यशवंतराव चव्हाण एक तत्वनिष्ठ राजकारणी

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा.

प्रा. डॉ. बाबुराव गुरव; ‘यशवंतराव चव्हाण.. एक मुक्त चिंतन’ विषयावर व्याख्यान

कराड/प्रतिनिधी : –

एक महान लेखक, संवेदनशील कलावंत, तळमळीचे समाजकारणी, सहकार निर्माते व शिक्षणाचे प्रणेते, तसेच सुसंस्कृत आणि मुस्तुद्दी राजकारणी म्हणून थोर नेते स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांची ओळख आहे. परंतु, विरोधी पक्षातील खासदारांचे समर्थन घेऊन पंतप्रधान होण्याची संधी असताना; वैचारिक द्रोह करायचा नाही, असे सांगून त्यांनी स्वाभिमानाने विरोधी बाकावर बसणे पसंत केले. त्यामुळे यशवंतराव चव्हाण हे महाराष्ट्र आणि भारतातच नव्हे; तर संपूर्ण जगभरात एक तत्वनिष्ठ राजकारणी म्हणूनही ओळखले गेले, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक व विचारवंत प्रा. डॉ. बाबुराव गुरव यांनी केले.

व्याख्यान : येथील यशवंतराव चव्हाण सभागृहात (टाऊन हॉल) कराड नगरपरिषद व नगर वाचनालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 51 व्या यशवंतराव चव्हाण व्याख्यानमालेत ‘यशवंतराव चव्हाण.. एक मुक्त चिंतन’ या विषयावरील व्याख्यानात मार्गदर्शन करताना ते बोलत होते. अध्यक्षस्थानी कराड नगरपालिकेचे माजी नगरसेवक सौरभ पाटील होते.

मान्यवरांची उपस्थिती : यावेळी कराड नगरपालिकेचे कर्व प्रशासकीय अधिकारी अमोल जाधव, शिक्षणमहर्षी बापूजी साळुंखे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सतीश घाडगे, प्रा. बी. एस. खोत, कर्व प्रशासकीय अधिकारी सौ. सुवर्णा फल्ले, ग्रंथपाल संजय शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती.

कराड : दीपप्रज्वलन करताना प्रा. डॉ. बाबुराव गुरव, समवेत सौरभ पाटील, प्राचार्य सतीश गाडगे, प्रा. बी. एस. खोत, अमोल जाधव, सुवर्णा फल्ले व संजय शिंदे.

ढवळेश्वर हे मूळ गाव : यशवंतराव चव्हाण यांची कौटुंबिक परिस्थिती आणि त्यांच्या शैक्षणिक वाटचालीवर बोलताना प्रा. डॉ. गुरव म्हणाले, देवराष्ट्रे हे यशवंतराव चव्हाण यांच्या मामाचे गाव असून विटा शहराजवळचे ढवळेश्वर हे त्यांचे मूळ गाव आहे. घरची अत्यंत हालाकीची परिस्थिती होती. अशावेळी त्यांनी काहीकाळ वकिलाच्या हाताखाली बेलिक म्हणून काम केले. नंतर शिक्षणासाठी कराडला आले, ते कराडचे झाले. 

भारताचा झेंडा फडकवला : कराडकरांनी शिवाजी सोसायटीत यशवंतराव चव्हाण यांना स्वतःच्या पैशातून घर बांधून दिल्याचे सांगत प्रा. डॉ. गुरव म्हणाले, मॅट्रिकचे शिक्षण सुरू असताना ते क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या सहवासात आले. त्यांची प्रेरणा घेत त्यांनी कराड येथील टिळक हायस्कूल समोरील एका झाडावर देशाचा झेंडा फडकवला. इंग्रजांनी त्यांना अटक केली. परंतु, देशाचा झेंडा फडकवणे हा गुन्हा नाही. तू माफी मागशील तर याद राख, असं ठणकवणाऱ्या मातोश्री विठामाता यांच्यासारख्या असंख्य जिजाऊ आजही भारतात आहेत. विठामाता यांच्या आदर्श संस्कारातूनच यशवंतराव चव्हाण घडले. पुढे वेणूताईंची त्यांना चांगली साथ मिळाली.

स्वातंत्र्य चळवळीतील मोठे नेते : यशवंतराव चव्हाण स्वातंत्र्य चळवळीतील एक मोठे नेते असल्याचे सांगताना प्रा. डॉ. गुरव म्हणाले, नाना पाटील तुरुंगात गेल्यावर त्यांचा लढा चालू ठेवण्याची जबाबदारी लोकांनी यशवंतरावांवर सोपवली होती. त्यांनी गुंडांनाही क्रांतिकारी चळवळीकडे वळवण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्यांच्या मवाळ भूमिकेचा स्वातंत्र्य सैनिकांनी विरोध केला. मात्र, नाना पाटील, क्रांती अग्रणी जी. डी. बापू लाड, तात्यासाहेब कोरे, नागनाथ अण्णा नायकवडी, ज्ञानोबा बुवा गुरव (तासगाव – कवठे), त्यावेळचे प्रसिद्ध वकील व त्यांचे जवळचे मित्र के. डी. पाटील (कामेरी)  यांच्यासोबत त्यांनी चळवळीत काम केले, लढा दिला. तसेच कर्मवीर भाऊराव पाटील आणि यशवंतराव मोहिते यांनीही यशवंतराव चव्हाण यांना सहकार्य केले.

कराड : प्रा. डॉ. बाबुराव गुरव यांचा सन्मान करताना माजी नगरसेवक सौरभ पाटील, समवेत उपस्थित मान्यवर.

ध्येय आणि विचारधारा : स्वातंत्र्यानंतर यशवंतराव चव्हाण आमदार झाले. दरम्यान, संयुक्त महाराष्ट्राची चळवळ उभी राहिली. परंतु, यशवंतरावांसोबत अनुकूलतेपेक्षा प्रतिकूलता जन्मभर होती. मंत्री होऊनही ते श्रीमंत झाले नाहीत. आजारी असताना उपचारालाही त्यांच्याकडे पैसे नव्हते. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत लोकांनी त्यांचा खूप छळ केला. परंतु, त्यांनी त्यांचे ध्येय आणि विचारधारा कधीही सोडली नाही.

राजकारण्यांमधील फरक : एकंदरीत यशवंतराव चव्हाण यांची नैतिकता, सुसंस्कारीपणा, स्पष्टवक्तेपणा, स्वातंत्र्य चळवळीतील त्यांच्या अनेक भूमिका यांवर अधिक विवेचन करून नैतिकतेच्या झाडांच्या जंगलातील यशवंतराव चव्हाण एक झाड होते, असे सांगताना त्यावेळचे सुसंस्कृत राजकारणी आणि आत्ताचे राजकारणी यातील फरकही प्रा. डॉ. गुरव यांनी नमूद केला. तसेच सध्याचे राजकारण आणि राजकारण्यांच्या खालवलेल्या पातळीवरही त्यांनी बोट ठेवले.

स्वातंत्र्य चळवळ आणि लढा 

कामेरी (ता. वाळवा) येथील स्वातंत्र्य सेनानी, माजी आमदार अॅड. के. डी. पाटील हे यशवंतराव चव्हाण यांचे जवळचे मित्र होते. त्यांनी यशवंतराव चव्हाण आणि वेणूताई चव्हाण यांचे लग्न ठरवले. पुढे अनेक वर्ष दोघांनी स्वातंत्र्य चळवळीत काम केले. त्यावेळी इस्लामपूर येथे झालेल्या मोर्चात यशवंतराव चव्हाण यांच्या जीवाला धोका असल्याने के. डी. पाटील यांनी त्यांना मोर्चाला जाऊ दिले नाही. तसेच कामेरी येथीलच अडीचशे बंदुकधारी सैनिक बाळगून असलेल्या सखाराम बारपटे यांचे बंड क्षमवून त्यांना स्वातंत्र्य लढ्यात सामावून घेण्याचा प्रयत्न यशवंतराव चव्हाण यांनी केला होता, असेही प्रा. डॉ. गुरव यांनी सांगितले. 

शिक्षण व सहकाराचे धोरण

यशवंतराव चव्हाण यांनी कर्मवीर भाऊराव पाटील यांना शैक्षणिक चळवळीत मदत केली. त्यांच्या आग्रहाखातर त्यांच्या पश्चात ते रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष झाले. त्यांनी गावागावात शाळा झाली पाहिजे, हे धोरण घेत शैक्षणिक धोरणाचा पाया रचला. पुढे शिवाजी विद्यापीठाची स्थापना केली. राज्यातील सर्व सहकारी साखर कारखाने यशवंतराव चव्हाण यांच्या सहीशिवाय झाले नाहीत. त्यांनी सहकाराचाही पाया घातला. त्यामुळे आज महाराष्ट्र विकासाच्या बाबतीत सर्वात पुढे असल्याचेही प्रा. डॉ. गुरव यांनी सांगितले.

विकसित महाराष्ट्राचे स्वप्न आणि जबाबदारी

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. त्यांना महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास करायचा होता. त्यादृष्टीने त्यांनी अनेक योजनाही आखल्या होत्या. परंतु, चीनच्या लढाईवेळी पंतप्रधान पंडित नेहरू यांनी त्यांना दिल्लीला बोलावून संरक्षणमंत्री पदाची जबाबदारी दिली. मात्र, ते वेणूताई चव्हाण यांना विचारून सांगतो म्हणाले. कारण त्यांना महाराष्ट्राच्या विकासाचे स्वप्न साकारायचे होते. परंतु, देशासाठी जबाबदारी स्वीकारत पुढे त्यांनी देशात महाराष्ट्राचा झेंडा फडकवल्याचे प्रा. गुरव यांनी सांगितले.

विरोधी पक्षही यशवंतराव चालवायचे

समृद्ध, सुसंस्कारी भारत उभारावा, यासाठी यशवंतराव चव्हाण यांचा लढा होता. ते विरोधकांनाही आपलेसे करायचे. एखादा प्रश्न लावून धरायचा हट्ट ते विरोधकांकडे धरायचे. विरोधात चांगली माणसे असावीत, असे त्यांचे मत होते. विरोधकांना सोबत घेऊन त्यांनी एकदा केंद्रातील सरकारही पाडले होते. विरोधी पक्षातील नेतेही त्यांचा आदर करायचे, त्यांचा शब्दही खाली पडून देत नव्हते. त्यामुळे विरोधी पक्षही यशवंतरावच चालवतात, असे लोक त्यावेळी म्हणायचे. अशाप्रकारे यशवंतराव चव्हाण यांच्या सुसंस्कृत राजकारणाचे अनेक किस्से प्रा. डॉ. गुरव यांनी सांगितले.

Jan Swarashtra
Author: Jan Swarashtra

Leave a Comment

आणखी वाचा

  • Buzz4 Ai
  • Buzz Open / Ai Website / Ai Tool
error: Content is protected !!