आ. पृथ्वीराज चव्हाण; कुटुंबियांसमवेत बजावला मतदानाचा हक्क
कराड/प्रतिनिधी : –
महाराष्ट्रासह सातारा जिल्हा आणि कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघात अत्यंत उत्साहाने मतदान सुरू आहे. गेली दहा वर्षे ही राज्याच्या इतिहासातील वाया गेलेली वर्षे आहेत. ही गोष्ट लक्षात घेऊन कराड दक्षिणची जनता राज्यात सत्ताबदल करण्यासाठी मतदान करत असल्याचे मत राज्याचे माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केले.
मतदानाचा बजावला हक्क : कराड नगरपालिकेच्या शाळा क्रमांक 3 येथे निवडणूक प्रशासनाकडून निर्माण केलेल्या आदर्श मतदान केंद्रावर माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी त्यांच्या कुटुंबियांसमवेत आपला मतदानाचा हक्क बजावला. त्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना ते बोलत होते.
महायुतीला सर्व पातळ्यांवर अपयश : राज्याच्या विधानसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींना कोणीही प्रचाराला बोलावले नाही. त्यांनी हिंदुत्व वातावरण निर्मिती करून, अल्पसंख्याकांमध्ये द्वेष पसरवून, धर्मा-धर्मांमध्ये, जाती-जातीमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला. तसेच पैशाचा आणि सत्तेचा मोठ्या प्रमाणात गैरवापरही केला. परंतु, त्यांना कोणत्याही पातळयांवर यश आलेले नाही. त्यामुळे महाराष्ट्रात महाविकास आघाडीलाच बहुमत मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
माध्यमांशी संवाद : माध्यमांच्या प्रश्नावर बोलताना आ. चव्हाण म्हणाले म्हणाले, माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याचा निषेध करावा तेवढा थोडा आहे. विनोद तावडेही पैसे वाटताना सापडले. हितेंद्र ठाकूर यांनी महायुतीच्या काही नेत्यांनी टीप दिल्याचे म्हटले आहे. तर काही आणखी कोणी मोठ्या नेत्यांची नावे घेत आहेत. त्यामुळे आपण हरलो तर तावडे यांच्या प्रकरणामुळे हरलो आणि जिंकलो तर तावडे प्रचारातून बाहेर होते, असे बोलले जाईल. परंतु, एकंदरीत वातावरण पाहता राज्यात महाविकास आघाडीचे सरकार येणार असून सत्तेत आल्यानंतर बऱ्याच गोष्टी सुधारायच्या आहेत, असेही त्यांनी सांगितले.