देदीप्यमान विजय : कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील हाय व्होल्टेज लढत संपूर्ण राज्यासाठी लक्षवेधी ठरली होती. काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे आत्तापर्यंत केवळ तीनच लोकप्रतिनिधींनी प्रतिनिधित्व केले असून, हे तिघेही लोकप्रतिनिधी काँग्रेसचे मातब्बर नेते राहिले आहेत. यापैकी गेल्या 10 वर्षांपासून या मतदारसंघातून राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आमदार म्हणून कार्यरत होते. त्यांचा या निवडणुकीत भाजप – महायुतीचे उमेदवार डॉ. अतुलबाबा भोसले यांनी तब्बल 39,355 मतांनी पराभव करत देदीप्यमान विजय संपादन केला आहे. या ऐतिहासिक विजयात कराड दक्षिणमध्ये पहिल्यांदाच कमळ फुलविण्यात यशस्वी झालेल्या डॉ. अतुलबाबा भोसले यांच्यावर राज्यभरातून कौतुकाचा वर्षाव सुरू आहे.
देवेंद्र फडणवीस यांची भेट : रविवारी मुंबईत नवनिर्वाचित आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांनी मुंबईत ना. देवेंद्र फडणवीस यांची सागर या त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. यावेळी ना. फडणवीस यांनी डॉ. अतुलबाबा भोसले यांचा या शानदार विजयाबद्दल विशेष सत्कार केला. तसेच डॉ. भोसले यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
सर्वच वरिष्ठ नेत्यांच्या पाठबळामुळे यश : कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील मतदारांनी माझ्यावर दाखविलेल्या विश्वासामुळे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह सर्वच वरिष्ठ नेत्यांच्या भक्कम पाठबळामुळे, महायुतीतील भाजपसह सर्वच घटक पक्षांचे पदाधिकारी, नेते व कार्यकर्त्यांच्या अविरत परिश्रमामुळे हे यश संपादन करता आल्याचे डॉ. अतुलबाबा भोसले यांनी सांगत तसेच येत्या काळात भाजप – महायुती सरकारच्या माध्यमातून कराड दक्षिणचा सर्वांगीण विकास करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.