कराड/प्रतिनिधी : –
राज्यातील भाजप सरकारने विकासाच्या योजना राबविण्याऐवजी राजकारण करून राज्य अस्थिर केले. देशातील युवकांच्या मनात न्यूनगंड निर्माण करून आपली राजकीय पोळी भाजण्याचे काम केल्याचे प्रतिपादन प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस अॅ ड. उदयसिंह पाटील – उंडाळकर यांनी केले.
युवक मेळावा : कराड येथे कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीतर्फे काँग्रेसचे उमेदवार आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रचारार्थ आयोजित युवक मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी आ. पृथ्वीराज चव्हाण, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष शिवराज मोरे, राष्ट्रवादीचे (शरद पवार गट) शहराध्यक्ष पोपटराव साळुंखे, बाळासाहेब मोहिते, ज्ञानदेव राजापूरे, अक्षय सुर्वे आदीसह मोठ्या संख्येने युवक यावेळी उपस्थित होते.
‘बटेंगे तो कटेंगे’चे नेरेटिव्ह : छत्रपती शिवाजी महाराज यांनी सर्वधर्म समभाव जपला. परंतु, देव आणि धर्माचे राजकारण करणं, हे चुकीचं आहे. ‘बटेंगे तो कटेंगे’चे नेरेटिव्ह वापरले जात असल्याचे सांगत श्री. उंडाळकर म्हणाले, आपल्याच लोकांना जाती, धर्म, वर्ण द्वेष यामध्ये अडकवून त्यांच्या राजकारणासाठी उपयोग करून घेतला जात असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
भूकंप संशोधन केंद्र वरदान : भूकंप होण्याची पूर्वसूचना अर्धा तास आधी जरी मिळाली, तरी हजारो नागरिकांचे प्राण वाचू शकतील. या दृष्टीने भूकंप संशोधन केंद्र कराडला आणल्याचे सांगत आ. पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, कोयना धरणापासून काही अंतरावर आठ किलोमीटर खोल छिद्र पाडून त्यामध्ये काही सेन्सेटिव्ह उपकरणे ठेवली आहेत. त्यामुळे भूकंप होण्याआधीची माहिती मिळते. त्याचे संशोधन हजारमाचीच्या भूकंप संशोधन केंद्रात होत असून हे भूकंप संशोधन केंद्र एक वरदान ठरणार आहे.
कराड जिल्हा करणारच
सत्तेचा उपयोग जनतेचा सार्वजनिक विकास करण्यासाठी झाला पाहिजे. हे माझे धोरण आहे. येत्या 23 तारखेला महाविकास आघाडीचे सरकार येणार आहे. त्यामुळे आपण कराड जिल्हा करणारच आहोत. तसेच कराडचा आणखी शाश्वत आणि जास्त विकास करता येईल, असा विश्वास आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केला.