कराड/प्रतिनिधी : –
कराड दक्षिण व उत्तर विधानसभा मतदारसंघात परिवर्तन अटळ आहे. डॉ. अतुलबाबा भोसले आणि मनोजदादा घोरपडे दोन्हीकडे कमळ फुलवून इतिहास घडवतील, असा विश्वास ना. प्रवीण दरेकर यांनी व्यक्त केला.
माध्यमांशी संवाद : कराड येथे माध्यमांशी संवाद साधताना ते बोलत होते. यावेळी जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम, विक्रम पावसकर, रामकृष्ण वेताळ एकनाथ बागडी यांची उपस्थिती होती.
कराड उत्तरच्या विकासाची पोलखोल : पंचवीस वर्षे सत्तेत असलेल्या ज्या आमदारांना उत्तरेत मतदारसंघाचा विकास करता आला नाही, तेच आता या निवडणुकीत नोकऱ्या देऊन बेरोजगारी हटवण्याच्या आणि विकासाच्या बाता मारत असल्याचे संगत ना. दरेकर म्हणाले, देवेंद्र फडणवीस यांनी कराड उत्तरसाठी 100 कोटी रुपये दिलेत. त्यामुळे विरोधकांची पोलखोल झाली असून उत्तरेत मनोज घोरपडे निवडून येतील.
पृथ्वीराज चव्हाण दक्षिणमध्ये काय विकास केला : पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर निशाणा साधताना ना. दरेकर म्हणाले, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण त्यांच्या काळात कराड दक्षिणमध्ये काय विकास केला? असा सवाल उपस्थित करत या ठिकाणीही भाजपचे डॉ. अतुलबाबा भोसले पृथ्वीराज चव्हाण यांचा पराभव करतील. ही गोष्ट लिहून ठेवा, असाही ठाम विश्वास ना. दरेकर यांनी व्यक्त केला.
‘महाराष्ट्र धर्म’ म्हटल्यावर विरोधकांना का भोचते? : ‘बटेंगे तो कटेंगे, एक है तो सेफ है’ या भाजपच्या मुद्द्यांवर विरोधकांकडून टीकेची झोड उठवली जात असल्याचे सांगत ना. दरेकर म्हणाले, केवळ मतांच्या राजकारणासाठी वक्फ बोर्डाच्या मागण्या काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मान्य करतात, हे चालते. आणि देवेंद्र फडणवीस यांनी ‘महाराष्ट्र धर्म’ म्हटल्यावर विरोधकांना का भोचते, अशी टीकाही त्यांनी केली.
शिवरायांच्या पुतळ्याचे भावनिक राजकारण : प्रियंका गांधी यांच्या वक्तव्याच्या समाचार घेताना ना. दरेकर म्हणाले, शिवरायांच्या पुतळ्याच्या मुद्द्यावर लोकांना भावनिक करून राजकारण केले जात आहे. परंतु, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखालील सरकार शिवरायांचा आदर्श घेऊनच काम करत आहे. जी गोष्ट घडली, ती घडली. या प्रकरणाची चौकशी करून संबंधितांना शिक्षाही होईल. उद्धव ठाकरे यांच्या वचननाम्यातून हिंदुहृदयसम्राट हा शब्द गायब झाला असल्याचे सांगत ते म्हणाले, बाळासाहेबांचे विचार आणि भूमिका जपण्याचे काम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली केले आहे.
पृथ्वीराज चव्हाण यांच्या सर्टिफिकेटची गरज नाही : राजकारणामध्ये विकासाच्या मुद्द्यावर बोला, असे बजावत ना. दरेकर म्हणाले, पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडून आम्हाला चारित्र्याचे सर्टिफिकेट घेण्याची गरज नाही. मराठी भाषेत अनेक म्हणी असून त्याचा बोलताना अनेकदा उच्चार होतो. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर बोलतानाच्या वक्तव्याचाही चुकीचा विपर्यास काढला जात असल्याचे त्यांनी सांगितले.
तुम्ही योजनेला कुठून पैसे आणणार? : पृथ्वीराज चव्हाण खोटे बोलत असल्याचे सांगताना ते म्हणाले, महायुती सरकारने आणलेल्या लाडकी बहिण योजनेचे दीड हजार रुपये द्यायला सरकारकडे पैसे नाहीत. मग महाविकास आघाडीचे सरकार आल्यावर तीन हजार रुपये देतो, असे म्हणणारे पृथ्वीराज चव्हाण कुठून पैसे आणणार? असा सवालही त्यांनी उपस्थित केला. तसेच ही योजना बंद पाडण्यासाठी कोर्टात जाणाऱ्यांनी याच्यावर बोलू नये, असे त्यांनी बजावले.
प्रहारचा निवडणुकीवर परिणाम नाही
प्रहारच्या उमेदवारांचा निवडणुकीवर काय परिणाम होईल, या प्रश्नावर बोलताना ना. दरेकर म्हणाले, महाराष्ट्राच्या इतिहासात शिंदे, फडणवीस आणि पवारांच्या आमदारांनी मोठ्या प्रमाणावर निधी आणून विकासकामे केली. केंद्रात आणि राज्यात एकच सरकार असल्यावर विकास होतो, हे लोकांना माहिती आहे. त्यामुळे प्रहार चे उमेदवार जिंकणार नाहीत. तसेच त्यांचा या निवडणुकीवर काही परिणाम होणार नाही, असे मत त्यांनी व्यक्त केले.
महायुतीने महाराष्ट्र एक नंबरवर आणला
उद्धव ठाकरे यांच्या काळात आर्थिकदृष्ट्या महाराष्ट्र कितव्या क्रमांकावर होता, हे पहा. महायुती सरकारने हा महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आणला आहे. परदेशी गुंतवणूक 52 टक्के वाढली. हे कशाचे द्योतक आहे, असाही प्रतिप्रश्न एका एका प्रश्नाच्या उत्तरादाखल बोलताना ना. दरेकर यांनी उपस्थित केला.