पृथ्वीराज चव्हाणही रंगले गंप्पामध्ये; यशवंतराव चव्हाण साहेबांचे व्यक्तिमत्व राजकारणी, युवकांसाठी प्रेरणादायी
कराड/प्रतिनिधी : –
स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतिदिनानिमित्त येथील छत्रपती शिवाजी उद्यान ग्रूपच्यावतीने राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (बाबा) यांच्या उपस्थितीत आयोजित गप्पांगणाचा कार्यक्रम उत्साहात पार झाला. या कार्यक्रमात बाबांनी यशवंतराव चव्हाण साहेबांच्या दिल्लीतील उल्लेखनीय कार्याच्या अनेक घटना सांगून सर्वांचे लक्ष वेधले.
दिल्लीमध्ये महाराष्ट्राचे वर्चस्व : यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतींना उजाळा देताना माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, देवराष्ट्रे सारख्या खेड्यातील साधा शेतकऱ्याचा मुलगा आपल्या कर्तृत्वाने उपपंतप्रधान, संरक्षणमंत्री, अर्थमंत्री, परराष्ट्रमंत्री इत्यादी महत्वाच्या मंत्रालयाचे मत्री होते. देशाची अत्यंत बिकट परिस्थिती असताना उल्लेखनीय कारभार करुन दिल्लीमध्ये महाराष्ट्राचे वर्चस्व व ठसा निर्माण करणारे यशवंतराव चव्हाण एकमेव नेते होते.
संयुक्त महाराष्ट्र निर्मितीत महत्वपूर्ण कामगिरी : पंडित नेहरूंचे अंत्यंत विश्वासू मंत्री म्हणून यशवंतरावांना ओळखले जात असल्याचे सांगताना श्री. चव्हाण म्हणाले, चव्हाण साहेब केंद्रीय मंत्रिमंडळातील महत्वाच्या खात्यांचे कॅबिनेट मंत्री होते. त्यावेळी अनेक महत्त्वाच्या सलग बैठका घेत, हे सोपे नाही. साहेब अत्यंत अभ्यासू व बुद्धीमान होते. संयुक्त महाराष्ट्र निर्माण करण्यात यशवंतराव चव्हाणांची महत्वपूर्ण कामगिरी आहे. साहेब राजकारणात नसते; तर ते महान साहित्यिक बनले असते. असे कराडचे महान व्यक्तीमत्व आपण सर्वांनी विसरता कामा नये. त्यांच्या कार्याचा इतिहास सर्वांनी वाचला पाहिजे. तो आत्ताच्या राजकारण्यांना व युवकांना नक्कीच प्रेरणादायी आहे. चव्हाण साहेबांच्या अनेक आठवणी, प्रसंग सांगत पृथ्वीराजबाबा गंप्पागणात रंगून गेले.
अनेक पुस्तकांना चव्हाण साहेबांची प्रस्तावना : अनेक महत्त्वाच्या पुस्तकांना चव्हाण साहेबांची प्रस्तावना आहे, असे उदाहरणासह व्यासंगी अभ्यासक अरूण काकडे यांनी सांगितले.
420 पानांचा लेख : माजी राष्ट्रपती शंकर दयाल शर्मा यांच्या “भारत की महान विभुती” या हिंदी भाषेत लिहिलेल्या ग्रंथांत चार नंबरला यशवंतराव चव्हाण साहेबांच्या विषयी 420 पानांचा मोठा लेख लिहिला आहे. त्यातून यशवंतराव चव्हाण किती मोठे नेते होते, हे स्पष्ट होते, असे विजय दिवस समारोह समितीचे सहसचिव विलासराव जाधव यांनी सांगितले.
माझ्या पोराला विमानात बसवू नका : तत्कालीन पंतप्रधान पंडित नेहरू कराडमध्ये आले असताना यशवंतराव चव्हाण साहेबांच्या मातोश्री विठामाता यांना भेटण्यासाठी ते शुक्रवार पेठेतील घरी गेले. त्यावेळी मातोश्री विठामाता नेहरूंना म्हणाल्या होत्या की, माझा पोरगा लई हुशार आहे. त्याला दिल्लीला घेऊन जावा, त्याच्याकडून चांगले काम करून घ्या. पण माझी एक विनंती आहे. माझ्या पोराला फक्त विमानांत बसवू नका. ते कधीही पडेल, याची मला भिती वाटते. यावेळी पंडित नेहरू नाही बसवत म्हणाल्यावर त्यांचा जीव भांड्यात पडला.
पंडित नेहरूंनी एक रुपया खिशात ठेवला : तुमच्या पोराला विमानात नाही बसवत. असे पंडित नेहरूंनी सांगितल्यावर विठामाता यांनी त्यावेळी त्यांच्या बटव्यातून एक रूपया काढून पंडित नेहरू यांच्या हातावर ठेवला. नेहरूंनीही तो रुपाया सन्मानाने घेत आपल्या खिशात ठेवल्याचा प्रसंग वृक्षमित्र चंद्रकांत जाधव यांनी सांगितला. याप्रसंगी उपस्थितांच्या चेहऱ्यावर स्मितहास्य उमटले.
यशवंतराव चव्हाण मोठे नेते : प्रारंभी, अॅड. संभाजीराव मोहिते यांनी काही उदाहरणे देऊन यशवंतराव चव्हाण साहेब किती मोठे व्यक्तिमत्त्व होते, हे सांगून गप्पांगणास सुरुवात केली. प्रा. बी. एस. खोत यांनी आभार मानले. चंद्रशेखर नकाते, सुनिता जाधव यांनीही यशवंतराव चव्हाण साहेब यांच्याविषयी मते मांडली. या कार्यक्रमास छत्रपती शिवाजी हाउसिंग सोसायटीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.