आ. पृथ्वीराज चव्हाण; काले येथे काँग्रेस महाविकास आघाडीची प्रचार सभा
कराड/प्रतिनिधी : –
करोना काळात रुग्णांवर फुकट उपचार केले म्हणणारे साफ चुकीचे बोलत आहेत. मी सुरू केलेल्या राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेतून रुग्णांसाठी मदत मिळाली आहे. मात्र, विरोधक त्याचे मते मागण्यासाठी भांडवल करत असल्याचे प्रतिपादन राज्याचे माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी केले.
काले येथे प्रचार सभा :काले, (ता. कराड) येथे काँग्रेस महाविकास आघाडीच्या प्रचार सभेत ते बोलत होते. यावेळी श्रमिक मुक्ती दलाचे नेते डॉ. भारत पाटणकर, अॅ ड. उदयसिंह पाटील – उंडाळकर, प्रदेश युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष शिवराज मोरे, मनोहर शिंदे, प्रा. धनाजी काटकर, बंडानाना जगताप, अजितराव पाटील – चिखलीकर, पै. नानासाहेब पाटील, नामदेव पाटील, नितीन काशीद, शिवाजीराव मोहिते, अॅ ड. नरेंद्र नांगरे – पाटील, डॉ. अजित देसाई, अॅ ड. शरद पोळ, गीतांजली थोरात, संजय तडाखे, अक्षय सुर्वे यांची प्रमुख उपस्थिती होती.
भाऊ, काका आणि मी विकास केला : यशवंतराव मोहिते (भाऊ), विलासकाका आणि मी कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करताना जनतेच्या विश्वासाला पात्र राहून विकासकामे केल्याचे आ. चव्हाण यांनी सांगितले. ते म्हणाले, मतदारसंघाचा कायापालट, तसेच कराड जिल्हा होईल, यादृष्टीने मी मुख्यमंत्री असताना 1800 कोटींची, तसेच गेल्या पाच वर्षांत 1400 कोटींची विकासकामे केली. आता कराडमध्ये आयटी हब उभारून रोजगार उपलब्ध करण्याचे माझे स्वप्न असल्याचे प्रतिपादन राज्याचे माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी केले.
महिला, युवक व शेतकऱ्यांसाठी पाच अभिवचने : जाहीरनामा समितीचा प्रमुख असल्याने मी त्यामध्ये महिला, युवक व शेतकऱ्यांसाठी पाच अभिवचने दिली. याचा कुठेही शासकीय तिजोरीवर भार न आणता विचारांती हा जाहीरनामा तुमच्यासमोर आणला असल्याचे सांगत आ. चव्हाण म्हणाले, यात महिलांना दरमहा तीन हजार रुपये, मोफत एसटी प्रवास, शेतकऱ्यांना तीन लाखापर्यंत कर्जमाफी, राज्यातील सर्व जनतेला 25 लाखापर्यंत मोफत उपचार व पदवीधर युवकांना महिन्याला चार हजार रुपये देणार आहे.
वारणेच्या पाण्याचा फायदा होईल : पाणी योजनांची दहापटीने पाणीपट्टी वाढली. यावर लढा देवून आम्ही ती वसुली थांबवली. वारणेचे पाणी बंदिस्त पाईपलाईन करून कराड दक्षिणमध्ये येणार आहे. त्याचा दक्षिणेतील शेतकऱ्यांना मोठा फायदा होईल, असे डॉ. भारत पाटणकर यांनी सांगितले. बंडानाना जगताप यांचे भाषण झाले. पै. नानासाहेब पाटील यांनी प्रास्ताविक केले. दिपक तडाखे व राजेंद्र जाधव यांनी सूत्रसंचालन केले. वसंतराव पाटील यांनी आभार मानले.
आर्थिक कुचंबणा करणाऱ्यांना जागा दाखवा
विरोधकांच्या कोणत्याही अमिषांना भुलू नका. आपली आर्थिक कुचंबणा करून सत्ता आणि पदे घेणाऱ्यांना या निवडणुकीत जागा दाखवा, असे आवाहन अॅ ड. उदयसिंह पाटील – उंडाळकर यांनी केले.