नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारने देशाच्या संरक्षण व्यवस्थेला बळकटी दिली आहे. आजी – माजी सैनिकांच्या हितासाठी त्यांनी अनेक कल्याणासाठी निर्णय घेतलेत. त्यामुळे राज्यात पुन्हा भाजप-महायुतीचे सरकार आणण्यासाठी कराड दक्षिणमधून डॉ. अतुलबाबा भोसले यांना मोठ्या मताधिक्याने निवडून देण्याचा निर्धार माजी सैनिकांनी व त्यांच्या कुटुंबियांनी वाठार येथे आयोजित भव्य मेळाव्यात केला.
मान्यवरांची उपस्थिती : महायुतीतर्फे भाजपचे कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील उमेदवार डॉ. अतुलबाबा भोसले यांच्या प्रचारार्थ वाठार (ता. कराड) येथे माजी सैनिक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी सैनिक फेडरेशनचे प्रशांत कदम, एस. ए. माशाळकर, व्ही. वाय. चव्हाण, निवृत्त सुभेदार नागेश जाधव, निवृत्त कर्नल महादेव काटकर, ‘मेस्को’चे मोहिते, जयराम स्वामी मठाचे विठ्ठलस्वामी महाराज आदी मान्यवर उपस्थित होते.
माजी सैनिकांच्या हिताला प्राधान्य :माजी सैनिक व त्यांच्या कुटुंबियांशी संवाद साधताना डॉ. अतुलबाबा भोसले म्हणाले, आपला जिल्हा हा शूरवीरांचा व सैनिकांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. देशात 2014 नंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कणखर नेतृत्वामुळे देशाचे संरक्षण क्षेत्र अधिक मजबूत झाले आहे. आज शेजारील देश आपल्याकडे वाकड्या नजरेने पाहू शकत नाहीत. पंतप्रधान मोदींनी देशातील आजी – माजी सैनिकांच्या हिताला नेहमीच प्राधान्य देण्याचे धोरण आखले.
सैनिक व त्यांच्या कुटुंबीयांचे प्रश्न सोडवणुकीसाठी कटीबद्ध :देशसेवेसाठी तत्पर असलेल्या सर्वच सैनिकांबद्दल व त्यांच्या कुटुंबीयांबद्दल मला नितांत आदर आहे. त्यामुळे कराड दक्षिणमधील आजी – माजी सैनिकांच्या व त्यांच्या कुटुंबीयांच्या प्रत्येक प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी मी सदैव कटीबद्ध असून, आपली सेवा करण्याची संधी मला मिळावी, असे आवाहन डॉ. भोसले यांनी केले.
जाहीर पाठिंबा : यावेळी माजी सैनिकांनी डॉ. अतुलबाबा भोसले यांना जाहीर पाठिंबा देत, त्यांच्या विजयाचा निर्धार केला. याप्रसंगी माजी सैनिक व त्यांचे कुटुंबीय मोठ्या संख्येने उपस्थित होते.