कराड/प्रतिनिधी : –
माझ्या मनात कोणाबद्दलही द्वेष भावना, सुड भावना नाही. परंतु, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडून आपल्याला एक लोकप्रतिनिधी, मोठा नेता म्हणून खूप अपेक्षा होत्या. मात्र, त्यांनी अत्यंत खालच्या पातळीला जाऊन राजकारण केले. तसे करायला नको होते. आम्ही कधीही तसे केले नाही; कोणाला करूही दिले नाही. कराडला यशवंत विचाराचा मोठा वारसा असून तो जपत त्याला साजेसे काम करणार असल्याचे कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे नवनियुक्त आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांनी सांगितले.
नवनियुक्त आमदारांचा संवाद : कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातून माजी मुख्यमंत्री विद्यमान आ. पृथ्वीराज चव्हाण यांचा दारुण पराभव केल्यानंतर माध्यमांनी उपोषण केलेल्या प्रश्नांचे उत्तरादाखल ते बोलत होते.
कराडकरांचा विश्वास सार्थ ठरवणार : कराड शहराच्या विकासाचे व्हिजन आणि युवकांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण करण्याचा मानस डोळ्यासमोर ठेवून आम्ही या निवडणुकीला सामोरे गेल्याचे सांगताना आमदार डॉ. अतुलबाबा भोसले म्हणाले, कराडच्या विकासासाठी संधी देण्याचे आवाहन मी कराड दक्षिणमधील मतदारांना केले होते. त्यादृष्टीने कराडकरांनी विजयाच्या रूपाने मला हा कौल दिला असून कोणत्याही परिस्थितीत कराडकरांचा विश्वास सार्थ ठरवणार असल्याचे त्यांनी सांगितले.
यश मतदारांना समर्पित : आमचे नेते माजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यात महायुतीच्या माध्यमातून निवडणुका लढवण्यात आल्याचे सांगत डॉ. अतुलबाबा म्हणाले, राज्यातील मतदार बंधू – भगिनींनी साथ दिल्याने महायुतीला मोठे यश मिळाले आहे. तसेच कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातही देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनानुसार काम केले. यामध्ये भाजप मित्रपक्ष आणि आमच्या सर्व पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी अत्यंत चांगले काम केले. जनतेनेही आपल्याला संधी देऊन माझ्यावर मोठी जबाबदारी टाकली आहे. हे यश आपण कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील जनतेला समर्पित करत असल्याचेही डॉ. अतुलबाबा भोसले यांनी सांगितले.
कराड शहराचा चेहरामोहरा बदलणार : कराड शहराचा चेहरामोहरा बदलण्याचा माझा प्रयत्न राहणार असल्याचे सांगत डॉ. अतुल बाबा म्हणाले, हे करत असताना स्थानिक राजकारणाला बगल देऊन कराड शहराला देशाचा नकाशावर आणण्याचा माझा प्रामाणिक प्रयत्न राहणार आहे.
मतदारांनी स्वीकारल्याचा आनंद : मंत्रीपदाबाबत विचारलेल्या प्रश्नांना बोलताना डॉ. अतुलबाबा भोसले म्हणाले, भारतीय जनता पक्ष व महायुतीने आपल्यावर विश्वास टाकत आमदारकीचे तिकीट दिले, यातच आपल्याला आनंद आहे. तसेच कराड दक्षिणमधील मतदारांनी आपल्याला स्वीकारले, यात आनंद असून मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी आपण कटिबद्ध असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
85 नंतर रेठऱ्याला संधी
85 सालानंतर पहिल्यांदा रेठरे बद्रुकला
कराड दक्षिणचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली आहे. डॉ. अतुलबाबांनी गेल्या 10 वर्षांत विकासकामे आणण्यासाठी आणि विविध योजना जनतेपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. तसेच मतदारसंघाच्या विकासाचे व्हिजन त्यांनी लोकांसमोर ठेवले. त्याला मतदारांनीही साथ दिली. माजी मुख्यमंत्री विद्यमान आमदारांचा डॉ. अतुलबाबांनी पराभव केल्याने निश्चितच हा मोठा विजय आहे. 10 वर्षांत विद्यमान लोकप्रतिनिधींनी काहीच विकास केला नाही. काही गोष्टींची योग्य वेळ यावी लागते. डॉ. अतुलबाबांनी त्यांना असलेल्या सामाजिक कार्याचा वारसा जपत तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. त्यामुळेच हे यश मिळाल्याचे मत कृष्णा कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांनी व्यक्त केले.