सुषमा अंधारे यांची टीका; कराडला महिला मेळावा उत्साहात
कराड/प्रतिनिधी : –
शिंदे, फडणवीस यांना निवडणुका तोंडावर आल्यावरच लाडकी बहीण का आठवली. असा सवाल उपस्थित करत गद्दारी करून मुख्यमंत्री झालेल्या एकनाथ शिंदे यांच्यासह महायुतीला जनतेने लोकसभेत चांगलाच हात दाखवला आहे. त्यामुळे आता लोकांना भुलवण्यासाठी टीव्हीवर योजनांची जाहिरातबाजी केली जात आहे. मुळात चांगल्या गोष्टींची जाहिरात करावीच लागत नाही. त्यामुळे अशा पद्धतीने खोटी जाहिरातबाजी करणाऱ्या महायुतीला लाडक्या बहिणींनी विधानसभेतही हात दाखवावा, असे आवाहन शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केले.
कराडला महिला मेळावा उत्साहात : कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे अधिकृत उमेदवार माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रचारार्थ आयोजित महिला मेळाव्यात त्या बोलत होत्या. विचारमंचावर उमेदवार आ. पृथ्वीराज चव्हाण, सौ. सत्वशिला पृथ्वीराज चव्हाण, कर्नाटकचे माजी मंत्री विनयकुमार सोरके, प्रदेश युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष शिवराज मोरे, मनोहर शिंदे, प्रा. धनाजी काटकर, कराडच्या माजी नगराध्यक्षा शारदा जाधव, अर्चना पाटील, जिल्हा महिला काँग्रेसच्या अध्यक्षा अल्पना यादव, तालुकाध्यक्षा विद्याताई थोरवडे, गीतांजली थोरात, मलकापूरच्या माजी नगराध्यक्षा नीलम येडगे, रेठरे बुद्रुकच्या अर्चना अविनाश मोहिते यांच्यासह महिला पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.
त्यासाठी कटेंगे – बटेंगेची भाषा : करोना काळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या कामाची दखल जागतिक संघटनेने घेतल्याचे सांगत सुषमा अंधारे म्हणाल्या, उद्धव ठाकरे यांनी सरसकट शेतकऱ्यांचा सातबारा कोरा केला. तीन लाखांपर्यंत कर्जमाफी केली. नियमित परतफेड करणाऱ्यांनाही 50 हजारांचा लाभ दिला. मात्र, सध्या शेतमालाला किमान आधारभूत किंमत मिळत नाही. प्रचंड महागाई, बेरोजगारी वाढली आहे. विकासावर बोलायला महायुतीकडे मुद्देच नसल्याने ते कटेंगे – बटेंगेची भाषा बोलत आहेत.
लाडक्या बहिणींबद्दल पोकळ कळवळा :जाती – जातीत तेढ निर्माण करणाऱ्या, लाडक्या बहिणींबद्दल पोकळ कळवळा दाखवणाऱ्या लोकांचा खरा चेहरा समोर आला असल्याचे सांगताना उपनेत्या अंधारे म्हणाल्या, अनेक ठिकाणी होत असलेल्या महिला अत्याचारांच्या घटना, महिलांबद्दल काढण्यात येणारे अपशब्द संताप आणणाऱ्या गोष्टी आहेत. महाराष्ट्रात कधीही असली गलिच्छ वापरा भाषा बोलली गेली. ते गलिच्छ, अस्थिर राजकारण फडणवीस यांनी केले. आता त्यांची वाईट नजर सुसंस्कृत कराडवर पडली असून त्यांना येथे धार्मिक दंगली घडवायच्या आहेत. परंतु, कराडची जनता साक्षर व सुज्ञ आहे. इथे जातीयवाद चालत नसून आपण कराडची संस्कृती कधीही हरवू देणार नाही, याची मला खात्री असल्याचेही त्या म्हणाल्या.
महाराष्ट्राच्या अस्मितेला धक्का लावला :भाजपच्या 10 वर्षांच्या काळात महाराष्ट्राची मोठी अधोगती झाल्याचे सांगताना आ. पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, अनेक उद्योग गुजरातला पळवले. सरकार पाडण्यासाठी 50 कोटी रुपये देऊन आमदार खरेदी केले गेले. रस्ते, पुल, अन्य विकासकामांतही पैसे खाणाऱ्या सरकारने शिवरायांच्या पुतळा उभारणीतही पैसे खाऊन महाराष्ट्राच्या अस्मितेला धक्का लावला. त्यामुळे अशा भ्रष्ट लोकांना जनता नक्कीच धडा शिकवेल.
महागाई वाढल्यावर बहिणींची आठवण झाली का?सध्या युवकांना रोजगार नाही सोयाबीन, कापूस, कांदा याला हमीभाव नसल्याचे सांगताना आ. चव्हाण म्हणाले, मोदींच्या चुकीच्या कृषी विषयक धोरणामुळे महाराष्ट्रात दररोज सरासरी सात शेतकरी आत्महत्या करत आहेत, याला मोदी, फडणवीस जबाबदार आहेत. महागाई वाढली त्यावेळी त्यांना बहिणींची आठवण झाली नाही. अग्निवीरच्या नावाखाली युवकांची दिशाभूल केली जात असून त्यांच्यासमोर कोणतेही शाश्वत भविष्य नाही. त्यामुळे अशा लबाड, भ्रष्टाचारी सरकारला हद्दपार करायला पाहिजे.
कराडची जागा राज्याचे नेतृत्व करणारी
कराडच्या प्रीतिसंगमाला यशवंतराव चव्हाण यांच्या सुसंस्कृत राजकारणाचा वारसा आहे. तो वारसा सुसंस्कृत राजकारणी व निष्कलंक व्यक्तिमत्व असलेले माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण सक्षमपणे चालवत आहेत. परंतु, येथे जातीयवादी राजकारण करणाऱ्या फडणवीस यांचे उमेदवार पैशांच्या जोरावर उड्या मारत आहेत. बाबांनी त्यांना दोन वेळा पाडले. आता तिसऱ्यांदा त्यांची पडायची हौस तुम्ही पूर्ण करा. कराडची जागा ही महाराष्ट्राचे नेतृत्व करणारी जागा आहे. तब्बल 1800 कोटी रुपयांचा विकासनिधी आणणाऱ्या पृथ्वीराज चव्हाण यांच्यासारख्या सुसंस्कृत नेतृत्वाला साथ दिल्यास राज्याला नेतृत्व लाभेल, असा विश्वास सुषमा अंधारे यांनी व्यक्त केला.
महालक्ष्मी योजनेचा लाभ देणार
लाडकी बहीण योजनेचे मी समर्थनच केले होते. खरंतर कर्नाटकमध्ये काँग्रेसने ही योजना राबवली, तेलंगणातही त्याची अंमलबजावणी केली. आम्ही महाराष्ट्रात महिलांना दोन हजार रुपये देणार होतो. परंतु, महायुतीने कंजूशी करत दीड हजार रुपये दिले. आता ते 2100 रुपये देणार असल्याचे सांगताहेत. मात्र, राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यावर आम्ही महिलांना महालक्ष्मी योजनेच्या माध्यमातून प्रतिमहा तीन हजार रुपये देणार आहोत. तसेच मोफत एसटी प्रवास, मुलींसह मुलांनाही मोफत उच्च शिक्षण, लोकांना 25 लाखांपर्यंत मोफत आरोग्य विमा देणार, राज्यात जातवार जनगणना करणार, तात्काळ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेणार असल्याचे आ. चव्हाण यांनी सांगितले.