पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर दुसऱ्याच्या विकासकामांचे श्रेय घेण्याची वेळ 

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा.

देवेंद्र फडणवीस यांची टीका; कराडला महायुतीची विराट सभा 

कराड/प्रतिनिधी : – 

भाजप – महायुती सरकारने केलेली कामे आम्हीच केल्याचे सांगण्याची वेळ पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर आली आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिलेल्या पैशांतून झालेला कराडचा उड्डाणपूल मीच केल्याचेही ते सांगत आहेत. ही प्रवृत्ती बरी नव्हे. मुख्यमंत्री असताना शिवाजी स्टेडियमसाठी त्यांनी फुटकी कवडीही दिली नाही. अतुलबाबांच्या मागणीवरून मी शंभर कोटी दिले. केलेल्या कामांचे श्रेय जनताच देत असते; ते मागावे लागत नाही. पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर ती वेळ आली असल्याची बोचरी टीका राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.

कराड : डॉ. अतुलबाबा भोसले यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेतील विराट जनसमुदायास संबोधित करताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.

महायुतीची विराट सभा : कराड येथे महायुतीतर्फे भाजपचे उमेदवार डॉ. अतुलबाबा भोसले यांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर प्रचारसभेत ते बोलत होते. यावेळी भगवंत खुबा, खा. उदयनराजे भोसले, जेष्ठ नेते मदनराव मोहिते, कृष्णा कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले, माजी आ. आनंदराव पाटील, विक्रम पावसकर, उत्तराताई भोसले, गौरवीताई भोसले, शहराध्यक्ष एकनाथ बागडी, कराडच्या माजी नगराध्यक्षा रोहिणी शिंदे, माजी उपनगराध्यक्ष राजेंद्रसिंह यादव यांची प्रमुख उपस्थिती होती.

कराड दक्षिणसाठी काय केले : खरंतर पुणे – कोल्हापूर महामार्गाच्या कामाचे खरे श्रेय खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांचे असल्याचे सांगत ना. फडणवीस म्हणाले, स्वातंत्र्यानंतर देशात तब्बल 60 वर्ष सत्ता असताना काँग्रेसने नेमका काय विकास केला, हे सांगावे. कराड दक्षिणमध्येही याहून काही वेगळी परिस्थिती नाही. याठिकाणी आनंदराव चव्हाण, प्रेमिलाकाकी चव्हाण आणि पृथ्वीराज चव्हाण या चव्हाण कुटुंबीयांकडे लोकप्रतिनिधित्व असताना त्यांनी कराड दक्षिणसाठी काय केले. मुख्यमंत्री असताना पृथ्वीराज चव्हाण यांनी फुटकी कवडीही दिली नाही. त्यामुळे प्रचारात त्यांच्याकडे सांगायला विकासकामांचे मुद्देच नाहीत, अशी टीकाही त्यांनी केली. 

झोपडपट्टी वासियांना पक्की घरे : मी मुख्यमंत्री असताना झोपडपट्टी असलेली जागा संबंधितांच्या नावावर करून त्याठिकाणी त्यांचे पुनर्वसन करण्याचा निर्णय घेतला. परंतु, त्यात काही अडथळे आल्याचे सांगत ना. फडणवीस म्हणाले, उपमुख्यमंत्री असताना जमीन खाजगी मालकीची असली, तरी त्याची मालकी संबंधितांना देऊन त्याठिकाणी घरे बांधून देण्याचा निर्णय घेतला. आता डॉ. अतुलबाबा यांनी केलेल्या मागणीची दखल घेत कराडच्या पाटण कॉलनी व मलकापुरातील झोपडपट्टी वासियांना आपण पक्की घरे बांधून देऊ. पुढच्या पंचवार्षिक निवडणुकीत अतुलबाबा पक्क्या घरात राहणाऱ्या लोकांकडेच मते मागतील. असा शब्दही त्यांनी यावेळी दिला. 

दक्षिणेत मोठे उद्योग येतील : भोसले कुटुंबियांनी वैद्यकीय विद्यापीठ, कृष्णा हॉस्पिटल, कृष्णा बँक, पतसंस्था, अन्य शिक्षण समूहाच्या माध्यमातून आरोग्य सुविधेसह मोठी रोजगार निर्मिती केली केल्याचे सांगत ना. फडणवीस म्हणाले, करोना काळातही त्यांनी सातारा व सांगली जिल्ह्यातील तब्बल नऊ हजार लोकांचा जीव वाचवण्याचे काम केले. आता कराडच्या एमआयडीसीला आपण फाईव्ह स्टार दर्जा देणार असून याठिकाणी मोठे उद्योग येतील. त्या माध्यमातूनही लोकांच्या हाताला रोजगार मिळेल. यासाठी डॉ. अतुलबाबांना जनतेने विधानसभेत पाठवावे, असे आवाहनही ना. फडणवीस यांनी यावेळी केले.

कराड : डॉ. अतुलबाबा भोसले यांनी कराड दक्षिणमध्ये केलेल्या विकासकामांचा “अतुलपूर्व” हा जाहीरनामा प्रकाशित करताना मान्यवर.

मी निवडून आलो; तेव्हाच अतुलबाबांचा विजय : चव्हाण कुटुंबीयांनी 60 वर्षांत अनेक मंत्रिपदे भूषवताना कराड दक्षिण व सातारा जिल्ह्यासाठी कोणतेही ठोस काम आणले नसल्याचे सांगत खा. उदयनराजे भोसले म्हणाले, काँग्रेसच्या याच भूमिकांमुळे बालेकिल्ला राहिलेला सातारा जिल्हा आता भाजपचा बालेकिल्ला झाला आहे. त्यामुळे आता कराड दक्षिणमध्येही परिवर्तन अटळ असून मी ज्यावेळी लोकसभा निवडणूक जिंकलो. त्याचवेळी खरंतर अतुलबाबांचा विजय झालेला आहे, असे त्यांनी यावेळी सांगितले.

भाजपमुळे माजी मुख्यमंत्र्यांवर बिकट वेळ : कराड दक्षिणमध्ये वाढलेल्या भाजपच्या ताकदीमुळे माजी मुख्यमंत्र्यांना शनिवार पेठ, मंगळवार पेठ, बुधवार पेठ, पाटण कॉलनी सोडता येईना. एवढी त्यांच्यावर बिकट वेळ आली आल्याचे सांगत डॉ. अतुलबाबा भोसले म्हणाले, वडील, मातोश्री व स्वतः मंत्री, मुख्यमंत्रीपदी असताना त्यांना स्वतःच्या घरासमोरील झोपडपट्टी हटवता आली नाही. उलट झोपडपट्टीचा त्रास होऊ नये, यासाठी त्यांनी आपल्या घराच्या कंपाउंडच्या भिंती उंचावून घेतल्याची टीकाही त्यांनी केली.

कराड : विराट सभेत बोलताना डॉ. अतुलबाबा भोसले.

विकासावर बोलायला मुद्देच नाहीत : दहा वर्षांत केलेल्या विकासावर बोलायला विद्यमान लोकप्रतिनिधींकडे मुद्देच नसल्याची टीका करत अतुलबाबा म्हणाले, आपण कृष्णा उद्योग समूहासह आता कराडच्या फाईव्ह स्टार एमआयडीसीच्या माध्यमातूनही मोठी रोजगार निर्मिती होणार आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही मागणी मान्य करून कराडचे उद्योगनगरीत रूपांतर करावे, अशी मागणी त्यांनी यावेळी केली.

आमच्या पेनला लकवा मारलेला नाही 

“फाईलवर सही करताना पृथ्वीराज चव्हाण यांच्या हाताला लकवा मारतो” अशा जेष्ठ नेते शरद पवार यांनी केलेल्या जुन्या वक्तव्याची आठवण करून देत ना. फडणवीस यांनी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर निशाणा साधला. परंतु, आमच्या पेनला लकवा मारलेला नाही. असे सांगत कराड दक्षिणमधील मतदारांनी डॉ. अतुलबाबांना आमदार करून पाठवावे. अतुलबाबांनी केलेल्या विकासकाकांच्या मागणीपत्रांवर मी नॉनस्टॉप सह्या करेन, अशी ग्वाहीही उपुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. 

पृथ्वीराज चव्हाण आंतरराष्ट्रीय मटेरियल 

गेल्या दहा वर्षांत कराड दक्षिणमधील जनतेकडून चूक झाली आहे. पृथ्वीराज चव्हाण हे बुद्धिवान नेतृत्व आहेत. त्यामुळे मुळात ते विधानसभेचे मटेरियल नसून आंतरराष्ट्रीय मटेरियल आहेत. असे विधान देवेंद्र फडणवीस यांनी केले. तसेच कराड दक्षिणच्या जनतेने त्यांना दक्षिणेत अडकवून न ठेवू नये, अशी खोचक टिपण्णी करत यावेळी कराड दक्षिणच्या जनतेने आपली चूक सुधारून डॉ. अतुलबाबांच्या रूपाने तरुण, तडफदार, गतिमान नेतृत्व विधानसभेत पाठवावे, असे आवाहनही ना. फडणवीस यांनी केले. 

अतुलबाबांना वरूनराजाचा कौल 

सभेला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस संबोधित करत असताना विजांच्या गडगडाटासह मोठ्या पावसाला सुरुवात झाली. यावेळी ना. फडणीस म्हणाले, वरूनराजानेही डॉ. अतुलबाबांना कौल दिला आहे. आता कराड दक्षिणच्या जनतेनेही मतांचा पाऊस पडून अतुलबाबांना विधानसभेत पाठवावे. 

अमोल कोल्हेंना लाज वाटली पाहिजे 

“महायुतीला लागली कडकी, म्हणून आणली योजना बहीण लाडकी” असे म्हणून महिलांचा अपमान करणाऱ्या डॉ. अमोल कोल्हे यांना लाज वाटायला पाहिजे, अशा शब्दात खा. उदयनराजे भोसले यांनी डॉ. अमोल कोल्हे यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला. तसेच काँग्रेसच्या जाहीरनाम्यातील आश्वासने महायुती सरकारने आधीच पूर्ण केली असल्याचे सांगत खोटारड्या लोकांपासून सावध राहा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. 

Jan Swarashtra
Author: Jan Swarashtra

Leave a Comment

आणखी वाचा

  • Buzz4 Ai
  • Buzz Open / Ai Website / Ai Tool
error: Content is protected !!