आ. पृथ्वीराज चव्हाण यांची ग्वाही; वाठार भागातील प्रचार दौऱ्याला उस्फुर्त प्रतिसाद
कराड/प्रतिनिधी : –
लोकसभा निवडणुकीमध्ये खोके सरकारचा जनतेने दारूण पराभव केला. याचीच पुनरावृत्ती आता विधानसभा निवडणुकीतही होणार आहे. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर कराड दक्षिणेचा विकास पुन्हा त्याच जोमाने होईल, असा विश्वास राज्याचे माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केला.
प्रचार दौऱ्यास उत्स्फूर्त प्रतिसाद : कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील जुने मालखेड, मालखेड, रेठरे खुर्द, वाठार, आटके येथे महाविकास आघाडीच्या प्रचार दौऱ्यात ते बोलत होते. यावेळी राष्ट्रीय काँग्रेसचे सेवा दलाचे कराड दक्षिणचे अध्यक्ष शिवाजीराव मोहिते, अॅड नरेंद्र नांगरे – पाटील, युवा नेते इंद्रजित चव्हाण, दिग्विजय पाटील, संजय तडाखे यांची प्रमुख उपस्थिती होती.
कराड तालुक्यातील जनतेमुळेच राजकीय कारकीर्द : कराड तालुक्यातील जनतेने संधी दिल्यामुळे माझ्या राजकीय सुरुवात झाली. जनतेच्या विश्वासामुळेच मला केंद्रीय मंत्री, तसेच महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होण्याची संधी मिळाली. कराड नगरपालिकेच्या शाळेत शिक्षण घेतल्यापासून ते अमेरिकेत इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण केले. त्यांनतर आई – वडिलांचे संस्कार समाजसेवेचे असल्यामुळे राजकारणात प्रवेश करून समाजसेवेचे वृत्त हाती घेतले. त्या माध्यमातून आजपर्यंत मिळालेल्या सत्तेचा उपयोग व्यक्तिगत प्रगतीपेक्षा सार्वजनिक व सामाजिक प्रगती साधण्यावर भर दिला. त्यामुळेच आजच्या डोलायमान राजकीय परिस्थितीतही आपण ताठ मानेने, सन्मानाने राहत असल्याचे मतही मत आ. चव्हाण यांनी व्यक्त केले.
भाजपने अडथळे आणूनही निधी मिळवला : कराड दक्षिणमध्ये कोट्यवधीची विकासकामे केल्याचे सांगत श्री. चव्हाण म्हणाले, गेली साडे – सात वर्षे भाजपचे सरकार असल्याने मतदारसंघात विकास निधी आणण्यात अनेक अडथळे आले. पण तरीही अडीच वर्षांच्या सत्ता काळात आणि प्रशासनातील कामकाजाची माहिती म्हणून कोट्यावधींचा निधी पुन्हा एकदा कराड दक्षिणसाठी आणता आला.
आमदार नव्हे, सरकार निवडणारी निवडणूक : कृष्णाकाठी विकासाच्या योजना काँग्रेसमुळे उभ्या राहिल्याचे सांगत श्री. चव्हाण म्हणाले, तुम्ही केवळ आमदार निवडत नाही. तर सरकार निवडायचे, हे ठरवणारी निवडणूक आहे. फुले, शाहू व आंबेडकर यांच्या विचारांचे सरकार आणायचे की, पुन्हा वर्ण व्यवस्था आणणाऱ्या प्रवृत्तींना आपण बळ द्यायचे, हे मतदारांनी ठरवावे. माजी सरपंच चंद्रकांत पवार यांचे भाषण झाले.
एकीकडे आश्वासनांचा पाऊस, दुसरीकडे बाबांचा खरा विकास :
डॉ. अतुल भोसले यांच्या गटाकडे आश्वासनांचा पाऊस आणि एका बाजूला पृथ्वीराज बाबांचा खरा विकास दिसत असल्याचे रविकिरण पाटील त्यांनी सांगितले. मालखेड येथील बैठकीत बोलताना ते म्हणाले, विरोधक फसवी आश्वासने देत आहेत. अतुल भोसले यांनी मालखेड गावात येवून केलेल्या भूमिपूजनाचे काय झाले? असा सवाल करत आ. पृथ्वीराज चव्हाण यांना साथ देण्याचे आवाहन केले.