल्या बहिणीसारख्या एखाद्या मुलीचे आयुष्य बरबाद करू नये. आपल्या अशा कृत्यांमुळे आई – वडिलांना जीवंतपणी सोसावं लागणारे मरण खूप वाईट असते, असे सांगत सोशल माध्यमांना न भुलता आपले घराणे, वारसा, आई – वडिलांची समाजातील पत, प्रतिष्ठा याला कोणत्याही प्रकारे गालबोट लागू देऊ नका, असेही आवाहन प्रा. हंकारे यांनी केले. 

Jan Swarashtra
Author: Jan Swarashtra

Leave a Comment

आणखी वाचा

  • Buzz4 Ai
  • Buzz Open / Ai Website / Ai Tool
error: Content is protected !!