कराड/प्रतिनिधी : –
स्व. यशवंतराव चव्हाण साहेबांचे मतदारसंघातील समृद्ध विचाराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी कटिबद्ध असून गेल्या 25-30 वर्षांत मतदारसंघातील राहिलेला विकासकामांचा बॅकलॉग भरून काढण्यासाठी निष्ठेने काम करणार असल्याचे मत कराड उत्तर विधानसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार मनोजदादा घोरपडे यांनी व्यक्त केले.
अभिवादन : आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या 40 व्या पुण्यतिथीनिमित्त आमदार मनोज घोरपडे यांनी कराडच्या प्रीतिसंगमावर आदरांजली वाहिली. यावेळी सुरेश पाटील, चंद्रकांत मदने, अमोल पवार, हरीश पाटील, विनोद डुबल, महेश चव्हाण, अनिल मोहिते, राजू मोहिते उपस्थित होते.
हे माझे भाग्य आहे : कराड उत्तर विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रतिनिधी म्हणून राज्याचे माजी मुख्यमंत्री स्व. यशवंतराव चव्हाण साहेबांनी नेतृत्व केल्या असल्याचे सांगत श्री. घोरपडे म्हणाले, कराड उत्तर मतदारसंघाचे नेतृत्व करण्याची संधी जनतेने मला दिली, हे माझे भाग्य आहे.
सत्ताधाऱ्यांकडून सत्तेचे केंद्रीकरण : स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांचे विचार संपूर्ण महाराष्ट्रभर जोपासले जातात. सत्तेचे विकेंद्रीकरण झाले पाहिजे, ही भूमिका त्यांनी मांडली होती, असे सांगताना श्री. घोरपडे म्हणाले, गेल्या पंचवीस वर्षांत काही मंडळींनी स्वतःच्याच घरात सर्व सत्ता ठेवून यशवंत विचारालाच तिलांजली देण्याचा उद्योग केला. परंतु, कराड उत्तरच्या जनतेने मतदानातून सडेतोडपणे उत्तर देत खऱ्या अर्थाने यशवंत विचार जोपासण्यासाठीच मला सन्मानाने विधानसभेत पाठवले आहे. त्या जनतेचा मी मनापासून ऋणी आहे.
शेतीस पाणी व रोजगार निर्मितीसाठी कटिबद्ध
कराड उत्तर विधानसभा मतदारसंघातील अनेक गावात शेतीच्या पाण्याचा प्रश्न गंभीर आहे. तसेच मतदारसंघात औद्योगीकरण वाढवण्यावर भर देणारा असून युवक, युवतींच्या रोजगार निर्मितीसाठी आपण कटिबद्ध असल्याचेही आमदार श्री. घोरपडे यांनी सांगितले.
अन्याय विरोधात आवाज उठवणार
सह्याद्री सहकारी साखर कारखान्यात देखील सभासद ,कामगार यांच्यावर होत आला आहे. त्यामुळे या अन्यायाविरोधात आवाज उठवणार असल्याचे मत आमदार मनोज घोरपडे यांनी कराडच्या प्रीतिसंगमावर व्यक्त करीत सह्याद्रीच्या निवडणुकीची दिशा स्पष्ट केली आहे. त्यांच्या या वक्तव्याने कराड उत्तर विधानसभा मतदारसंघात अनेक चर्चांना उधाण आल्याचे दिसून येत आहे.