दलित महासंघाचा डॉ. अतुलबाबा भोसले यांना पाठिंबा

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा.

प्रा. डॉ. मच्छिंद्र सकटे यांची माहिती; आमची मते निर्णय भूमिका बजावतील

कराड/प्रतिनिधी : –

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दलित अनुसूचित जाती जमाती आणि मातंग समाजाची अस्मिता जोपासण्याची काम केले आहे. त्यामुळे त्याच महायुतीचे उमेदवार असलेले डॉ. अतुलबाबा भोसले यांना आपण जाहीर पाठिंबा देत असल्याची घोषणा दलित महासंघाचे अध्यक्ष संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. मच्छिंद्र सकटे यांनी केली.

पत्रकार परिषद : कराड येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी माजी आ. आनंदराव पाटील, संग्राम सकट, भरत साठे, विद्याचरण खिलारे, गणेश तुपे यांची उपस्थिती होती.

महाविकास आघाडीकडून अन्याय; महायुतीकडून न्याय : गत विधानसभेला महाविकास आघाडीने माळशिरस, सोलापूर आणि लातूरमध्ये अनुसूचित जाती जमातीला उमेदवारी नाकारून तोंडचा घास काढून घेतल्याचे सांगत प्रा. सकटे म्हणाले, याबाबत आपण वरिष्ठ नेत्यांकडे दाद मागूनही उपयोग झाला नाही. देगलूरमध्ये भाजप महायुतीकडून समाजावर अन्याय झाला. परंतु, ते निदर्शनास आणून देताच देवेंद्र फडणवीस यांनी जनसुराज्य पक्षाची उमेदवारी मागे घेत त्याठिकाणी अनुसूचित जाती जमातीला न्याय दिला. ते माळशिरसमध्ये शरद पवार आणि मोहिते – पाटलांना का जमले नाही? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

मातंग व दलित समाजासाठीचे कार्य महत्त्वपूर्ण : दलित महासंघ ही शाहू, फुले, आंबेडकर, अण्णा भाऊ यांच्या विचाराने काम करणारी संघटना असल्याचे सांगत प्रा. सकटे म्हणाले, गेल्या 33 वर्षांपासून ही संघटना महाराष्ट्रात कार्यरत असून मातंग समाजासह इतर दलित भटका विमुक्त समाज हा या संघटनेचा जनाधार आहे. गेल्या अडीच वर्षांमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली महायुती सरकारने ज्या पद्धतीने मातंग समाज आणि एकूणच दलित समाजाच्या अनुषंगाने केलेले कार्य केले, महत्त्वपूर्ण आहे.

भाजपने संविधानाचा सन्मान केला : भाजप संविधान विरोधी असल्याचे विरोधकांकडून बोलले जात आहे. हे साफ चूक असल्याचे सांगत प्रा. सकटे म्हणाले, नरेंद्र मोदी यांनी 26 नोव्हेंबर हा दिवस ‘संविधान दिन’ म्हणून जाहीर केला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे लंडन येथील घर खरेदी करून तेथे स्मारक उभारले, देवेंद्र फडणवीस यांनी
मास्को (रशिया) येथे अण्णा भाऊ साठे यांचा पुतळा उभारला, त्यांचे चिरागनगर (मुंबई) येथे 305 कोटी रुपयांचे स्मारक उभारण्याचा निर्णय घेतला, वाटेगाव येथील स्मारकासाठी 25 कोटी रुपये जाहीर केले, रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट, मुंबईची (आर्टी) स्थापना केली. पुणे येथे उभारण्यात येणाऱ्या आद्य क्रांतिगुरु लहुजी वस्ताद साळवे यांचे 120 कोटी रुपयांच्या स्मारकाचे भूमिपूजन आणि कामास प्रारंभ झाला आहे, अनुसूचित जाती अंतर्गत आरक्षण उपवर्गीकरणास गती देण्याच्या दृष्टीने निवृत्त न्यायाधीश मा. बदर यांच्या अध्यक्षतेखाली अभ्यास समितीची स्थापना करून समाजाचे अस्मिता जोपासण्याचे काम केले आहे. त्यामुळे आपण कराड दक्षिणमध्ये महायुतीचे उमेदवार डॉ. अतुलबाबा भोसले यांना जाहीर पाठिंबा देत आहोत.

पाठिंब्याचे पत्र : याप्रसंगी प्रा. मच्छिंद्र सकटे व सहकार्यांनी माजी आ. आनंदराव पाटील यांच्याकडे दलित महासंघाच्या वतीने महायुतीतर्फे भाजपचे अधिकृत उमेदवार डॉ. अतुलबाबा भोसले यांना जाहीर पाठिंबा देत असल्याचे पत्र सुपूर्द करण्यात आले.

आमची मते निर्णय ठरतील

कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघात मातंग समाजाची सुमारे 10 हजार मते असून याठिकाणी अडीच हजारांच्या आसपास संघटनेचे कार्यकर्ते आहेत. त्यामुळे गतवेळच्या निवडणुकीत विजय उमेदवाराला असलेले मताधिक्य पाहता या ठिकाणी दलित महासंघ, तसेच मातंग समाजाचे मते निर्णय ठरतील असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

दलित महासंघाचा फायदा होईल

प्रा. डॉ. मच्छिंद्र सकटे यांनी नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत खा. उदयनराजे भोसले यांना जाहीर पाठिंबा दिला होता. तर सध्याच्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी सांगली, कोल्हापूर, पुणे आणि सातारा येथील महायुतीच्या सर्व उमेदवारांनाही पाठिंबा दिला आहे. ते चळवळीतील एक सक्रिय कार्यकर्ते असून त्यांचे तळागाळातील लोकांशी घनिष्ठ संबंध आहेत. त्यामुळे त्यांच्या पाठिंब्याचा डॉ. अतुलबाबा भोसले यांना नक्कीच फायदा होईल, असे मत माजी आ. आनंदराव पाटील (नाना) यांनी व्यक्त केले.

Jan Swarashtra
Author: Jan Swarashtra

Leave a Comment

आणखी वाचा

  • Buzz4 Ai
  • Buzz Open / Ai Website / Ai Tool
error: Content is protected !!