डॉ. अतुलबाबा भोसले; वाठार येथे कुस्तीगीरांचा मेळावा
कराड/प्रतिनिधी : –
ऑलम्पिकवीर पै. खाशाबा जाधव यांच्यासह ज्या कुस्तीगीरांनी कराडचे नाव कुस्ती क्षेत्रात आंतरराष्ट्रीय पातळीवर नेण्याचे काम केले, त्यांचा आदर्श ठेवून इथली युवा पिढी कुस्तीचे धडे गिरवते. महायुती सरकारच्या माध्यमातून ज्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज क्रिकेट स्टेडियमला मोठा निधी आणला. त्याचप्रमाणे कराड दक्षिणमध्ये कुस्तीगीरांसाठी आंतरराष्ट्रीय दर्जाची तालीम उभारणार असल्याची ग्वाही डॉ. अतुलबाबा भोसले यांनी दिली.
कुस्तीगीरांचा मेळावा : वाठार (ता. कराड) येथे कराड दक्षिण मतदारसंघातील कुस्तीगीरांच्या मेळाव्यात ते बोलत होते. याप्रसंगी रेठरे बुद्रुकचे माजी सरपंच पै. बबनराव दमामे, पै. आनंदराव मोहिते, दादासो थोरात, राजाराम यादव, साहेबराव करांडे, अशोक नलवडे, आनंदराव मोहिते, हिंदुराव पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी जिल्हा कुस्तीगीर संघाने डॉ. अतुलबाबा भोसले यांना जाहीर पाठींबा दिला.
पैलवानांविषयी तीन पिढयांचा स्नेह : आपल्या भागातील अनेक मुलं कोल्हापूरला तालमीत सराव करतात. आमच्या कुटुंबातील सर्व लोकांना पैलवान मंडळीविषयी आदर असून तीन पिढया आम्ही हा स्नेह जोपासत असल्याचे डॉ. अतुलबाबा भोसले यांनी सांगितले.
कराडच्या नावलौकिकात भर : कराडच्या मातीतील कुस्तीगीरांची कामगिरी सांगताना डॉ. अतुलबाबा भोसले म्हणाले, ऑलम्पिकवीर पै. खाशाबा जाधव, पै संजय पाटील, पै. मारुतीराव कापूरकर यांनी कराडच्या नावलौकिकात मोठी भर टाकली आहे. युवा पिढी त्यांच्या आदर्शांनुसार वाटचाल करत कुस्ती क्षेत्रात नवनवीन यशशिखरे गाठत आहे. आपण दरवर्षी राज्यस्तरावरील कुस्ती स्पर्धा घेत, कृष्णा कारखाना कार्यक्षेत्रातील पैलवानांसाठी स्पर्धा चालू करण्यासाठी आम्ही प्राधान्य देणार आहोत.
महाराष्ट्र केसरी स्पर्धेसाठी प्रयत्न : कराडला महाराष्ट्र केसरी स्पर्धा घेण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगत डॉ. अतुलबाबा भोसले म्हणाले, आपण सर्व पैलवानांनी मेळावा घेऊन मला पाठिंबा दिल्याने दहा हत्तीचं बळ मिळाले असल्याचे मतही त्यांनी यावेळी व्यक्त केले.
पैलवानांना वैद्यकीय सेवा : भोसले कुटुंबियांच्या तीन पिढ्या पैलवानांना प्रोत्साहन देत आल्या असून त्यांनी आम्हा पैलवानांना वेळोवेळी कृष्णा हॉस्पिटलच्या माध्यमातून तत्पर वैद्यकीय सेवाही दिली आहे. त्यामुळे आम्ही ह्या निवडणुकीत अतुलबाबांच्या पाठीशी उभा राहणार असल्याची भावना पैलवानांनी यावेळी व्यक्त केली.
पैलवानांनी घेतली शपथ : या मेळाव्यात सर्व पैलवानांनी शपथ घेत डॉ. अतुलबाबा भोसले यांना विजयी करण्याचा निर्धारही केला. तसेच जिल्हा कुस्तीगीर संघाच्यावतीने डॉ. अतुलबाबा भोसले यांना पाठिंबा देणारे पत्र दिले.
पक्षप्रवेश : यावेळी पै. धनाजी साळुंखे (मनव), निवास मंडले (मनव), भगवान यादव (कासारशिरंबे), शंकर जाधव (आटके) यांनी डॉ. अतुलबाबा भोसले यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला. यावेळी धनंजय पाटील, आदित्य शिंदे, सचिन पाचूपते, प्रमोद पाटील, सचिन बागट, यशवंत थोरात, बबनराव दमामे यांनी मनोगते व्यक्त केली.