या निवडणुकीत पृथ्वीराजबाबा चव्हाण निवडून आल्यानंतर मुख्यमंत्री, पक्षाचे प्रदेशाध्यक्ष, विधानसभेचे अध्यक्ष होतील. अशावेळी कराड दक्षिणमध्ये निधी संपायचा नाही, एवढा मिळेल. 288 आमदारांमध्ये पृथ्वीराजबाबा सभ्य आणि सुसंस्कृत नेते आहेत. मंत्रालयातील सचिवांना बाबाच मुख्यमंत्री हवे आहेत. पण त्यांच्यावर असभ्य बोलता, हे चुकीचे आहे. ते राजकारणातील संत आहेत. असा राज्याचा प्रमुख होणारा नेता कराड दक्षिणमधून निवडून द्या, असे प्रतिपादन माजी आ. रामहरी रूपनवर यांनी केले.
प्रचार सभा : कार्वे (ता. कराड) येथे महाविकास आघाडीतर्फे काँग्रेसचे उमेदवार आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेचे बोलत होते. अध्यक्षस्थानी भास्करराव थोरात होते. यावेळी आ. पृथ्वीराज चव्हाण, अॅ ड. उदयसिंह पाटील – उंडाळकर, जयवंतराव उर्फ बंडानाना जगताप, अजितराव पाटील – चिखलीकर, प्रदेश युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष शिवराज मोरे, मनोहर शिंदे, फारुख पटवेकर आदींची प्रमुख उपस्थिती होती.
संविधानातील निम्मी घटना बदलली : संविधानमधील निम्मी घटना भाजपच्या नेत्यांनी बदलली आहे. जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगरपालिकेच्या निवडणूका होत नाहीत, असे सांगत श्री. रूपनवर म्हणाले, यावरून स्पष्ट होते. भाजपवाल्यांनी जनतेच्या मालकीच्या कंपन्या विकल्या. यातून या मंडळींना पुन्हा हुकुमशाही आणायची आहे.
राज्यात सत्ताबदल करा : देशात दहा वर्षे भाजप आणि संघाचे राज्य होते. त्यांच्या प्रगती पुस्तकावर जनतेने लोकसभा निवडणुकीत नापास हा शेरा मारल्याचे सांगत आ. पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, भाजप सरकारने एकाही प्रश्नाचं सोडवणूक होत नाही. पुन्हा तेच होणार आहे. त्यासाठी आता राज्यात सत्ताबदल करा.
आश्वासनांना भुलू नका : देशाचा सर्वांगीण विकास काँग्रेसच्या माध्यमातून झाल्याचे सांगत अॅ ड. उदयसिंह पाटील – उंडाळकर म्हणाले, बहुजन समाज शिक्षित झाला. कृषी, औद्योगिक विकासाचा पायाही काँग्रेसने उभा केला. उद्यापासून अमिषांचा पूर येईल, कामगारांची यादी बनेल. यातील काहीही घडणार नाही. त्यांना केवळ समाजाला झुलवायचे आहे. त्यांच्या आश्वासनांना बळी पडू नका.
भाषणे : अजितराव पाटील चिखलीकर, फारुख पटवेकर, जयवंतराव उर्फ बंडानाना जगताप, जनार्दन देसाई, अॅ ड. विकास जाधव, डॉ. सुधीर जगताप, रामभाऊ दाभाडे यांची भाषणे झाली. अशोकराव थोरात यांनी प्रास्ताविक केले. विजय माने यांनी सूत्रसंचालन केले.