कराड/प्रतिनिधी : –
“मी कोण आहे?” हा शोध घेणे मानवी जीवनाचे अंतिम उद्दिष्ट असल्याचे मत तेजज्ञान ग्लोबल फाउंडेशनचे संस्थापक तेजगुरू सरश्री यांनी व्यक्त केले.
रजत जयंती ध्यान महोत्सव : ‘हॅपी थॉट्स’ नावाने ओळखल्या जाणाऱ्या तेजज्ञान ग्लोबल फाउंडेशन या आध्यात्मिक सेवाभावी संस्थेला 25 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त कराड येथे रविवारी 1 डिसेंबर रोजी यशवंतराव चव्हाण स्मृती सदन येथे ‘रजत जयंती ध्यान महोत्सव’ (सिल्व्हर ज्युबिली सेलिब्रेशन) आयोजित करण्यात आला होता. या महोत्सवात कार्यक्रमात ध्यानावर मार्गदर्शन करणारा संदेश व्हिडिओ माध्यमातून तेजगुरू सरश्री यांनी दिला.
ध्यान का आणि कसे करावे ! कार्यक्रमाचे उद्घाटन माजी खासदार श्रीनिवास पाटील आणि शिवम प्रतिष्ठानचे संस्थापक इंद्रजीत देशमुख यांच्या हस्ते पार पडला. याप्रसंगी तेजगुरू सरश्री यांनी या कार्यक्रमात ध्यान का आणि कसे करावे, तसेच ध्यानाचे वरवरचे तसेच अंतिम लाभ म्हणजे ‘मी कोण आहे?’ या प्रश्नाचे उत्तर शोधणे, यावरही प्रकाश टाकला.
जीवनात ‘स्वल्पविराम’ घेण्याचे महत्व : रवींद्र शेंडे यांनी तेजज्ञान फाउंडेशनचे संस्थापक तेजगुरू सरश्री यांचा आणि त्यांच्या आध्यात्मिक कार्याचा परिचय करून दिला. तसेच उपस्थितांना तेजज्ञान फाउंडेशनच्या जागतिक शांततेसाठीच्या कटिबद्धतेचा उल्लेख करत, बाहेरच्या जगतात शांतता प्रस्थापित करण्यासाठी प्रथम अंतर्मनात शांतता निर्माण करणे आवश्यक असल्याचे सांगितले. त्याचबरोबर जीवनात ‘स्वल्पविराम’ घेण्याचे महत्व पटवून देत, “हातातील मोबाइल काही वेळ बाजूला ठेवून ध्यानात बसल्यास, ध्यानाद्वारे आयुष्यात हा स्वल्पविराम निर्माण होईल आणि आपल्या सर्वोच्च आनंदाचा, ‘स्व-अनुभव’ होईल,” असे त्यांनी सांगितले.
ध्यान अनुभवण्याचे मार्गदर्शन : कार्यक्रमात सर्व उपस्थितांना 21 मिनिटांचे ध्यान अनुभवण्यासाठी मार्गदर्शन करण्यात आले, ज्यातून उपस्थितांना ‘स्व-अनुभव’ मिळाला. कार्यक्रमाला सहाशे पेक्षा जास्त साधक आणि नागरिक सहभागी झाले होते. उपस्थितांनी मनोभावे कार्यक्रमाचा आनंद घेतला. माजी खासदार श्रीनिवास पाटील आणि शिवम प्रतिष्ठानचे संस्थापक इंद्रजीत देशमुख यांनी आपल्या विचारांतून उपस्थितांना संबोधित केले आणि साधनेसाठी प्रेरणा दिली.
ध्यान चॅलेंज घेण्याचा संकल्प : कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय नडे यांनी करत फाउंडेशनच्या 25 वर्षांच्या प्रवासाची ओळख करून दिली. जवळपास सर्व उपस्थितांनी 21 दिवसांचे ध्यान चॅलेंज घेण्याचा संकल्प व्यक्त केला.