महाराष्ट्र राज्य सार्वत्रिक निवडणूक 2024 साठी उद्या बुधवार, दि. 20 नोव्हेंबर रोजी सकाळी 7 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत प्रत्यक्ष पार पडणाऱ्या मतदान प्रक्रियेसाठी 260 कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघ व 259 कराड उत्तर विधानसभा मतदारसंघासाठी केंद्रनिहाय निवडणूक पथके रवाना करण्यात आली. त्याचबरोबर प्रत्येक मतदान केंद्रनिहाय पोलीस बंदोबस्त ही रवाना करण्यात आला आहे.
260 कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघ : कराड दक्षिण मतदार संघातील एकूण 342 मतदार केंद्रांवरील नियुक्त कर्मचारी मतदान साहित्यासह आज (मंगळवारी) मतदान केंद्रावर रवाना झाले. यामध्ये नियोजित केंद्रावर जाण्यासाठी 57 एसटी बस, 1 मिनीबस व 5 जीपची व्यवस्था करण्यात आली होती. यावेळी मतदान कर्मचाऱ्यांचे तिसरे प्रशिक्षण घेण्यात आले.
अधिकारी व कर्मचाऱ्यांना आवश्यक सूचना : 260 कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी अतुल म्हेत्रे, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी स्मिता पवार यांनी बुधवारी प्रत्यक्ष होणाऱ्या मतदानाबद्दल काय दक्षता घ्यावी. तसेच विनाविलंब कामकाज कसे पूर्ण करावे, याची सविस्तर माहिती दिली.
काटेकोर नियोजन : आचारसंहिता सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी प्रताप पाटील, सहा. सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी प्रताप कोळी, निवडणूक नायब तहसीलदार हेमंत बेसके, प्रभारी नायब तहसीलदार युवराज पाटील यांनी साहित्य वाटप सुलभ होण्यासाठी अत्यंत काटेकोरपणे नियोजन केले.
प्रशिक्षण व साहित्य वितरण : निवडणूक निरीक्षक गीता ए. यांनी उपस्थित राहून निवडणूक ड्युटीवरील कर्मचाऱ्यांना शुभेच्छा दिल्या. पथकातील मतदान कर्मचाऱ्यांची बसण्याची व्यवस्था नियोजनबद्ध करण्यात आली होती. त्यामुळे पथकाचे तात्काळ एकत्रीकरण होऊन कोणत्याही गोंधळाशिवाय नियोजित वेळेत प्रशिक्षण व मतदान साहित्य वितरण वेळेत होऊन कर्मचारी बसकडे रवाना झाले. मतदान कर्मचाऱ्यांनी आणलेल्या वाहनांची पार्किंग व्यवस्था बैल बाजाराच्या आवारात करण्यात आली होती. यावेळी वाहतूक व्यवस्थेचे योग्य नियोजन केल्यामुळे कुठेही वाहतुकीची कोंडी झाली नाही.
259 कराड उत्तर विधानसभा मतदारसंघ : कराड उत्तर मतदार संघातील एकूण 356 मतदार केंद्रांवरील नियुक्त कर्मचारी मतदान साहित्यासह मतदान केंद्रांवर रवाना झाले. नियोजित केंद्रावर जाण्यासाठी 57 एसटी बस, 2 मिनीबस व 9 जीपांची व्यवस्था करण्यात आली होती.
महत्त्वाच्या सूचना : मतदान कर्मचाऱ्यांना 259 कराड उत्तर विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी विक्रांत चव्हाण, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी कल्पना ढवळे, लालासाहेब गावडे, डॉ. जस्मिन शेख यांनी सूचना दिल्या.
योग्य नियोजन व सुसूत्रता : साहित्य वितरणावेळी निवडणूक निरीक्षक गीता ए या उपस्थित होत्या. पथकांतील मतदान कर्मचाऱ्यांची बसण्याची व्यवस्था टेबल निहाय करण्यात आल्याने पथकाचे तात्काळ गठन झाले. मतदान साहित्य वितरणाचे योग्य नियोजन केल्यामुळे नियोजित वेळेत साहित्य वितरण झाले. मतदान कर्मचाऱ्यांनी आणलेल्या चारचाकी व दुचाकी वाहनांच्या पार्किंगची व्यवस्था बैल बाजाराच्या आवारात करण्यात आली होती. वाहतूक व्यवस्थेचे योग्य नियोजन केल्यामुळे वाहतुकीची कोठेही कोंडी झाली नाही.
साहित्य वितरण : मतदान केंद्रनिहाय अधिकारी व कर्मचाऱ्यांना साहित्य वितरणाचे काम नायब तहसीलदार उबारे, सहाय्यक महसूल अधिकारी युवराज काटे, प्रशांत कोळी,, तर वाहतूक व्यवस्थेचे नियोजन प्रादेशिक परिवहन विभागाचे निरीक्षक सचिन बिटले व त्यांच्या सहकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.