अमित शहा यांची ग्वाही; राज्यात महायुतीचे सरकार येईल
कराड/प्रतिनिधी : –
गत विधानसभेत डॉ. अतुल भोसले यांना केवळ साडेचार हजार मते कमी मिळाल्याची सल आजही मनात आहे. या निवडणुकीत तुम्ही ती कसर भरून काढत त्यांना मोठ्या मताधिक्यांनी विजयी करा, मी त्यांना मंत्रीपद देण्यासाठी कटीबद्ध आहे, अशी ग्वाही केंद्रीय गृहमंत्री तथा सहकारमंत्री अमित शहा यांनी दिली.
महायुतीची विराट सभा : विंग (ता. कराड) येथे महायुतीचे अधिकृत उमेदवार डॉ. अतुल भोसले यांच्या प्रचारसभेत ते बोलत होते. या सभेला कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील महायुतीतील घटक पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक तसेच महिला भगिनींची असलेली अलोट गर्दी लक्षवेधी ठरली.
मान्यवरांची उपस्थिती : या विचारमंचावर खासदार उदयनराजे भोसले, उमेदवार डॉ. अतुलबाबा भोसले, कृष्णा कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले, माजी आ. आनंदराव पाटील, जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम, भरतनाना पाटील, विक्रम पावसकर, कराड नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष राजेंद्रसिंह यादव यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती.
लोकप्रतिनिधींनी कराड दक्षिणसाठी काय केले? : प्रधानमंत्री कार्यालयात मंत्री असलेल्या पृथ्वीराज चव्हाण यांनी, तसेच तब्बल पन्नास वर्षे लोकप्रतिनिधीत्व करणाऱ्यांनी कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघाच्या विकासासाठी काय केले, असा सवाल उपस्थित करत अमित शहा म्हणाले, असे नेते आणि त्यांचा पक्ष कराड दक्षिणचा विकास काय करणार, याचाही जनतेने विचार केला पाहिजे.
कराड दक्षिणमध्ये कमळ फुलवा : राज्यात आता महायुतीचे सरकारी येणार असून या सरकारमध्ये तुम्ही कराड दक्षिणमध्ये कमळ फुलवून अतुलबाबांना विजयी करून पाठवा. त्यानंतर प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून प्रत्येक प्रत्येक लाभार्थ्याला पक्के घर देऊन येथील झोपडपट्टी हटवणार. तसेच त्याच्या उद्घाटनाला मी कराडला येणार असून स्वतःच्या हाताने लाभार्थ्यांना पक्क्या घरांच्या चाव्या देणार असल्याचा शब्दही त्यांनी यावेळी दिला.
एमआयडीसीच्या माध्यमातून मोठी गुंतवणूक : भाजपच्या माध्यमातून कराडला प्लाय ओव्हर ब्रिज होत असून महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून कराडच्या स्टेडियमलाही मोठा निधी मिळाला असल्याचे श्री. शहा यांनी सांगितले. तसेच अतुलबाबांच्या कृष्णा हॉस्पिटल, कृष्णा साखर कारखाना, कृष्णा बँक, जयवंतराव भोसले पतसंस्था आदी सहकारी संस्थांच्या माध्यमातून युवकांना रोजगार निर्मिती झाली आहे. आता राज्य सरकारही कराड दक्षिणमध्ये एमआयडीसीच्या माध्यमातून मोठी गुंतवणूक करणार असून युवकांना मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होणार असल्याचेही त्यांनी नमूद केले.
झोपडपट्टीवासीयांना पक्की घरे द्या : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्रातील महायुतीकडून युवकांना मोठी अपेक्षा असल्याचे सांगत डॉ. अतुल भोसले म्हणाले, कराडची एमआयडीसीला फाईव्ह स्टारचा दर्जा द्यावा, येथील सहकारी सिंचन योजनांचे पुनर्गठन करून त्यांना उर्जिताववस्था द्यावी, येथील लोकप्रतिनिधी माजी मुख्यमंत्र्यांच्या घरालगत पाटण कॉलनीतील झोपडपट्टीवाशीयांची दहा वर्षांपासून पक्क्या घरांची मागणी आहे. परंतु, ती त्यांना पूर्ण करता आली नाही. मात्र, आपण प्रधानमंत्री आवास योजनेतून कराडच्या स्टेडियमलगत, पाटण कॉलनी, तसेच मलकापुरातील झोपडपट्टीवाशीयांना पक्की घरे द्यावीत, अशी मागणी डॉ. अतुल भोसले यांनी अमित शहा यांच्याकडे केली.
दक्षिणेत कमळ फुलवणार
भारतीय जनता पार्टीने माझ्यावर सातारा लोकसभा मतदारसंघाचा प्रभारी म्हणून जबाबदारी सोपवली होती. छत्रपती उदयनराजे भोसले यांना साताऱ्यातून पहिल्यांदा भाजपचा खासदार म्हणून विजय करून, कराड दक्षिणमधून मोठे मताधिक्य देऊन ती जबाबदारी मी पूर्ण केली आहे. आता कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघात मागच्या वेळची कसर भरून काढत यावेळी कमळ फुलवणारच, असा शब्दही डॉ. अतुलबाबा भोसले यांनी यावेळी अमित शहा यांना दिला.