कराड शेती उत्पन्न बाजार समितीच्यावतीने दर गुरुवारी येथील मलकापूर रोडवरील बाजार समितीच्या आवारात जनावरे बाजार भरवला जातो. येत्या शुक्रवारी (दि. 6) पासून बाजार समितीच्यावतीने यशवंतराव चव्हाण कृषी, औद्योगिक, पशू – पक्षी प्रदर्शन सुरू होत असल्याने गुरुवारी (दि. 5) होणारा जनावरांचा बाजार बंद राहणार आहे, अशी माहिती बाजार समितीचे प्रभारी सचिव आबासाहेब पाटील यांनी पत्रकाद्वारे दिली.
कृषी प्रदर्शन : गेल्या 18 वर्षांपासून कराड शेती उत्पन्न बाजार समिती कृषी प्रदर्शन भरवत आहे. लोकनेते (स्व.) विलासराव पाटील – उंडाळकर यांच्या संकल्पनेतून (स्व.) यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीनिमित्त 24 नोव्हेंबर ते 28 नोव्हेंबर या कालावधीत हे प्रदर्शन सुरू झाले. दरवर्षी प्रदर्शन भरविण्यात सातत्य राहिले आहे. परंतु, यंदा प्रदर्शनाच्या नियोजित काळात महाराष्ट्र विधानसभा निवडणुका असल्याने आचारसंहितेमुळे प्रदर्शनाच्या वेळेत बदल करण्यात आला होता.
नियोजन व तयारी : विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता संपताच प्रदर्शन भरविण्याचे नियोजन करण्यात आले. त्यानुसार येत्या शुक्रवार (दि. 6) पासून 10 डिसेंबरपर्यंत हे प्रदर्शन होणार आहे. शुक्रवारी सकाळी प्रदर्शनाचे औपचारिक उद्घाटन होणार आहे. यावेळी जिल्ह्यातून विविध खात्याचे पदाधिकारी व मान्यवर येणार असल्याने गुरुवारचा जनावरे बाजार बंद राहणार आहे. याची नोंद व्यापारी, शेतकरी व व्यावसायिकांनी घ्यावी. असेही पत्रकात नमूद करण्यात आले आहे.